रहस्य स्यमंतकाचे.. भाग ७
मागील भागात आपण पाहिले की काव्या कौस्तुभला मदत करण्यासाठी त्याच्यासोबत जाणार असते. आता बघू पुढे काय होते ते.
" कान्हाचा निरोप घेऊन दूत आला का ग?" गोरस घेऊन आलेल्या रुक्मिणीला देवकीमातेने विचारले.
" नाही अजून." डोळ्यातले पाणी लपवत रुक्मिणी म्हणाली.
" शोभतेस बरी त्याची पत्नी. स्वतःचे दुःख लपवून दुसऱ्यांना सुखी ठेवायचे. आणि तू कशाला हे दुध वगैरे आणतेस? दासींना सांगायचे ना?" देवकीमातेने प्रेमाने रूक्मिणीला दटावले.
" त्या निमित्ताने तरी स्वामी अजून का आले नाहीत या विचारातून मुक्तता मिळते म्हणून. " रुक्मिणी बोलून गेली. तिचे दुःख देवकीमातेला समजले.
" अग, लहान वयात त्याने मोठमोठ्या राक्षसांना मारले आहे. आता तर फक्त एक मणीरत्न शोधायला गेला आहे. येईलच लवकर. तू जा रेवतीकडे. ती बघ काय करते आहे? तेवढेच दोघींचे मन रमेल."
" आज्ञा माते.." रुक्मिणी जायला वळली. ती जाताच देवकीने हात जोडले.
" ईडामाते, माझा कान्हा जिथे असेल तिथे त्याला सुखरूप ठेव."
***************
" आजोबा, बसताय ना गाडीत?" आजोबांची वाट बघत असलेला कौस्तुभ ओरडला.
" अरे हो.. आलोच. जरा धीर धरवत नाही तुला." आजोबा विठ्ठलाची मूर्ती घेऊन बाहेर आले.
" हे काय आहे?" आश्चर्याने काव्याने विचारले.
" हा आहे आमचा देव. इतके दिवस त्याच्यापासून दूर राहता येणार नाही. म्हणून त्यालाच घेऊन निघालो आहोत." आजोबा हसत उद्गारले.
" मग आता याला कुठे ठेवणार?"
" कुठे म्हणजे? माझ्या शेजारी. हे असे." आजोबा पाठच्या सीटवर जाऊन बसले. त्यांनी आपल्या शेजारी ती मूर्ती ठेवली. ती हलू नये म्हणून सीटबेल्ट लावला. काव्या ते बघून चकित झाली होती.
" आता मी कुठे बसू?"
" टपावर.." कौस्तुभ पुटपुटला.
" काय?"
" तू पुढे बस. कौस्तुभ शेजारी." आजोबा म्हणाले. नाईलाज आहे असं दाखवत काव्या पुढे बसली. खरंतर तिलाही मनापासून तिथेच बसायचे होते. पण आजोबांसमोर कसं बोलणार होती ती. कौस्तुभला बघताक्षणीच तिला तो आवडला होता. त्याच्यासोबत राहता यावं म्हणूनच वडिलांच्यापाठी लागून तिने त्याच्यासोबत जायची परवानगी मागितली होती. बराच विचार करून आणि कौस्तुभ सोबत त्याचे आजोबा आहेत हे समजल्यावरच त्यांनी ही परवानगी दिली होती. काव्या स्वतःच्याच विचारात रमली होती.
" मॅडम, तुम्ही माझ्या सहकारी आहात. बॉस नाही. गाडीचा दरवाजा लावून घ्या." काव्यासमोर चुटकी वाजवत कौस्तुभ म्हणाला. जीभ चावत तिने दरवाजा ओढून घेतला. कौस्तुभने गाडी सुरू केली. काव्या चोरून कौस्तुभकडे बघत त्याच्या विचारात रममाण झाली होती. कौस्तुभ हंपीला गेल्यावर काय होईल याचा विचार करत होता. तर आजोबा विचार करत होते सुजयच्या डायरीबद्दल. हो सुजयची डायरी. लहानपणीच आजोबांनी सुजयला एक भाषा शिकवली होती. एक अशी भाषा जी फक्त त्या दोघांनाच माहित होती. आजोबांच्या डोळ्यासमोर प्रसंग तरळू लागले. दहा वर्षांचा होता सुजय तेव्हा.
" बाबा, आईने मला आज खूप मारले." कॉलेजमधून आलेल्या वल्लभरावांना सुजय येऊन चिकटला.
" का? काय झाले?" रडणार्या सुजयचे डोळे पुसत त्यांनी विचारले.
" त्याला काय विचारता? मला विचारा?" जानकीबाई चिडल्या होत्या. त्यांनी परत सुजयला मारायला हात उगारला.
" बाबा.."
" काय झाले ते तरी सांगा."
" काय झाले? माझी आई या विषयावर निबंध लिहायचा होता. विचारा काय लिहून आला आहे?"
" काय लिहिलेस रे?"
" तो काय सांगेल? मी सांगते. माझी आई म्हणे घरीच असते, दुपारी झोपते. बाबांवर ओरडते. आज शाळेत आणायला गेले तर सगळ्या बाई माझ्याकडे बघून हसत होत्या."
" पण बाबा मी काही खोटे बोललो का?" सुजयने निष्पापपणे विचारले.
" तुम्ही चहा आणता का? मी बोलतो याच्याशी."वल्लभभरावांनी जानकीताईंना आत पिटाळले.
" तू खरंच असा निबंध लिहिला?"
" हो.. बाई म्हणाल्या खरंखरं लिहा."
" अच्छा.. आता हे कितीही खरं असलं तरी अश्या गोष्टी आपण कोणाला सांगतो का?" सुजयने नकारार्थी मान हलवली.
" पण मग अश्या गोष्टी मनातच ठेवायच्या?"
" नाही.. त्या दुसरीकडे कुठेतरी उतरवायच्या. पण कोणाला समजणार नाही अश्या भाषेत. " वल्लभराव म्हणाले.
" अशी कोणती भाषा असते?" सुजयने डोळे मोठे करत विचारले.
" माझ्याकडे आहे.. तू आईशी नीट वागलास तर मी नक्की तुला शिकवीन. माझी अजून एक अट आहे."
" काय?"
" ते तू मला वाचायला द्यायचे? चालेल?" क्षणभर विचार करून सुजय हो म्हणाला. त्या दिवसापासूनच वल्लभरावांनी सुजयला त्यांनी स्वतः बनवलेली गुप्त भाषा शिकवायला सुरुवात केली. सुजयनेही कबूल केल्याप्रमाणे लिहिलेली प्रत्येक गोष्ट बाबांना वाचायला दिली. सुजय मोठा झाला तसे वल्लभरावांनीच मग त्याने लिहिलेलं वाचणं बंद केलं. दोघांमध्ये बापमुलाचे कमी आणि मित्राचे नाते जास्त होते. सुजयने वल्लभरावांच्या पुस्तकांच्या कपाटात एक चोरकप्पा बनवला होता. जो फक्त या दोघांनाच माहित होता. दोघांनीही ठरवले होते. समोरासमोर बोलून न सांगता येण्यासारखी गोष्ट लिहून त्या कप्प्यात ठेवायची. सुजयच्या मृत्यूनंतर तो चोरकप्पा आजोबांच्या विस्मरणात गेला होता. त्या दिवशी सुजय आणि अवनी कोणत्यातरी गुप्त गोष्टीवर काम करत असतील असं म्हटल्यानंतर आजोबांना तो चोरकप्पा आठवला. त्यांना वाटले होते तसेच त्या दोघांच्या गुप्त भाषेत लिहिलेल्या काही डायर्या होत्या. त्यांना वाचायला वेळ मिळाला नव्हता. म्हणून त्यांनी आपल्या सामानात त्या लपवल्या होत्या. त्याबद्दल कौस्तुभला त्यांना आता काहीच सांगायचे नव्हते. सुजयचा जीव का गेला हे त्यांना माहित नव्हते. पण आता कौस्तुभला ते काहीच होऊ देणार नव्हते.
काय लिहिले असेल त्या डायरीत? कौस्तुभच्या जीवाला असेल का धोका? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा