रहस्य स्यमंतकाचे.. भाग २
मागील भागात आपण पाहिले की कौस्तुभ स्वप्नातून दचकून उठतो. त्याचे आजोबा त्याच्या आग्रहावरून घरातील विठ्ठल मूर्तीची कथा परत सांगतात. आता बघू पुढे काय होते ते.
" प्रणाम सत्राजितकाका.." कृष्ण सत्राजिताला नमस्कार करत म्हणाला.
" द्वारकाधीश, तुम्ही इथे? आज्ञा केली असती तर मीच आलो असतो." सत्रजिताच्या चेहर्यावर आश्चर्य दिसून येत होते.
" माझे काम आहे तर मलाच येणे भाग होते. आढेवेढे न घेताच मी बोलतो. तुमच्याकडे जो स्यमंतक मणी आहे तो जर तुम्ही उग्रसेन महाराजांना दिलात तर फार उपकार होतील. सततच्या लढायांनी मथुरेचे राज्य खिळखिळे झाले आहे. त्या मण्यामधून मिळणाऱ्या सोन्यातून यादवांचे मूळ राज्य परत भरभराटीस येईल." कृष्ण बोलत होता. त्यानुसार सत्राजिताच्या चेहर्यावरील भाव बदलत होते.
" क्षमा असावी द्वारकाधीश. ते रत्न मी सूर्यदेवांची आराधना करून मिळवले आहे. मी ते तुम्हाला देऊ शकत नाही." सत्राजित कठोर मुद्रेने म्हणाला.
" जशी तुमची इच्छा." चेहर्यावर आपले नेहमीचे मिस्किल हसू आणत कृष्ण तिथून निघाला तोच बाहेरून शस्त्रविद्येचा सराव करून आलेली सत्यभामा त्याला धडकली. कृष्णाला बघून तिच्या गालावर गुलाब फुलले. कृष्ण मात्र स्वतःच्याच विचारांच्या तंद्रीत तिथून निघून गेला.
**********
" ये कौस्तुभ, आत ये.. मला खरंच तू येशील याची खात्री नव्हती." कौस्तुभचे स्वागत करत आदित्यनाथ उठले. "बस ना."
" हो सर.." त्यांना उभे राहिलेले बघून कौस्तुभ थोडा अवघडला.
" तुला इथे बघून मला खूप आनंद झाला आहे." आदित्यनाथ पुढे म्हणाले.
" सर, हे ऐकून फार बरं वाटलं. पण मला अजूनही हे समजत नाही की माझे तुमच्या कंपनीत काय काम आहे? मी जर चुकत नसेन तर तुमची सॉफ्टवेअर कंपनी आहे." कौस्तुभ त्याला खटकणार्या गोष्टी विचारत होता. त्याच्या प्रश्नाने आदित्यनाथ क्षणभर थांबले आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली.
" तुझे म्हणणे रास्त आहे. मी तुला कसलीच कल्पना न देता आमच्या कंपनीत ये असा आग्रह करत होतो. आता तू आला आहेसच तर मी असं धरून चालतो की तुझी इथे काम करायची तयारी आहे. तसं असेल तरच मी तुला काही अश्या गोष्टी सांगू इच्छितो की ज्या आता लगेच बाहेर जाव्यात अशी माझी इच्छा नाही." आदित्यनाथांचा सूर थोडा बदलला होता.
" तुम्ही सांगू शकता सर."
" आमची सॉफ्टवेअर कंपनी जरी असली तरी आम्ही देशासाठी काहीतरी करायचा प्रयत्न करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणजे आपल्याकडे जेवढ्या हेरिटेज वास्तू आहेत त्यांचा अजून अभ्यास करून त्यावरच एक सॉफ्टवेअर बनवावं असा विचार आहे. ज्यामुळे आपला हा अलौकिक वारसा जगापर्यंत पोहोचेल."
" पण सर, हे काम आधीपासून होत आहेच ना? म्हणजे भारत सरकार आणि राज्यसरकार यांनी मिळून राज्यातल्या अनेक हेरिटेज गोष्टींचा अभ्यास करून असे व्हिडिओ, माहिती टाकली आहे." कौस्तुभला वाटणारे आश्चर्य वाढले होते.
" तेच तर.. आपली माहिती यापेक्षा वेगळी हवी. त्यासाठीच मला तुझी गरज आहे. तू एक पुरात्तवज्ञ आहेस. तुला या सर्व गोष्टींचा अनुभव आहे, तुला याची माहिती आहे. तुझ्या ज्ञानाचा फायदा सगळ्यांनाच व्हावा अशी माझी इच्छा आहे."
" नक्की काय करायचे आहे मला?"
" तू सुरूवातीला हम्पीला जा. तिथे अनेक वास्तू आहेत. तिथे जाऊन तुला कोणालाही माहिती नसतील अश्या गोष्टी शोधायच्या आहेत. तिथे गेल्यावर तुला कामाचा अंदाज येईलच. बाकी गोष्टी आल्यावर ठरवू. पैशांची काळजी करू नकोस. तुझ्या आधीच्या कंपनीपेक्षा इथे तुला पगार नक्कीच जास्त असेल." आदित्यनाथांनी बोलणे बंद करून कौस्तुभचे भाव निरखायला सुरुवात केली.
हम्पी हे नाव ऐकताच कौस्तुभच्या डोळ्यासमोर आली घरातली विठ्ठलमूर्ती. त्याला आठवली सकाळीच आजोबांनी सांगितलेली कथा. त्याच्या बुद्धीने काही निर्णय घेण्याआधीच त्याच्या मनाने होकार दिला होता. त्याची मुलाखत सुरू असतानाच एक चेहरा त्याला पलिकडच्या काचेतून निरखत होता. म्हणजे त्या व्यक्तीला कौस्तुभ दिसत होता. पण कौस्तुभला मात्र ती व्यक्ती दिसत नव्हती.
हम्पी हे नाव ऐकताच कौस्तुभच्या डोळ्यासमोर आली घरातली विठ्ठलमूर्ती. त्याला आठवली सकाळीच आजोबांनी सांगितलेली कथा. त्याच्या बुद्धीने काही निर्णय घेण्याआधीच त्याच्या मनाने होकार दिला होता. त्याची मुलाखत सुरू असतानाच एक चेहरा त्याला पलिकडच्या काचेतून निरखत होता. म्हणजे त्या व्यक्तीला कौस्तुभ दिसत होता. पण कौस्तुभला मात्र ती व्यक्ती दिसत नव्हती.
" कधी सुरूवात करायची आहे कामाला?" कौस्तुभने विचारले. हा प्रश्न ऐकताच आदित्यनाथांचा चेहरा आनंदाने फुलला.
" तू म्हणशील तर उद्यापासूनच."
" नाही. मला थोडा वेळ लागेल. मला आधीच्या कंपनीत सुद्धा कल्पना द्यावी लागेल. " कौस्तुभ म्हणाला.
" हो.. ते तर करावे लागतेच. तसेही आपल्याला नियमांविरुद्ध जाऊन काहिही करायचे नाही."
कौस्तुभ जाण्यासाठी उठला. आदित्यनाथांनी परत हात पुढे केला. हस्तांदोलन करून तो बाहेर जाण्यासाठी वळला. त्याने दरवाजा उघडला. तोच त्याच्या अंगावर एक तरूणी येऊन आदळली.
" डॅड..." कौस्तुभला बघून ती बावरली.
" तुला किती वेळा सांगितले काव्या.. केबिनमध्ये येताना नॉक करून येत जा म्हणून." आदित्यनाथ चिडले.
" सॉरी डॅड.." मान खाली घालून ती म्हणाली.
" येतो सर मी." कौस्तुभ सांगून बाहेर पडला. त्याचे शब्द ऐकून काव्याच्या गालावर मात्र गुलाब फुलले होते.
हंपीला जाऊन कौस्तुभला नक्की काय करावे लागणार आहे? हंपीचे नाव ऐकताच त्याला घरची मूर्ती आठवली. त्या मूर्तीचा आणि या सगळ्याचा काही संबंध असेल? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा