Login

प्रेम की आकर्षण? भाग ३ अंतिम

प्रेम की केवळ शारीरिक आकर्षण....
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलदकथा फेरी

शीर्षक : प्रेम की आकर्षण? भाग ३ अंतिम


“अनय, आधी शांतपणे मला काय म्हणायचंय हे समजून तरी घे. अनकम्फर्टेबल म्हणजे माझ्या मनात मर्यादांचा विचार येतो आहे.” रजिता काहीशी समजावण्याच्या सुरात म्हणाली.

“का माझा तुझ्यावर हक्क नाहीये का? अगं मी किती मनापासून तुला भेटण्यासाठी प्रयत्न करतो. तुझी आठवण काढत असतो सतत. माझं मिस करणं, प्रेम करणं तुला दिसत नाही का? मला वाटत होतं तू पण मला तितकंच मिस करतेस; पण तू तर माझा अपेक्षाभंग करत आहेस असंच वाटतंय आता मला.” अनय स्वतःचा त्रागा व्यक्त करत जरा तावातावानेच म्हणाला.

“अनय यार तू समजूनच घेत नाहीस. मला कळतंय की तू माझ्यावर प्रेम करतोस, मला मिस करतोस. मीही करतेच की! पण माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की तू थोडं संयमाने वाग. तुझा हक्क नाहीये असं मी म्हणतच नाहीये. फक्त इतकंच की मला मर्यादा ओलांडणं पटत नाहीये. असं पण नाही की मी तुझा स्पर्शच नको असं म्हणतेय; पण त्या स्पर्शालाही एक सीमा असावी असं मला वाटतं.”

“मर्यादा? सिरियसली! अगं आपण प्रेम करतो ना एकमेकांवर? साडेतीन वर्षांचं नातं आहे आपलं. मग तरी एवढाही विश्वास नाही तुला?”

“विश्वास आहेच ना रे; पण मला काहीशी भीती वाटते. हे चुकीचं आहे असं वाटतं.” रजिताने स्पष्टीकरण दिले.

“भीती वाटते तुला? कशाची भीती? तुझं नक्की प्रेम आहे ना माझ्यावर?” अनय असे म्हणाला खरे; पण यावेळी मात्र शांतपणे परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या रजिताच्या संयमाचा बांध फुटला होता.

“खरंच अनय, मी नक्की तुझ्यावर प्रेम करते का असा प्रश्न पडतोय आता तुला? मी हा सगळा टाईमपास करतेय असं वाटतंय का तुला? मुळात तू हे बोललासच कसा? आय नो, आय लव्ह यू! पण मलाही सेल्फ रिस्पेक्ट आहे. तुझ्या भावनांची कदर करता करता मी माझ्या भावनांना मारू शकत नाही. मी कितीही प्रेमात असले, तरी मला माझ्या मर्यादांचं चांगलंच भान आहे. मर्यादा ओलांडून मी फक्त घरच्यांच्याच नाही, तर स्वतःच्याही नजरेतून उतरेन. आता तू कदाचित असं म्हणशील की प्रेम करताना नाही का असे विचार सुचले; पण हो... प्रेमात पडताना, वागताना मी नेहमीच दोन्ही नात्यांचा विचार करून वागलेय. घरच्यांना कसं तयार करायचं या नात्यासाठी हा मोठा प्रश्नच आहे खरंतर; पण मी मात्र आता माझे काही एथिक्स सोडून वागू शकत नाहीये.” भरभर इतके बोलून तिने दीर्घ श्वास घेतला.


आता अनय जरा वरमला होता.

“मला तसं नव्हतं म्हणायचं. आय नो, समटाइम्स आय ओव्हररिॲक्ट! पण खरंच गं... मला तुझी जी ओढ वाटते त्यामुळे मी बोलतो, वागतो. फीलिंग्ज सांभाळणं कठीण होतं कधीकधी.” अनयने यावेळी शांतपणे म्हटले.

“तुझ्या भावना मी मान्य करतेच ना. मला इतकंच म्हणायचं आहे की प्रेम भावनांची कदर करून एकमेकांना समजून घेऊन मनापासून असायला हवं. शारीरिक जवळीक साधण्याला प्रेमाचं नाव देणं, हे मला तरी पटत नाहीये. एका मर्यादेनंतर मर्यादा सांभाळणं जर चुकीचं असेल, तर मी चुकीचीच ठीक आहे.”

“नाही गं. असं नको बोलूस. मला तू खरंच मनापासून माझ्या आयुष्यात हवी आहेस. मीच कुठेतरी भावनांमध्ये गफलत केली. चुकलंच माझं! यापुढे नाही होणार पण असं. खरंच... खूप खूप सॉरी!” अवघ्या काही मिनिटांत मनोमन बऱ्याच गोष्टींची जाणीव झालेला अनय लागलीच आपली चूक मान्य करून शेवटी स्वतःचे कान पकडत म्हणाला.

यावर मात्र रजितानेही हा विषय फार न ताणता अनयला समजून घेतले आणि तिथून पुढे त्या दोघांच्या प्रेमाचा एक नवा प्रवास सुरू झाला होता. या प्रवासात आता दिखाऊ आकर्षण नव्हते. ओढ होतीच; पण ती शरीरापलीकडची...

समाप्त
© कामिनी खाने ( संघ कामिनी )

सदर लिखाणाचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.
0

🎭 Series Post

View all