Login

मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा.. भाग १७

हि एक ऐतिहासिक कथा.. एका शूरवीर मावळ्याची.. त्याच्या अनोख्या प्रेमाची..



मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..

हि कथा इतिहासातील सत्य घटनांवर आधारित एक काल्पनिक प्रेमकथा आहे. या कथेत नमूद केलेली पात्र, घटना, प्रसंग काल्पनिक आहेत. केवळ वाचकांच्या मनोरंजन हेतू कथा लिहण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाच्या कोणत्याही गोष्टींशी त्यांचा काहीही संबंध नाही. कथेतील घटना. प्रसंग, पात्र पूर्णपणे काल्पनिक आहेत. काही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.)


भाग १७

मार्तंडच्या अंगावर आसुडाचे घाव पडत होते. सारं शरीर रक्तबंबाळ झालं होतं. त्याच्या अंगावर आसूड ओढणाऱ्या हबश्यांचे हात थकले पण मार्तंडने तोंडातून एकही ‘ब्र’ शब्द काढला नव्हता. तो फक्त आसूडाचे घाव सहन करत होता. आसूड ओढून हबशे दमून खाली बसले इतक्यात खानाचा विश्वासू सरदार हसनखान तेथे आला. त्याला पाहताच हबशे गडबडीने उठून उभे राहिले.

“रुक क्यूँ गये? इसने जुबाँ खोली? कुछ बताया?”

तो मार्तंडकडे रागाने पाहत गरजला. हबशांनी हसनखानाला मुजरा केला.

“जी नही हुजूर, इतनी मार खाकर भी उसने अपनी जुबाँसे एक लफ्ज भी नही निकाला ना कोई आह भरी..”

त्यांच्यापैकी एका हबशाने उत्तर दिलं.

“तो फिर क्यूँ रुके? जबतक ये कुछ बकता नही तबतक तुम्हारे हाथ रुकने नही चाहिये वरना दुबारा किसी औरको मारने के काबील नही रहोगे| क्यूँ की तुम्हारे हाथही नही रहेंगे.. कलम कर दिये जायेंगे.. समझे?”

“रेहम हुजूर, ऐसी गलती दुबारा नही होंगी..”

असं म्हणत त्याची माफी मागून हबशांनी पुन्हा हातात आसूड घेतला आणि मार्तंडच्या अंगावर आसूड बरसू लागले. हसनखान तिथून निघून तडक खानाच्या शामियान्यात गेला. खानाच्या शामियान्यात प्रवेश करण्यापूर्वी तो आल्याचं, खानाला भेटू इच्छित असल्याचा निरोप सेवकांकरवी खानाला दिला. आत येण्याची खानाची परवानगी घेऊन हसन खानानं आत प्रवेश केला. आत येताच त्यानं खानाला कुर्नीसात केला. खान त्याच्या मखमली आसनावर तक्क्याला टेकून बसला होता हातात रत्नजडीत सरबताचे प्याला आणि समोर मंचकावर एका तबकात सुखामेवा आणि रत्नजडीत सूरई आणि सरबताचे प्याले सजले होते.

“बोलो हसनखां, क्या खबर है?”

खाली मान घालून उभा असलेला हसनखान म्हणाला,

“हुजूर, वो हमने बंदी बनाये हुये सिपाहीने अपनी जुबाँ नही खोली..उसका पुरा शरीर खूनसे लहूलुहान हो गया.. इतनी मार खानेके बावजुदभी उसने अपनी चुप्पी नही तोडी.. बहुतही निडर मालूम होता है|”

“काफर के जासूस की तारीफ? दुश्मन सिर्फ सजाके हकदार होते है ना की काबील ए तारीफ.. समझे.. उसकी चुप्पी तोडने के लिए हमे दुसरा तरिका अपनाना चाहिये..”

खान विचार करू लागला. संशयाचं जाळं पसरत होतं. आता मार्तंड शिवरायांचा नजरबाज आहे असा खानाचा पक्का समज झाला. प्यालातल्या सरबताचा घोट घेत त्याने हसनखानाला विचारलं.

“हसन, वो लडकी?

“हुजूर, हमारे सिपाहीयोंने उसे बंदी बनाया है| बहुत फडफडा रही थी.. उसके पर काटना जरूरी है|”

हसनखान म्हणाला.

“हुं… यकिनन उस लडकी का उस काफर के साथ कोई तो रिश्ता है| वरना उस लडकीके साथ क्यूँ गुफ्तगू करेगा? उस लडकी को कब्जेमें लेते है| जाओ हसनखां, उस लडकीको हमारे सामने पेश करो..  उन दोनो के बिच अगर कोई रिश्ता होगा तो उसे सामने देखकर वो जरूर कुछ ना कुछ बकेगा.. उसकी यहाँ आने की वजह ढुंड निकालो.. आज रात की मैफिलमै उस लडकी को हाजीर करो.. उसका का स्वादभी चखना जरूरी है..”

खान छदमी हसला. खानाच्या डोक्यात कसला तरी कट शिजत होता. त्यानं हसन खानाला काही सूचना दिल्या. ते सांगताना त्याचा आणि हसनखानाचा चेहरा आसुरी आनंदाने उजळून निघाला.

“जी हुजूर..”

हसन खानानं आनंदानं मान डोलावली. त्याच्याकडे तिरपा कटाक्ष टाकत खान गरजला.

“अगर फिरभी उसकी चुप्पी खत्म नही हुई तो दो दिनके बाद उसे तोफसे उडा दो|”

हसनखानानं होकरार्थी मान डोलावली आणि खानाचा निरोप घेऊन तिथून तो निघून गेला.

इकडे मार्तंड रक्तबंबाळ झाला होता. अंगावरच्या वस्त्रांच्या चिंध्या झाल्या होत्या. घशाला कोरड पडली होती. ओठ कोरडे पडले होते

“पाणी.. पाणी.. ”

त्याच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले. तो पाण्यासाठी व्याकुळ झाला होता. हबश्यांचे हात थांबले. इतक्यात हसनखान तिथे आला. मार्तंडची अवस्था पाहून तिरस्काराने म्हणाला.

“पानी चाहिये तुझे काफर? मिलेगा.. जरूर मिलेगा.. पर उससे पहिले हमे सच बता दे.. हमारे हुजूर बहुत रहमदिल इन्सान है.. वो तुम्हारी जान जरूर बक्श देंगे.. बोल क्यूँ आया है तू यहाँ?”

हसनखानाच्या बोलण्यावर मार्तंड त्याच्याकडं पाहून हसला आणि म्हणाला.,

“आरं त्यो काय मला जीवदान देणार.. हा जीव तर कवाचा माज्या राजाच्या पाई ठिवलाय.. माज्या राजासाठी आन स्वराज्यासाठी तर असं शेकडो मार्तंड म्या ओवाळून टाकीन.. एक मार्तंडचा जीव घ्याल पर अजून शेकडो मार्तंड जनम घ्येत्याल. उगी मरणाचं भ्या मला घालू नगंस..”

“खामोश.. गद्दार..अब तुम्हे कोई नही बचा सकता| खांसाब तुझे जिंदा दफन कर देंगे..| और एक बात सुन ले.. जिसके साथ तू भागने की साजिश कर रहा था ना. वो लडकी आज हुजूर के खिदमत में पेश कियी जायेगी| सारे सिपाहीयोंके सामने उसकी इज्जतकी धजिया उडायी जायेगी.. देखते है तेरा गुरुर कितनी देर टिकता है?”

तो खदखदा हसला. हसनखानाच्या डोळ्यांत तो पाशवीपणा स्पष्ट दिसत होता. सावूचा चेहरा आठवून मार्तंडचा चेहरा दुःखानं भरून गेला. डोळ्यातून अश्रू वाहत होते पण लगेच वीज संचारावी तसा तो त्वेषाने पेटून उठला आणि त्याच्या अंगावर धावून जात म्हणाला.,

“तिच्या अंगाला हात लावू नगंस.. जळून खाक हुशील.. अंगार हाय ती. राजाची भन हाय ती. तिला इतकं हलक्यात घिवू नगंस.. तुजा खान फुका जीवानिशी जाईल.”

“खामोश.. नमकहराम.. हमारे हुजूर के सामने बडे बडे सुरमाँ हार मान लेते है.. वो लडकी क्या चीज है? देख ले आज उसका क्या हश्र होता है? सुनो, इसे और कोडे लगाव.. पानी के इक इक बुंदके लिए वो तरसना चाहिऐ.. मारते रहो.. हाथ रुकने नही चाहिए..”

हसनखान गरजला. हबश्यानी मान हलवली आणि पुन्हा आसूडाचे आवाज सर्वत्र घुमू लागले. मार्तंड घाव सोसत होता. ’गनिमापुढं झुकलो नाही कधी झुकणार नाही.’ असा त्याचा तो निर्धार, एक वेगळंच समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकत होतं.

हळूहळू सूर्य मावळतीला निघाला होता. सोनेरी सूर्यकिरणं डोंगरमाथ्यावर रेंगाळत होती. पाखरं आपल्या घरट्याकडं परतत होती. दिवसभर रानावनात चरायला गेलेली जनावरं, गाई म्हशी, जित्राबं आपल्या गोठ्यात विसावण्यासाठी आतुर झाली होती. सायंकाळचा कुंद वारा वाहत होता. हळूहळू सायंकाळ ओसरू लागली. हवेत गारठा जाणवू लागला. शामियान्यात अंधार दाटू लागला. छावणीत,शामियान्यात शामदान्या, मशाली पेटवल्या जाऊ लागल्या. अत्तराचा सुगंध दरवळत होता. दुसरीकडे रात्रीच्या भोजनाचा बेत सुरू होता. अन्न शिजलं जात होतं. भोजनाचा घमघमाट पसरला होता. खान आपल्या शामियान्यात आराम करत होता पण मनात मात्र शिवरायांचे विचार घोंगावत होते.

“शिवाजी बडा चालाख है| उसके कारनामे विजापूर तक पहूँचे हुये है| उसी कैसी मात दे? काफर छुपकर बैठा है| क्या तरकीब करनी चाहिये?”

खान विचारात मग्न होता. इतक्यात सेवक त्याला मैफिलीसाठी आमंत्रित करायला आला. खानानं होकार दिला आणि तो त्याच्या सोबत शामि्यांन्याच्या बाहेर पडला.

दुसरीकडे फाजलखान सावित्री आणि इतर स्त्रियांना डांबून शिपायांच्या कडक बंदोबस्तात ठेवलेल्या डेऱ्यात पोहचला. सावित्रीकडे बोट दाखवत तो शिपायांना म्हणाला.,

“इस लडकी को अच्छेसे तैयार करके आब्बाजानके सामने उनकी खिदमतमें पेश करो.. ये उनका का हुकूम है|”

फाजलखानानं शिपायांना आदेश दिला. आणि तो तिथून निघून गेला. सावित्री शांत होती. डोक्यात तिच्या कट शिजत होता. फाजलखां तिथून गेल्यावर एक शिपाई तीच्या जवळ आला. तिच्या हातापायातला दोरखंड काढू लागला. तिला खानाच्या मैफिलीत घेऊन जाण्याची तयारी करू लागला. कायम चवताळलेली, अंगावर धावून येणारी सावित्री आज शांत होती. कसलाच विरोध करत नव्हती. डोक्यात तिच्या कट शिजत होता सावित्री अचानक तिला सोडवायला आलेल्या त्या शिपायाशी सलगीने वागू लागली. त्याच्याशी प्रेमाने, गोडी गुलाबीने बोलू लागली. डोळ्यांच्या खाणाखुणा होऊ लागल्या. मादक नजरेने त्याच्याकडे पाहत ती त्याला म्हणाली.,

“किती रुबाबदार दिसतो रं.. त्या तुज्या खानापरिस तूच देखणा दिसतुय..शादी करतो का माज्यासंगट? म्या बी तुज्या बरोबरीनं खानाची सेवा करीन. फुकाचे मला भिकेचं डोहाळ लागलं हुतं. माजी मती हरपली हुती.आता मला उमजतंय खानाची खिदमत करण्यातच माजं भलं हाय..”

शिपायाला अतिशय आनंद झाला आणि नवलही वाटलं. इतकी सुंदर स्त्री आपल्याला रुबाबदार म्हणतेय त्या बोलण्याने तो हरखून गेला. तिच्या सौन्दर्याने तो आधीच मुग्ध झाला होता आणि आता तर तिच्या बोलण्याने तो लोण्यासारखा वितळू लागला. मासा बरोबर गळ्याला लागला होता. हुरळून जाऊन त्याने तिचा हात हाती घेत म्हणाला,

“अच्छा है.. तुमे ये बात बहोत जल्दी ध्यानमें आयी| मै हुजूरसे तुम्हारी तरफसे माफी मांगूगा| हम शादी रचायेंगे| तुम बिल्कुल चिंता मत करना| हमारे जहाँपनाह बहुत अच्छे है वो जरूर तुम्हे बक्श देंगे.. और तुम हमारी बेगम बन जाओगी..|”

असं म्हणत त्याने आनंदाने तिला मिठीत घेतलं. सावित्रीही त्याच्या मिठीत विसावली. त्याच्या पाठीवरून, अंगावरून हात फिरवत असताना तिने शिताफीने त्याच्या कमरेला अडकवलेला खंजीर आपल्या ताब्यात घेतला आणि आपल्या पदरात लपवून ठेवला. इतक्यात तिला बाकीच्या शिपायांच्या येण्याची चाहूल लागली. ती त्याच्यापासून बाजूला झाली. शिपाई आत आले. सावित्री म्हणाली.,

“तुमी जरा येळ बाहीर जावा.. म्या तयार हुते. असं कसं सरकारांस्नी आपलं गबाळं त्वांडं दावू? थांबा वाईच..”

शिपायांना तिच्या बोलण्यावर विश्वास बसला. तो शिपाई इतर शिपायांना म्हणाला.,

“डरने की या चिंता की कोई वजह नही| हम इसपे ऐतबार रख सकते है| ये अब पहिलेवाली लडकी नही रही उसको अपनी गलती का ऐहसास हो गया है| वो हुजूर की सेवामें हाजीर होनेके लिए तैयार है| हम बेफिक्र बाहर जा सकते है|”

त्याने हसून सावित्रीकडे पाहिलं. तिनेही हसून प्रतिसाद दिला. त्याचं बोलणं ऐकून सर्वजण बाहेर जाऊन थांबले. सावित्री लगबगीने इतर बायकांकडे सरसावली. त्यांच्यापैकी एकीच्या जवळ आली. पटकन तिचे बांधलेले हात सोडवले. डेऱ्याच्या मागच्या बाजूचा पर्दा खंजीरने फाडून वाट करून दिली. त्या स्त्रीच्या हातात ते खंजीर देत तिच्या कानात कुजबुजली.,

“ह्ये हत्यार जवळ ठिव. सर्वांस्नी सोडीव आन या मागच्या बाजूनं भाईर पड. जरा बिगीनं कर आन हुशारीनं बी.. म्या जाती भाईर..”

असं म्हणत सावित्री बाहेरच्या दिशेने चालू लागली. इतक्यात त्या स्त्रीने सावित्रीचा हात हातात घेऊन आभार व्यक्त केलं. ‘सर्व ठीक होईल. काळजी करू नका.’ तिने डोळ्यांनीच सर्वजणींना इशारा केला. साऱ्या जणींनी साश्रूपूर्ण नयनांनी तिला निरोप दिला. सावित्री चेहऱ्यावरचे भाव लपवत डेऱ्याबाहेर आली आणि निमूटपणे शिपायांसोबत खानाच्या मैफिलीच्या दिशेने चालू लागली.

खानाच्या योजनेप्रमाणे हिरवं निशान असलेल्या स्तंभाच्या अगदी समोर खानासाठी बैठक सजवली होती. स्तंभाला रक्तबंबाळ मार्तंड खाली मान पाडून जखमी अवस्थेत उभा होता. खानाच्या बैठकीसमोर मंचकावर तबक्यात सरबताचे प्याले आणि सुरई रचली होती. खानाच्या येण्याचा आगाज झाला. सारे शांत झाले. त्या भयाण शांततेला कापत खान आपल्या स्थानावर विराजमान झाला. बाकीचेही आपापल्या जागी जाऊन बसले. कलावंतीणीच्या नाचगाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मैफिल रंगात आली. सरबताचे प्याले पोटात रिचवले जात होते. सारेजण मदहोश होऊन मैफिलीचा आस्वाद घेत होते. मैफिलीची सांगता होणारच होती इतक्यात शिपाई सावित्रीला घेऊन तिथे आले. तिला पाहताच अफजलखानच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. त्याची ती घाणेरडी नजर तिच्या सर्वांगावर फिरली. तो उठून उभा राहिला. तिच्याकडे पाहत त्याने सैनिकांना हुकूम दिला.

“ले आव उसे हमारे पास.. ये स्वाद भी चख लेते है..”

खान छदमी हसला. शिपायांनी सावित्रीला खेचत खानाजवळ आणलं. खानाचे शब्द कानावर पडताच मार्तंडने मान वर करून पाहिलं. समोर सावित्री उभी होती. मार्तंड चवताळून उठला.

“सोड तिला हरामखोरा.. तिला हात लावू नगंस.. तुला जे काय करायचं ते माज्यासंगट कर पर तिला सोड. आरं सवताला लई मोठा शूर सरदार समजतूस ना. मंग लढ की मर्दावानी.. कशापाई बाईच्या पदरला हात घालतुस.. नामर्द कुठचा.. ”

मार्तंड गरजला. खानाला अजूनच चेव चढला. तिच्या देहाला स्पर्श करण्यासाठी तो पुढे सरसावला. त्यानं तिच्या खांद्याला हिसका देत खांद्यावरचा पदर सरकन बाजूला केला. सावित्री दोन्ही हातांनी पदराला धरत आपलं अंग झाकण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या डोळ्यातून पाणी झरू लागलं.

“अगर तुम इसे सही सलामत देखना चाहते हो तो बताओ क्यूँ आये थे तुम यहाँ? क्या मक्सद था तुम्हारा? क्या तुम काफर के जासूस हो? बको.. वरना इसकी इज्जत की धज्जीया उडा दी जायेगी और वो अपनी जान भी बचा नही पायेगी..|”

तो एखाद्या असुराप्रमाणे भयाण हसत होता. मार्तंडच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. स्वराज्यसाठी जीव सुद्धा द्यायला तयार असलेला मार्तंड बहिणीच्या इभ्रतीसाठी लाचार झाला. हतबल झाला होता.

पुढे काय होईल? मार्तंड आणि सावित्रीला कोण वाचवेल? पाहूया पुढील भागात..