उंबऱ्याच्या आत परकी : भाग २
एव्हाना गालावर ओघळलेले अश्रू सुकून गेले होते. प्रणितीच्या मनावर झालेल्या जखमा मात्र प्रत्येक क्षणागणिक आणखी ठणकत होत्या. जणू काही तिला स्वतःच्या ओलाव्याची जाणीव करून देत होत्या.
ही प्रणिती पाटील, प्रमोद आणि सुलभा पाटील यांची थोरली कन्या. प्रणितीचा लहान भाऊ साहिल पाटील, जो तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होता. प्रणिती लहानपणापासून खूप हुशार, मनमिळाऊ, तितकीच शांत आणि समजूतदार अशी मुलगी. साहिल मात्र तिच्या अगदीच उलट स्वभावाचा, विरुद्ध गुणांचा होता. तरीही लहान असण्याच्या आणि 'वंशाचा दिवा' या कारणांमुळे साहिलचे पारडे नेहमीच जड ठरायचे. तशी तर लहानपणापासून हेच बघत आलेल्या प्रणितीला या सर्व गोष्टींची सवयच होऊन गेलेली. त्यामुळे ती घरच्यांकडे दुर्लक्ष करत स्वतःत मग्न राहणे पसंत करायची.
आताशा मात्र सगळे विषय उठसूठ प्रणितीपाशी येऊन थांबायचे. अगदी संबंध नसतानाही! त्यामुळे प्रणितीच्या स्वभावातही हळूहळू बदल जाणवत होते.
साहिल! गेल्या दोन - अडीच वर्षांपासून फारच बदलला होता. तसा तर आधीही घरच्यांच्या लाडांमुळे हट्टी, कसेही वागणारा होताच म्हणा; पण आता त्याचे बेलगाम वागणे वाढले होते. घरचे लोक मात्र हे वागणे सपशेल दुर्लक्षित करायचे. तेही एकवेळ मान्य केले! पण या सगळ्यात प्रणिती उगीचच भरडली जात होती. तिच्या मनाचा विचार कोणीही करत नव्हते.
प्रणितीला काही महिन्यांपूर्वी घडलेल्या घटना आठवल्या.
त्यादिवशी घरात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. प्रणिती घरात एकटीच होती. सुलभा आणि प्रमोद काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते आणि साहिलही कुठेतरी गेलेला. अशातच संध्याकाळी साधारण पाच वाजता कोणीतरी दरवाजा वाजवला.
प्रणितीने घाईघाईने दार उघडले आणि समोर उभ्या असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींना पाहून तिने काहीसे प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिले.
“हे साहिलचंच घर आहे ना?” त्यातल्या एका मध्यम वयाच्या व्यक्तीने कठोर आवाजात विचारले.
“हो. साहिलचंच घर आहे हे आणि मी त्याची मोठी बहीण आहे.” प्रणितीने उत्तरादाखल म्हटले.
“अच्छा! तुमचा भाऊ आहे तर. हे बघा, त्याच्यामुळे आमचं खूप नुकसान झालंय. व्यवसायाच्या नावाखाली आमची बरीच फसवणूक केलीय त्याने. पैसा लुबाडलाय आमचा. आम्ही पुराव्यानिशी आलोय इथे.” इतके बोलून त्यांनी मोबाईलमधील काही स्क्रीनशॉट्स, पेमेंट्सचे पुरावे आणि साहिलच्या सोशल मीडियावरील चॅट्स दाखवले.
हे सगळे पाहून प्रणिती तर घाबरलीच होती.
क्रमशः
© कामिनी खाने
© कामिनी खाने
सदर कथेचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा