उंबऱ्याच्या आत परकी : भाग ३
“हे.. हे खरं नसेल. तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल.” तरीही स्वतःला सावरून प्रणितीने एकदा समजावण्याचा प्रयत्न करत म्हटले.
“तुमचा मुलगा बाहेर काय करतो हे अजून तुम्हां लोकांना माहीतच नाहीये वाटतं. जरा डोळे उघडून लक्ष ठेवा. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्याआधी इथे आलोय कारण घरी माहीत असावं. लवकरात लवकर आमचे पैसे द्यायला सांगा. नाहीतर सरळ पोलीस स्टेशनमध्ये भेटू.” त्यातील एक व्यक्ती तावातावाने म्हणाली आणि ते दोघेही तिथून निघून गेले.
प्रमोद आणि सुलभा घरी परतल्यावर प्रणितीने लागलीच हे प्रकरण त्यांच्या कानावर घातले.
“काहीही काय! त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल. साहिल असं काही करणार नाही.” प्रमोद नेहमीप्रमाणे साहिलवर आंधळा विश्वास दाखवून म्हणाले.
“हो ना. कोणी पण येऊन काहीतरी सांगेल आणि आपण विश्वास ठेवायचा होय! हल्ली लोक उगीच कोणाला अडकवू पाहतात. पुरावे दाखवले म्हणजे सगळं खरं होत नाही.” सुलभासुद्धा नेहमीप्रमाणे पुत्रप्रेम दाखवत म्हणाली.
“पण मी स्वतः पुरावे बघितले आहेत. इतक्या सगळ्या गोष्टी कोणी घरापर्यंत येऊन खोट्या का सांगेल? एकदा शहानिशा तर करा.” प्रणितीने पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला.
“तू हल्ली फारच डोकं चालवतेस. तो आला की शांतपणे काय ते विचारू आम्ही. तू नको काळजी करूस. उगीच त्याच्या मागे हात धुवून लागली आहेस.” सुलभा जराशा चिडक्या स्वरात म्हणाली.
“मला काही हौस नाहीये. आणि मी काही त्याच्या मागे लागले नाहीये. पण त्याची काही चूक असेल तर जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे ना? पोलीस घरी आले तर काय कराल?” प्रणितीनेही चिडूनच उत्तर दिले.
पण पुन्हा तेच!
“आम्हाला अक्कल शिकवू नकोस!” या वाक्याने तिच्या मनाला पुन्हा एकदा दुखावले होते.
पुढे साहिल दोषी आहे हे समजूनही घरातून साहिलला पाठीशी घातले गेले. साहिलने थोडे दिवस गप्प बसणे पसंत केले खरे; पण वागणे काही फारसे सुधारले नव्हतेच.
या सगळ्यात प्रणिती मात्र मनोमन खचत चाललेली. नेहमीप्रमाणे तिला दोषी ठरवले गेले होते. तिच्या बोलण्याला, मताला सरळसरळ धुडकावले जात होते.
आता यावेळी पुन्हा एकदा साहिलने घातलेल्या गोंधळासाठी ती काही म्हणाली आणि पुन्हा एकदा तिला तिची जागा दाखवली गेली होती. या घरासाठी कितीही विचार केला तरी त्यांच्यासाठी मात्र ती परकीच होती.
क्रमशः
© कामिनी खाने
© कामिनी खाने
सदर कथेचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा