Login

तिचा नंबर शेवटीच? भाग ३ अंतिम

तिचा नंबर नेहमी शेवटीच का असतो?
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलद कथालेखन स्पर्धा

शीर्षक : तिचा नंबर शेवटीच? भाग ३ अंतिम


“राधे, हे पोरांना दे गं.” सुनंदाबाई खाऊकडे खुणावत म्हणाल्या.

“हो आई.” इतके बोलून राधिका लगेचच पुढे सरसावली.

मैथिली मात्र एका कोपऱ्यात गप्प उभी होती. तिच्या बालसुलभ मनामध्ये क्षणात खाऊविषयी ओढ दाटून आली; पण शेवटी तिला स्वतःलाच काही गोष्टींची जाणीवही होतीच.

‘जे मिळेल ते घ्यायची सवय करून घ्यावी पोरीच्या जातीने. आपल्यासाठी काही उरलं तर ठीक, नाहीतर गप्प बसायचं.’ आईचे कित्येकदा ऐकवलेले हे वाक्य तिच्या मनात जणू कोरले गेलेले.

एव्हाना तिच्या पोटात भुकेमुळे कावळे ओरडत होते. तसे बोलून दाखवण्याची मुभा मात्र तिला नव्हतीच.

‘मागू का आईकडे खायला काहीतरी? पण नकोच! आजी इकडेच आहे म्हणजे ओरडा मिळेल उगीच आणि आई पुन्हा त्यावरून पण चिडचिड करेल.’ मैथिलीच्या मनात असे विचारचक्र सुरू होते.

इतक्यात समोरून राधिका तिच्याजवळ एक लहानशी वाटी घेऊन येत म्हणाली,
“हे धर. खाऊन घे. जेवायला घेईन थोड्या वेळाने. आज असं पण उशीरच झालाय. त्यामुळे लगेच काही येऊ नकोस.”

वाटीत एक लहानसा मिठाईचा तुकडा आणि थोडीशी शेव होती. राधिकाच्या आवाजात ममत्वाची झालर जरी नसली, तरी छोटी मैथिली मात्र यानेही फार खूश झालेली. तो आवडत्या मिठाईचा तुकडा तिच्या तोंडातच नाही तर मनातही गोडवा पसरवून गेलेला.


दुसऱ्या दिवशी दुपारी खेळताना रेवतीने विचारले,
“ए मैथिली, काल घरी गेल्यावर भरपूर ओरडा मिळाला का गं?”

“ हां म्हणजे नेहमीसारखंच...” मैथिली क्षणभर थांबून म्हणाली.

“काल पाहुणे आले होते म्हणजे खाऊ पण असेल ना गं घरी? दिला का तुला? की तुझी ती हिटलर आजी बोलणीच ऐकवत बसलेली?” सानिकानेही लगेच विचारले.

“हो. शेवटी दिला ना आईने खाऊ आणून.” मैथिली काहीशी खूश होत म्हणाली खरी; पण तिच्या चेहऱ्यावरचा हा आनंद फार काळ टिकला नव्हता. कारण पुढच्या क्षणी ऐकू आलेले रेवतीचे शब्द तिच्या मनात घर करून गेले.

“शेवटी? काहीही असलं तरी तुला कायम शेवटीच का देतात गं? आमच्या घरी तर असं काही नाही करत कोणी.”

“काय माहीत! काही विचारलं तर आजी रागवतच असते माहितीये ना आणि आईला ओरडा मिळतो मग आई पण रागावते. 'माझ्यामुळे त्रास होतो.' असंच बोलतात सगळे. मग मी पण गप्प बसते.” मैथिली कसेनुसे हसत म्हणाली.

वरवर हसणाऱ्या, खुलू पाहणाऱ्या त्या इवल्याशा कळीच्या मनात मात्र 'माझा नंबर सर्वात शेवटीच का असतो?' हा गहन प्रश्नरूपी काटा खोलवर रुतू पाहत होता.