चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलद कथालेखन स्पर्धा
जलद कथालेखन स्पर्धा
शीर्षक : तिचा नंबर शेवटीच? भाग २
“मैथिली, तुला इतका वेळ एका पायावर पळायला भारी गं जमतं. मला तर लगेच दम लागतो. म्हणून माझ्यावर राज्य आलेलं मला जास्त आवडत नाही.” सानिका, मैथिलीची मैत्रीण खेळता खेळता आधी कौतुकाने अन् मग कपाळावर आठ्या आणूनच म्हणाली. नुकतंच खेळताना सानिकावर राज्य आलं होतं; पण त्याआधी ती आपली मैथिलीसोबत बोलत बसली होती.
“आवडतं मला आणि तू म्हणतेस तसा दम पण लागत नाही.” मैथिली मंद स्मित करत म्हणाली.
घराबाहेर पडलेली मैथिली तिच्या शेजारच्या मैत्रिणींसोबत लंगडी खेळत होती.
“ए चला गं, काय मधेच गप्पा मारत बसल्यात. साने, तू तुझं राज्य घे पटकन.” रेवती, या दोघींची मैत्रीण दोघींनाही काहीसं दटावतच म्हणाली.
सानिकाने लंगडी घालत यांच्यामागे पळायला सुरुवात केली आणि तिला लगेचच दम लागलेला पाहून या दोघी पळता पळता तिला हसतही होत्या.
“राधेऽऽऽ जरा तुझ्या गुणी लेकीला आत बोलाव. काय तर रस्त्यावर खिदळत बसली आहे बघ. जरा म्हणून वागण्याची पद्धत नाहीये कार्टीला. कसं व्हायचं पुढे काय माहीत!” सुनंदाबाई आपल्या सुनेला, राधिकाला दारातूनच आवाज देत म्हणाल्या.
आवाज इतका जोरात होता की इकडे समोरच्या एका बाजूला असलेल्या अंगणात खेळणाऱ्या या तिघी जणी त्या आवाजाने दचकल्याच होत्या. सुनंदाबाई पाहुण्यांना बाहेरपर्यंत सोडायला आलेल्या होत्या आणि नेमकंच त्यांनी मैथिलीला तिच्या मैत्रिणींसोबत जोरात हसताना पाहिलं होतं.
“मैथिली, तुझी आजी ओरडणार आज पण! कशी रागात इकडे आपल्याकडे बघत होती बघितलंस का?” सानिका मैथिलीला तिच्या आजीच्या हावभावांबद्दल कल्पना देत म्हणाली.
“हो ना. मला तर हिची आजी अजिबात आवडत नाही.” स्पष्ट स्वभावाची रेवती लगेचच म्हणाली.
“चला गं, मी जाते. अजून उशीर झाला तर आजी आणखीन ओरडेल.” मैथिली हळू आवाजात म्हणाली आणि पुढे त्यांचे काहीही न ऐकता तडक घरी पळाली.
राधिका दाराजवळ पोहोचलीच होती की तेवढ्यात मैथिलीच घरात शिरली.
“काय रस्त्यावर खिदळत बसली होतीस गं? आमच्या इज्जतीची काही फिकीरच नाही या पोरीला.” राधिका काही बोलण्याआधीच सुनंदाबाई फणकारल्या.
'इज्जत' या शब्दाचा धड अर्थही माहीत नसणारी मैथिली मात्र सवयीप्रमाणे आपल्या आजीचे बोलणे ऐकून घेत होती.
सुनंदाबाईंनी पुढेही बरंच काही ऐकवलं आणि अखेर गप्प झाल्या. तसा बिचाऱ्या मैथिलीने सुटकेचा निःश्वास टाकला.
क्रमशः
© कामिनी खाने ( संघ कामिनी )
© कामिनी खाने ( संघ कामिनी )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा