Login

नाती जिव्हाळ्याची - भाग ९

नाती जिव्हाळ्याची भाग ९
नाती जिव्हाळ्याची - भाग - ९

सरळ मुद्याला हात घालत मामा म्हणाले, “मी जास्त काही आढे वेढे घेणार नाही, जे आहे ते स्पष्टच बोलतो. मी तुमच्या तन्वीसाठी माझ्या भाच्याचे म्हणजे सुजयचे स्थळ घेऊन आलोय. मला माहित आहे की तुमचे त्याच्याविषयी फारसे चांगले मत नाही. पण आता तो पूर्वीसारखा राहिला नाही. त्याने खूप प्रगती केली आहे. पुण्यासारख्या मोठ्या शहरात त्याने स्वतःचे बस्तान मांडले आहे. स्वतः चा बिझनेस आणि स्वतः चा फ्लॅट आहे त्याचा. तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही स्वतः जाऊन खात्री करून घेऊ शकता. पण आत्ता सद्या तुम्हाला काय वाटतं? तुमचं जे काही मत आहे ते तुम्ही स्पष्ट सांगितले तर बरं होईल”

थोडेसे गोंधळलेल्या अवस्थेत असलेले तन्वीचे बाबा स्वतः ला सावरत म्हणाले, “मला सगळं माहीत आहे. सुजय आणि तन्वीची जवळीक पूर्वी मलाही खटकत होती. कारण तेव्हा तो लहान होता. शिवाय त्याची आर्थिक परिस्थितीही चांगली नव्हती. पुढे जावून माझ्या मुलीला कोणताच त्रास होऊ नये या उद्देशाने मी त्या दोघांना कधी एकत्र येऊ दिले नाही. आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार करणे यात काहीच गैर नाही असे मला वाटते.”

त्यांचे बोलणे शांतपणे ऐकून घेत मामा पुढे म्हणाले, “तुमचे म्हणणे अगदी रास्त आहे. पण आता तो पूर्वीचा सुजय राहिला नाही. त्याची आर्थिक परिस्थिती खूप उत्तम आहे. आणि बरं का.. विशेष म्हणजे ते सगळे विश्व त्याने स्वतः च्या मेहनतीवर उभे केलेय. तुमच्या मुलीला कशाचीही कमी पडणार नाही याची पूर्ण खात्री आहे मला.”

अशा गोष्टींचा निर्णय लगोलग घेणे कुणालाच शक्य होत नाही त्यामुळे तन्वीचे बाबा म्हणाले, “मी विचार करून कळवतो तुम्हाला. शेवटी माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा!”

त्यांना समजून घेत मामा म्हणाले, “ठीक आहे.. मला चालेल पण जो काही निर्णय असेल तो लवकर कळवा म्हणजे झालं.”

“बरं मग निघतो आता. बराच वेळ घेतला तुमचा. बोलू आपण यावर. तुमचा विचार कळवल्यावर.” असे म्हणत मामा तिथून बाहेर पडले.

सगळी चौकशी करून तन्वीच्या बाबांनी सुजयची पूर्ण आणि खात्रीशीर माहिती काढली. मामांनी सांगितलेलं सगळं खरं होतं हे पटल्यावर त्यांना थोडा दिलासा मिळाला. काही दिवसांनी ते तन्वीला जवळ बोलवून घेत‌ म्हणाले, “हे बघ तन्वी.. मला तुझ्याशी जे बोलायचे आहे ते तुझ्या भविष्यावर परिणाम करणारे आहे. आजवर मी फक्त तुझा विचार करूनच वागत आलोय. कधी कठोर झालो तर कधी प्रेमाने वागलो. पण जे काही केले ते तुझ्या भल्यासाठीच. यापुढेही जे काही करेन ते तुझ्या चांगल्यासाठीच असेल. तू आणि सुजय हे लहानपणापासूनचे मित्र आहात याची मला कल्पना आहे. तुझ्या मनात नक्की काय आहे हे मला नि:संकोच सांगितलेस तर बरं वाटेल.”

बाबांनी अचानक हा विषय काढल्यामुळे तन्वीला काय बोलावे हे सुचेना. ती गोंधळात पडली. पण शेवटी वडिलांनी जे विचारले य ते सांगणे गरजेचे होते त्यामुळे ती म्हणाली, “बाबा.. मला लहानपणापासून एक मुलगा आवडतो. त्याच्यावर माझे प्रेम आहे. पण तुमच्या शब्दाबाहेर मी जाणार नाही. तुमची जी इच्छा असेल तसेच होईल.”

बाबांना थोडा अंदाज आला होता. पण तरीही तन्वीच्या तोंडून ऐकायचे होते म्हणून ते तिला म्हणाले, “ कोण आहे तो मुलगा ते सांग?”

वडिलांनी तिला नेहमी मोकळेपणे बोलण्याचे स्वातंत्र्य दिल्यामुळे ती म्हणाली, शेजारच्या घरातील त्या सीता आत्त्या आहेत ना! त्याचा मुलगा सुजय. जो माझ्याशी मैत्री करायचं ते तुम्हाला पटत नव्हते तोच मला खूप आवडतो. माझे त्याच्यावर खूप खूप प्रेम आहे.”

अगदी थंड डोक्याने बाबा तन्वीला म्हणाले, “अगं पण तू कधी बोलली नाहीस तसे.”

थोडीशी दबक्या आवाजत ती बाबांना म्हणाली, “तसे कसे बोलणार मी बाबा? तुम्हाला तो आवडत नव्हता ना! मग तुमच्या मनाविरुद्ध मी काय बोलणार पण मी मनापासून त्याच्यावर प्रेम करतेय ओ!”

मुलीच्या भावना वडीलांपर्यंत पोचल्या होत्या. तिच्या मनाचा आणि संपूर्ण जीवनाचा विचार करून वडिलांनी एक निर्णय घेतला. तो निर्णय सांगण्यासाठी त्यांनी सुजयच्या मामाची भेट घ्यायचे ठरवले.

वेळ काढून ते मामांना भेटायला गेले अन् म्हणाले, “मला तुमचा प्रस्ताव पटलेला आहे. माझा सुजयवर वैयक्तिक असा कोणताच राग नव्हता फक्त माझ्या मुलीसाठी मी थोडा इनसिक्युअर झालेलो. पण सुजय खरोखर एक चांगला मुलगा आहे हे मला पटले आहे. शिवाय तन्वीचे त्याच्यावर प्रेम आहे त्यामुळे तिच्या मनाचा विचार करून मी सुजय आणि तन्वीच्या लग्नाला तयार आहे.”

त्यांचे बोलणे ऐकून मामांना खूप आनंद झाला. ते म्हणाले, “योग्य निर्णय घेतलाय तुम्ही. मुलांच्या सुखापुढे सगळं काही फिकं पडतं हे खरंय ना.”

हो ला हो देत आनंदाने तन्वीचे बाबा म्हणाले, “हो अगदी बरोबर. चला तर मग सुजयला बोलावून घ्या मी स्वतः त्याला माझ्या तन्वीसाठी मागणं घालतो. आजवर मी त्याच्याशी जे गैरवर्णत केले त्याची भरपाई म्हणून इतकं तर करावंच लागेल मला. बिघडलेल्या गोष्टी सुधारण्याची ही एक संधी आहे. निघतो मी आता म्हणून ते आपल्या घरी जायला निघाले.”

“अगदी उत्तम निर्णय घेतला तुम्ही. मी उद्याच त्याच्या ऑफिस मध्या फोन करून त्याला लगेच बोलावून घेतो.चालतंय मग भेटू तो आल्यावर.” असे म्हणत मामांनी तन्वीच्या बाबांना निरोप दिला.”

—-----------

क्रमशः

—--

सुजय मुंबई ला जाईल का? त्याचे नि तन्वीचे लग्न होईल का? ते पाहूया पुढील भागात.
—-----

©® सौ. वनिता गणेश शिंदे