Login

व्यथा त्याच्या लग्नाची

मुलींच्या अवाजवी अपेक्षा आणि लग्न न जमणारा तो...
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
लघुकथा फेरी

शीर्षक : व्यथा त्याच्या लग्नाची


दुपारच्या जेवणाची वेळ झाली तरी अनघ त्याच्या क्युबिकलमध्येच बसून होता. दोन तीन वेळा आवाज देऊनही त्याचं लक्ष नाहीये हे पाहून स्वरूप त्याच्या जवळ गेला आणि जोरातच आवाज दिला,
“अनघ! अरे जेवायचं नाही का? चल पटकन. सगळे वाट पाहत आहेत.”

तसा भानावर येत होकारार्थी मान हलवून अनघ स्वरूपसोबत जेवायला गेला. तिथे सर्वांसोबत असूनही तो मनाने मात्र तिथे हजर नव्हता. स्वरूपच्या ते लक्षात आलं होतं; पण नंतर एकट्याने विचारूया हा विचार करून त्याने सध्या गप्प राहणं पसंत केलं. जेवणं आटोपल्यावर थोड्या गप्पा मारून सर्व आपापल्या कामात व्यस्त झाले होते. घरी जाण्याची वेळ झाली आणि स्वरूपने अनघला गाठलं.

“अनघ, कॅफेमध्ये जाऊयात का रे? आज त्या बाजूच्या कॅफेमधली स्पेशल कॉफी प्यायची इच्छा आहे आणि आपल्या पण थोड्या गप्पा होतील.”

स्वरूपने विचारल्यावर अनघनेही होकार दिला आणि दोघेही जवळच असलेल्या कॅफेत गेले. कॉफीची ऑर्डर देऊन स्वरूपने असंच इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली. सकाळपासून गप्प असणारा अनघही आता बऱ्यापैकी मोकळा होत होता.

हे पाहून वेळ न दवडता स्वरूपने त्याला विचारलं,
“अनघ, काही झालं आहे का? सकाळपासून कुठेतरी हरवलेला आहेस.”

“सहजच रे, काही खास नाही.” अनघ म्हणाला.

“हे बघ अनघ, सगळ्यांसमोर बोलायला नको म्हणून मी दुपारी विषय घेतला नाही; पण तुझं काहीतरी बिनसलंय इतकं तर मला कळतंय. जे काही आहे ते मनमोकळेपणाने बोल. माझ्यावर आणि आपल्या मैत्रीवर इतका विश्वास तर तू ठेवूच शकतोस.” स्वरूप त्याला शांतपणे म्हणाला.

“अरे विश्वास आहेच रे; पण काय अन् कसं बोलू, हेच कळत नाहीये.” अनघनेही त्याचं बोलणं समजून घेत उत्तर दिलं.

“काही सिरियस?” स्वरूपने काळजीने विचारलं.

“म्हटलं तर सिरियस, म्हटलं तर फार काही नाही.” अनघ म्हणाला आणि इतक्यात वेटरने कॉफी आणून दिली. कॉफी घेता घेता अनघने बोलायला सुरुवात केली,

“तुला तर माहितीये की घरी माझ्या लग्नाचा विषय सुरू आहे.”

“हो, मागच्या वर्षीपासूनच तुझ्या घरी मनावर घेतलंय ना; पण मग त्याचं काय?”

स्वरूपने असं विचारल्यावर अनघ स्वतःशीच हसला आणि म्हणाला,
“सध्या तोच तर मोठा प्रश्न झाला आहे.”

“म्हणजे?” स्वरूप न कळून म्हणाला.

“म्हणजे मला वाटायचं की मी चांगला सेटल झालो आहे. आता खरंच लग्न करायला काही हरकत नाही; पण आता मात्र मीच विचारात पडलोय, नक्की मी सेटल झालो आहे?”

अनघचं बोलणं ऐकून स्वरूप काहीसा गोंधळून म्हणाला,
“अरे, हे काय भलतंच! इतकी चांगली नोकरी आहे. घरचं पण चांगलं आहे. स्वतःचं घर आहे. गाड्या आहेत. अजून काय हवं असतं सेटल व्हायला?”

“याच भ्रमात तर मी जगत होतो; पण आता कळतंय की हेसुद्धा कमीच आहे. मी मुली बघतोय ना, त्यांच्या अपेक्षा ऐकून आता कुठे मी वास्तवात आलो आहे.” अनघ म्हणाला.

“का रे? तुझ्यासारख्या मुलाला नाकारणं म्हणजे मूर्खपणाच नाही का!”

“नाकारणं? काही मुली तर माझ्यासारख्या मुलाचं स्थळ बघायलाही तयार नसतात.” एवढं बोलून अनघने कॉफीचा एक घोट घेतला आणि त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली.

“फार दूर कशाला जायचं! कालचंच उदाहरण सांगतो. दोन दिवसांपूर्वी मला एक स्थळ सुचवलं होतं. मुलगी आवडली म्हणून मी तर बघायला होकार दिला होता; पण कालच मध्यस्थी असणाऱ्याने मुलीचा निरोप कळवला. निरोप काय होता माहितीये? मुलगा नीट सेटल नाहीये.” इतकं बोलून शेवटच्या वाक्यावर अनघ काहीसा हसला.

“तिला असं काय हवं होतं? अरे तुला पन्नास हजार पगार आहे. बाकी चैनीच्या गोष्टींची पण कमी नाहीये. घरी म्हणशील तर चौकोनी कुटुंब, त्यात पण ताईचं तर लग्न झालं आहे. मग अजून काय अपेक्षा होत्या अशा?” यावेळी स्वरूप काही गोष्टी स्पष्ट करत आणि तरीही जरा गोंधळलेल्या स्वरातच म्हणाला.

“अरे असं बोलणारी ही एकच मुलगी नाही. बरेचदा मी हे कारण ऐकलंय. म्हणे हल्ली पन्नास हजारात काय होतंय.”

“वाह! हल्ली या स्पर्धेच्या युगात दहा हजारांची नोकरी मिळवणं पण कठीण झालं आहे आणि यांना पन्नास हजार पण कमी वाटतायत.” स्वरूप काहीसा उपहासात्मक स्वरातच म्हणाला.

“हो आणि हे इथवरच थांबत नाही. मुंबईत आमचा चांगला टू बीएचके फ्लॅट आहे ना; पण त्यातही एरिया इतका खास नाही, अजून थोडा लॅविश फ्लॅट हवा म्हणून मुलाला नाकारलं जातंय.” अनघ म्हणाला आणि स्वरूपने तर डोक्यालाच हात मारून घेतला.

अनघने पुन्हा स्वरूपला सांगायला सुरुवात केली,
“हे तर ठीक आहे असंच म्हणावं लागेल. भविष्याच्या दृष्टीने अपेक्षा करतायत, हे आपण समजून घेऊ शकतो; पण काही गोष्टींवर काय बोलावं हेच कळत नाही. मध्यंतरी मॅट्रिमोनी साइटवर एक मुलगी पसंत पडली होती. तिला आणि तिच्या घरच्यांनाही आमचं स्थळ पसंत होतं. भेटीचा कार्यक्रम होण्याआधी बोलून घ्यावं म्हणून आम्ही फोनवर बोलत होतो; पण दुसऱ्याच फोनमध्ये तिने मला काय प्रश्न विचारला माहितीये?”

“काय?” स्वरूपनेही लगेच विचारलं.

“लग्नानंतर डस्टबिन कुठे राहणार?”

अनघच्या बोलण्यावर न कळून स्वरूपने पुन्हा विचारलं,
“म्हणजे? हा काय प्रश्न झाला?”

“माझी पण अशीच प्रतिक्रिया होती; पण उत्तर ऐकून मी चांगलाच ताळ्यावर आलो. 'डस्टबिन डस्टबिनच्याच जागेवर राहणार ना, त्यात काय विचारायचं?' असं मी साधेपणाने म्हणालो. तर तिचं उत्तर होतं की, डस्टबिन म्हणजे माझे आईबाबा. आता मला सांग यावर मी काय बोलायचं?”

“देवा! याला काय म्हणायचं. सरळसरळ डस्टबिन म्हणाली?”

“हो. घरी मी माझा स्पष्ट नकार कळवला. आईने विचारल्यावर तिला हे सर्व सांगितलं. खरं सांगायचं तर तिला पण या सगळ्या गोष्टींचं फार वाईट वाटतं रे; पण या अशा गोष्टींबाबत तरी मी तडजोड करू शकणार नाही, ना कोणाच्या अवाजवी अपेक्षा पूर्ण करू शकत.” अनघ आपलं स्पष्ट मत व्यक्त करत म्हणाला.

“हो तर! या असल्या मागण्या पूर्ण करणं म्हणजे अवघडच आहे.” स्वरूपनेही त्याच्या बोलण्याला दुजोरा देत म्हटले.

“अरे पण आई... तिला एकीकडे हे पटत नाहीये; पण दुसरीकडे तिचं म्हणणं आहे की लग्न म्हटलं की तडजोड केलीच पाहिजे. आता मला सांग... दिखाऊ गोष्टींची, आयुष्यावर फार फरक न पडणाऱ्या गोष्टींबाबत तडजोड करू शकतो आपण; पण या असल्या मागण्यांसाठी काय तडजोड करू? आईबाबांना एकटं सोडण्याची तडजोड? पैसा मी मेहनतीच्या जोरावर आणखी कमवेनच की; पण ज्या कमाईने आणि ज्या संसाराने मी माझ्या आईबाबांना सुख देऊ शकत नाही, त्यांना अडगळ समजून बाजूला ठेवून देण्याची वेळ येईल,‌ त्या कमाई अन् संसाराला अर्थच काय आहे! आज मी जो काही आहे तो निव्वळ त्यांच्यामुळेच ना... मग या अशा अटी-नियमांमध्ये अडकून भलत्याच जाळ्यात का फसू?” अनघने अगदी मनापासून मनातल्या भावना व्यक्त केल्या.

“खरंय रे! तुझ्यासारखे ठाम विचार असायलाच हवे याबाबत. पटतंय मला तुझं म्हणणं. काकी म्हणतात ते त्यांच्या दृष्टीने योग्य आहे तसं, कारण त्या काळजीपोटी बोलत आहेत; पण तू म्हणतो आहेस ते आणखी जास्त योग्य आहे. लग्न काय रे, कधीतरी होईलच; पण आईबाबा सोबत असले की जीवाला एक वेगळंच समाधान असतं.”

“हो. म्हणून मी घरी स्पष्ट नकार कळवला. म्हटलं होईल तेव्हा होईल लग्न! नाहीच झालं तरी हरकत नाही.”

अनघने असं म्हणताच स्वरूप पटकन म्हणाला,
“असं कसं नाही होणार! माझ्या एवढ्या देखण्या, टॅलेंटेड मित्राला तर एखादी मस्त बायको भेटेल. वहिनी भेटू दे फक्त, मग त्यांच्या समोर तुझ्या आणि त्यांच्या पण कौतुकाचे पूल बांधेन.”

यावर अनघ आणि स्वरूप दोघेही खळखळून हसले.


त्याचवेळी तिथे कॅफेमध्ये मात्र या दोघांच्या गप्पा कोणीतरी लक्षपूर्वक ऐकत होतं. ती होती मैत्रा... एक मनमौजी, तरीही समजूतदारपणाचं भन्नाट असं रसायन म्हणायला हरकत नाही. ती आपल्या मैत्रिणीसोबत तिथे मागच्याच टेबलवर बसली होती. आल्यापासून अनघ आणि स्वरूपच्या सुरू असलेल्या गप्पा ऐकून ती अनघवर भलतीच खूश झालेली. जणू तिचा शोध संपल्याची तिला चाहूल लागली होती....

“काय विचार चाललाय?” चैत्रालीने तिच्या कानाशी अगदी हळू आवाजात कुजबुजत म्हटलं.

“तोच विचार... जो तुझ्या मनात आला असेल.” मैत्रा तिला दात दाखवतच म्हणाली.

“तू खरंच?” चैत्रालीने तरीही शंकेच्या स्वरात विचारले.

“येस डियर!” तिने डोळे मिचकावत उत्तर दिले आणि सरळ उठून अनघ असलेल्या टेबलपाशी गेली.

“हाय...” मैत्राने आळीपाळीने अनघ आणि स्वरूपकडे बघत म्हटले.

त्या दोघांच्या प्रश्नार्थक नजरा पाहून तिनेच अनघकडे पाहून बेधडकपणे बोलायला सुरुवात केली,
“मी मैत्रा. फार्मा कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करते. सगळ्यात आधी तर सॉरी. कोणाच्या वैयक्तिक गप्पा ऐकू नयेत; पण मी मघापासूनचं तुमचं सगळं बोलणं ऐकलं. खरंतर सुरुवातीला विषय पाहूनच जाणीवपूर्वक दुर्लक्ष न करता मनापासून ऐकलं सगळं.”

अनघ आणि स्वरूप मात्र अजूनही तिला काहीशा गोंधळलेल्या नजरेने बघत होते.

“मला माहितीये, तुम्हाला खूप प्रश्न पडले असतील; पण ओळख करून दिली आहे मी माझी, तर आता अजिबात वेडंवाकडं वळण न घेता बोलते. मला माझा जोडीदार जसा हवा होता, त्या अपेक्षा पूर्ण करणारा कोणी भेटलाच नाही कधी. सगळे आपले स्टॅण्डर्ड मेंटेन करण्याच्या मागे नि आईबाबांच्या मताला म्हणावी तितकी किंमत न देणारे! पण मला मात्र जोडीदारात एक साधेपणा, समजूतदारपणा हवा आहे. आईबाबांची कदर करणारा साथीदार हवाय. आता तुमच्या गप्पा ऐकून वाटलं हेच ते, जे मी शोधत होते. आय नो तुम्ही म्हणाल आपली ओळख नाही, कोण कुठली मुलगी येऊन बोलत आहे हे सगळं; पण खरंच, यू कॅन ट्रस्ट मी... अरेंज मॅरेजमध्ये कुठे ओळख असते आधीपासून? आपण पण त्या दृष्टीने एकमेकांची ओळख करून घेऊयात. बट आय रिअली फील लाईक इट विल वर्क फॉर श्युअर... उत्तराची काही घाई नाही बरं. आता ओळख करून घ्यायला तरी हरकत नसेल ना तुमची?” मैत्राने भरभर आपले म्हणणे स्पष्ट शब्दांत अनघसमोर मांडले आणि शेवटी आपला हात पुढे केला.

अचानक मिळालेल्या या अनपेक्षित धक्क्यातून सावरत अखेर अनघनेही हलके हसून मान डोलावली आणि तिच्या हातात हात मिळवला.

“अरे व्वा! लगेच वहिनी भेटल्याही.” स्वरूप आपली उत्सुकता दर्शवत म्हणाला.

“अजून बोलणं बाकी आहे.” अनघ त्याला काहीसा दटावतच म्हणाला.

“तुझी नजर तर काही वेगळंच सांगत आहे पण... ह्म्म...” स्वरूप भुवया उंचावून अनघला चिडवत म्हणाला.

यावर अनघ आणि मैत्रा दोघांच्याही चेहऱ्यावर काहीशा गुलाबी छटा पसरल्या होत्या.

त्याच्या लग्नाच्या व्यथा आता एका गोड कथेच्या प्रवासाला निघाली होती.
समाप्त
© कामिनी खाने ( संघ कामिनी )

सदर लिखाणाचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.

0