भाग १६
शिपायांनी मार्तंड आणि सावित्रीला पकडलं. मार्तंड स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला काही समजायच्या आत शिपायांनी त्याचे हातापाय जाड दोरखंडानी बांधले होते. त्याला बंदी बनवण्यात आलं. त्यांच्या मागोमाग संथ चालीनं फाजलखान येत होता. त्याला येताना पाहताच शिपाई बाजूला सरकले.
“कहाँ भाग रहे थे काफर? इस लडकीको कहाँ लेकर जा रहे थे? तुम्हे क्या लगा हम बेवकूफ है? हमे कुछ पता नहीं चलेगा?”
फाजलखान गरजला.
“मला कशापाई धरलंय? म्या काय केलंय? गुमान सोडा मला.. बाजीराजं खवळत्याल त्यास्नी हे समजलं तर..”
“खामोश.. अपने आप को बहोत सुरमाँ समझते हो? हमारे आँखोमे धूल झोँक रहे हो? अब देख, तेरा क्या हश्र होगा.. तुमने कभी ख्वाबमे भी सोचा नही होगा| अब्बाजान तुम्हे ऐसी सजा देंगे की तेरी रुह कांप उठेगी फिर कोई गद्दार, एहसानफरामोश पैदाही नही होगा| ले जावो इस नमकहरामको.. और अब्बाजानके सामने इसे पेश करो.. अब अब्बाजानही इसका फैसला सुनायेंगे..”
शिपायांनी त्याची पकड अजून आवळली. हातापायात, गळ्यात जाड दोरखंड घातल्यानं त्याला नीट चालताही येत नव्हतं. शिपाई मार्तंडला खेचत बाहेर नेत होते. फाजल खानानं एक नजर सावित्रीवर टाकली. तिचं ते बावनकशी सौन्दर्य वखवखलेल्या नजरेने पिऊ पहाणाऱ्या फाजलची नजर तिच्या सर्वांगावर फिरली. तसं सावित्रीला त्याची किळस वाटली. तिच्या डोळ्यातून अंगार बरसत होता.
“और इस खूबसूरत बला को बंदी बनाके बाकीके लडकियोंके साथ डेरेमें कैद कर दो और इसकी हरकतो पे कडी से कडी नजर रखो| अब रात बहुत हो चुकी है| आब्बाजान आराम फर्मा रहे होंगे| हम कल आब्बाजानके सामने इसे हाजीर करेंगे.. वोही इसका फैसला करेंगे| अब वही इसके खुदाह.. परवरदिगार..”
छदमी हसत फाजलखान म्हणाला.
“जा रं मुडदया.. त्यो कोन हाय माजा फैसला सुनविनारा? आमचा देव येकच.. फकस्त आमचं शिवबा राजं.. आन माज्या राजाच्या नखाची बी सर यायची नाय त्येला..”
ती संतापानं फणफणत होती.
“ले जाव यहाँसे इसे..”
फाजल खानानं हुकूम दिला. शिपायांनी सावित्रीला ओढत बाहेर जिथे बाकीच्या मुलींना, स्त्रियांना डांबून ठेवलं होतं त्या डेऱ्याजवळ आणलं. त्यांनी तिला आत ढकलून दिलं. बाहेर पाच सहा शिपायांना तैनात केलं.
“इसपे कडी नजर रखो भाग ना पाये.. ”
सावित्री आणि इतर स्त्रियांना कडक बंदोबस्तात ठेवून शिपायांना चेतावणी देऊन ते तिथून निघून गेले.जमिनीवर कोसळलेली सावित्री पुन्हा चवताळून उठली..
“सोड मला मुडद्या.. सोड नीच माणसा..”
ती डेऱ्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती. मोठमोठ्याने ओरडत होती पण काहीच उपयोग झाला नाही. शिपाई आत आले.
“ये ऐसे नही मानेगी. इसे भी डोरसे बांध देते है वरना ये भाग जायेगी|”
त्यापैकी एक शिपाई म्हणाला. शिपायांनी तिला जाड दोरखंडाने बांधून टाकलं आणि ते पुन्हा बाहेर जाऊन पहारा देऊ लागले. सावित्रीने डेऱ्यात आजूबाजूला पाहिलं. तिच्या सारख्या पळवून आणलेल्या बऱ्याच स्त्रियां, मुली होत्या. आगतिक.. हतबल झालेल्या.. त्यांच्यातली एक स्त्री सरकत तिच्या जवळ आली आणि म्हणाली.,
“बाय गं, कोण हाईस तू? गाव कंचं तूजं? तू कशी काय घावलीसं या खानाच्या शिपायांच्या तावडीत?”
“म्या सावू.. सावित्री माजं नाव.. सुर्वेवाडी, पन्हाळा माजं गाव हाय. पर तुम्हास्नी का बरं इथं डांबून ठिवलंय?”
सावित्रीच्या प्रश्नासरशी त्या बायका रडू लागल्या. आणि त्यांनी त्यांची कर्मकहाणी सांगायला सुरुवात केली. काही त्यांच्या डोळ्यातल्या आसवांनी सांगितली.
“इथं रोज बायस्नी पळवून, उचलून आणत्यात. डांबून ठिवत्यात आन मंग आमच्यापैकी रोज एकीला खानाजवळ धाडत्यात त्याची सेवा कराय. आन त्यो मंग आमच्या अब्रूसंगट..”
ती स्त्री धाय मोकलून रडू लागली. त्यांच्यापैकी रोज एका स्त्रीला अफजल खानाच्या शयनगृहात त्याच्या रात्रीच्या सेवेसाठी, त्याच्या ऐयाशीसाठी पाठवलं जायचं अगदी त्यांच्या मनाविरुद्ध.. त्यांची कहाणी ऐकून सावित्रीला खूप वाईट वाटलं. बायकांवर होणारा अत्याचार पाहून ती संतापानं पेटून उठली. त्यांना धीर देत ती म्हणाली,
“तुमी काय बी चिंता करू नगा.. यातून कायतरी रस्ता घावंल. अगं आपुन जिजाऊच्या लेकी.. असं भ्यायचं असतंय व्हय? आपला भाऊ शिवबाराजं हाय नव्हं.. आपुन त्येच्या भनी.. मंग कशापाई भ्यायचं? आपला राजा येईल बघ आपल्याला सोडवाय.. त्येलाच आपली काळजी.. आन नाई जमलं त्यास्नी तर म्या हाय.. तुमी काय बी घोर करू नगा.. म्या तुमास्नी हिथंनं सुखरूप भाहीर घिवून जाईन..”
त्या स्त्रीने हताश होऊन सुस्कारा टाकला.
“सावू, आता हिथंनं आपली कवा बी सुटका व्हायची नाय.. आता हिथंच आपला शेवट हुनार..”
“असं काय बी हुनार नाय.. म्या सोडविन समद्यास्नी..”
सावित्रीच्या बोलण्याने सर्व स्त्रियांना थोडा धीर आला. इतक्यात एक शिपाई तिथे आला. त्यांच्यावर
डाफरत म्हणाला.,
डाफरत म्हणाला.,
“क्या हो रहा है? क्यूँ शोर मचा रही हो? सो जाव चुपचाप.. ”
सावित्रीकडे पाहत तो म्हणाला,
“कल तुम्हे लेकर जाना है हुजूर की खिदमत मै.. तैयार रेहना समझी..”
आणि तो तिथून निघून गेला. सावित्री विचार करू लागली.
तिकडे मार्तंडला फाजलखानानं बंदी बनवलं होतं. बरीच रात्र झाल्याने त्याने दुसऱ्या दिवशी मार्तंडला खानासमोर घेवून जाण्याचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी खान त्याच्या शामियान्यात गाढ झोपला होता. बाहेर सुरू असलेल्या गोंगाटाने त्याची झोपमोड झाली. त्रासिक मुद्रा करत तो झोपेतून उठून बसला. त्याने तिथे हजर असलेल्या सेवकाला रागाने विचारलं.
“कौन है बाहर? ये कैसा शोर है? हमारी निंद खराब कर दी? किसने ये जुर्रत की?”
सेवकाने खानाला कुर्नीसात केला आणि म्हणाला.,
“हुजूर, बाहर फाजल खांसाब इक कैदी को बंदी बनाकर यहाँ ला रहे है|”
“कौन है वो जिसे बंदी बनाया है?”
खानानं बिछान्यातून उठून उभं राहत त्याला प्रश्न केला. सेवकानं खाली मान घातली. तसा खान चिडून डेऱ्याच्या बाहेर प्रवेशद्वारापाशी येऊन उभा राहिला.
तो बाहेर येताच फाजलखानानं त्याला लवून मुजरा केला.
“क्या माजरा है फाजल ? इतना शोर क्यूँ?”
खानानं प्रश्न केला तसा फाजलखान बोलू लागला.,
“आब्बाजान, आपके कहने पर हम इसपे नजर रख रहे थे| हमने हमारे जासूसोसे भी इसके बारेमें पूछताछ कियी.. आब्बाजान, आपका शक बिल्कुल सही निकला. ये काफर का आदमी है| हमारे जासूसोने ये बताया की, ये तुलजापूरसे हमपे नजर रखे हुये हमारी छावनीमे जासूसी कर रहा था| यहाँ पंढरपूरमें भी दो तीन बार रात के समय इसे चोरोकी भांती आपके शामियानेके बाहर घुमते देखा था|ये हमारी बांते सुन रहा था| इसकी सब हरकते हमारे शक के दायरेमें आ गयी| और कल तो हमे पुरा यकिन हो गया की ये काफर का जासूसही है| कल रात आपके खिदमतमें लाई गयी इक लडकीके साथ गुफ्तगू कर रहा था और उसके साथ भागनेकी साजिश भी| हमने फौरन इसे बंदी बनाया|”
हातापायात जाड दोरखंडात जखडलेला मार्तंड खानासमोर उभा होता. सुटकेसाठी धडपडत होता. खानानं त्याच्याकडे रागाने कटाक्ष टाकला.
“सच बताओ.. कौन हो तुम? क्या नाम है तुम्हारा?”
खान गरजला पण मार्तंडच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. खानाच्या नजरेला नजर मिळवत तो म्हणाला.,
“मार्तंड..”
“ठिकाना? यहाँ क्यूँ आये हो? यहाँ आने का क्या मक्सद है तुम्हारा?”
खान करड्या आवाजात म्हणाला.
“विजापूर.. जहाँपना आदिलशाहची चाकरी करतूय. बाजी सरकारचा शिपाई हाय म्या..”
मार्तंड न घाबरता उत्तरला. खान दाढी कुरवाळत म्हणाला.,
“सच्ची बात? बाजीको बुलाव..”
सेवक बाजींना बोलवायला धावले. थोड्याच वेळात बाजी घोरपडे तेथे आले. मार्तंडवरची नजर जराही ढळू न देता खानानं बाजींना प्रश्न केला.
“बाजी, ये आपका सिपाही.. कल रातसे आपके छावनीसे गायब था ये बात आपको पता है?”
बाजीनीं नकारार्थी मान हलवली. पुन्हा खानानं करड्या आवाजात सवाल केला.
“अगर ये आपका वफादार सिपाही है तो फिर पूछो उसे, वो कल रात इक लडकीके साथ क्या बातें कर रहा था? उसके साथ भाग क्यूँ रहा था? क्या रिश्ता है आपके वफादार सिपाहीका उस लडकीके साथ?”
त्याच्या प्रश्नांसरशी बाजींनी मार्तंडकडे पाहिलं. मार्तंड खाली मान घालून गप्प उभा होता. बाजी घोरपडे जे समजायचं ते समजून गेले. मार्तंडकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाले.,
“गद्दार.. तू आमच्याशी गद्दारी केलीस? काय समजलो होतो आम्ही तुला आन तू काय निघालास?
आमचा विश्वासघात केलास? याची सजा तुला जरूर मिळेल..”
आमचा विश्वासघात केलास? याची सजा तुला जरूर मिळेल..”
बाजी खानाकडे पाहून म्हणाले.,
खानसाब, तुम्ही या नीच माणसासोबत जे कराल, जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल. इसको आप जो ठीक समझे वो सजा दे.. आमची काहीच हरकत नाही. आम्ही यावर काहीच बोलणार नाही.”
खानाच्या चेहऱ्यावर सूक्ष्म आठी पडली. खानानं आज्ञा केली. समोरच्या निशाण्याच्या स्तंभाकडे बोट दाखवत खान दरडावून म्हणाला.,
“जबतक ये अपनी जुबाँ खोलता नही तोवर त्याला त्या खांबाला बांधून चाबकाचे फटके चढवा..”
खानाच्या हुकमाचं पालन करण्यात आलं. मार्तंडला निशाण्याच्या स्तंभाला बांधण्यात आलं. हाती आसूड घेतलेले दोन हबशी हजर झाले. खानानं इशारा केला तसा हबश्यांचे हात वर उंचावले गेले. मार्तंडच्या पाठीवर आसूड फुटू लागले. मार्तंडने डोळे मिटले आणि त्याच्या तोंडून एकच उद्गार बाहेर पडला.
“राजं..”
आणि त्यानंतर मात्र फक्त आसूडांचे आवाज कानी पडत होते. आसूडांच्या फटक्यांनी मार्तंडच्या शरीराची चामडी सोलून निघत होती..
पुढे काय होतं? मार्तंडची सुटका होईल का? सावित्रीचं पुढे काय होईल? मेहर आणि मार्तंडची भेट होईल का? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)
©निशा थोरे (अनुप्रिया)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा