चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलद कथालेखन स्पर्धा
जलद कथालेखन स्पर्धा
शीर्षक : तिचा नंबर शेवटीच? भाग १
© कामिनी खाने ( संघ कामिनी )
© कामिनी खाने ( संघ कामिनी )
“मधेमधे करू नकोस गं. चल, बाजूला हो. आजी आवाज देत आहे.” राधिका म्हणाली आणि हातातला ट्रे घेऊन बाहेर हॉलमध्ये निघून गेली.
छोटी मैथिली मात्र तिथेच घुटमळत राहिली होती.
“ठेव ते!” रिकामा ट्रे घेऊन स्वयंपाकघरात परतलेली राधिका मोठ्या आवाजात ओरडली. ओरडली कसली, चांगली खेकसलीच आणि यावर मैथिलीने दचकून तिच्या दिशेने बघितले.
राधिका पटपट मैथिलीच्या जवळ आली आणि तिने नुकताच उचललेला मिठाईचा तुकडा तिच्या हातातून जवळजवळ हिसकावूनच घेतला.
“तुला किती वेळा सांगितलंय की असं न विचारता काही घेत जाऊ नकोस म्हणून. बाहेर पाहुणे आहेत आणि इकडे तुझं काय चाललंय?” राधिका आताही तिच्या अंगावर खेकसूनच म्हणाली.
“ती... ती मिठाई आवडते ना मला. म्हणून मी...” मैथिली अडखळत बोलतच होती की राधिकाने तिला थांबवले.
“काय आवडते? तुझ्या आजीला समजलं ना तर तुला तर तुला; पण मलासुद्धा तिचा राग झेलायला लागेल. इतकी वर्षं ऐकतेय ते काय कमी आहे, जे आता तुझ्यापायी पण सारखी बोलणी खात बसू! एकदा सांगून ऐकत जा बाई. इथे काय माझं दुकान नाहीये, जे मी तुला खाऊ काढून देईन. इथे आणलेल्या सगळ्या वस्तूंचा हिशोब ठेवला जातो. तू जर यातलं थोडंसं जरी खाल्लंस तर केवढ्याला पडेल मला!” राधिका कपाळावर आठ्या आणूनच मैथिलीला बडबडत होती.
बिचारी लहानगी मैथिली आपण नक्की काय चूक करत होतो, या गोष्टीचा विचार करत मुकाट्याने आईचे बोलणे ऐकून घेत होती.
मैथिली देशमुख, अवघ्या नऊ वर्षांची एक गोड मुलगी. फार काही सोयीसुविधा उपलब्ध नसलेल्या खेडेगावात राहणाऱ्या देशमुख कुटुंबातील आताच्या पिढीतले एकुलते एक कन्यारत्न! पण हे रत्न फक्त म्हणण्यापुरतंच म्हणावं लागेल. कारण मुलींची फार बडदास्त ठेवण्याची परंपरा या कुटुंबात नव्हती. आपसूकच कन्यारत्न हा शब्द फक्त बोलण्यासाठी होता. बाकी तिची किंमत मात्र शून्यच समजली जात असे. लहानशा मैथिलीला तसे तर जन्मापासून ते आजपर्यंत, म्हणजे वयाच्या नवव्या वर्षापर्यंत आपल्या घरच्यांच्या वागण्याची सवयच झाली होती. म्हणजे निदान कळायला लागलं तेव्हापासूनचं वागणं तरी तिला समजायचं; पण त्या वागण्याचा गहन अर्थ लावण्याइतपत वयात ती अजून तरी आली नव्हती. त्यात घरातील वातावरणाचा परिणाम म्हणून ती ओरड्याच्या भीतीमुळे काही बोलायचीही नाही. त्यामुळे एखाद्या वेळी कोणी कितीही हाडतूड करून जरी बोललं तरी तिच्या मनात मात्र काही नसायचे. ती आपली आई, आपले बाबा, आपली आजी, आपली भावंडं, या सगळ्या आपलेपणानेच सर्वांसोबत बोलायला जायची. समोरून मात्र कोणीही तिला काडीचीही किंमत देत नव्हते. अगदी तिची जन्मदाती आईसुद्धा!
गावातील शाळेत तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या मैथिलीला आता आता या एक दोन वर्षांत मात्र बरेच प्रश्न पडायचे. नाही म्हटले तरी आपल्यासोबत कोण कसे वागते, कसे बोलते हे समजायचेच. मनातल्या मनात तिची बडबड, तिची चिडचिड पण सुरू असायची; पण तोंड उघडून बोलण्याची, प्रश्न विचारण्याची मुभा तिला नव्हती. त्यामुळे ती घरात दबकूनच वागायची.
“तू अजून इथेच उभी आहेस? इथून बाहेर पळ पाहू. उगीच इकडे तुझी लुडबुड नको.” मिठाई बाहेर देऊन पुन्हा स्वयंपाकघरात परतलेली राधिका मैथिलीला म्हणाली.
मैथिली बाहेर जाणारच की राधिकाने तिला आवाज दिला,
“आणि हो, जरा हळू जा. उगीच आपली उड्या मारत जाऊ नकोस. नाहीतर ते पाहून आजी तुला पाहुण्यांसमोरच ओरडेल.”
“आणि हो, जरा हळू जा. उगीच आपली उड्या मारत जाऊ नकोस. नाहीतर ते पाहून आजी तुला पाहुण्यांसमोरच ओरडेल.”
तशी होकारार्थी मान डोलावून मैथिली गप्प स्वयंपाकघराबाहेर गेली आणि घराच्या मागच्या दाराने घराबाहेर पडली.
क्रमशः
© कामिनी खाने ( संघ कामिनी )
© कामिनी खाने ( संघ कामिनी )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा