Login

मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा.. भाग २२

ही कथा एका शूरवीर मावळ्याची.. त्याच्या अनोख्या प्रेमाची..


मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..

भाग २२


हि कथा इतिहासातील सत्य घटनांवर आधारित एक काल्पनिक प्रेमकथा आहे. या कथेत नमूद केलेली पात्र, घटना, प्रसंग काल्पनिक आहेत. केवळ वाचकांच्या मनोरंजन हेतू कथा लिहण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाच्या कोणत्याही गोष्टींशी त्यांचा काहीही संबंध नाही. कथेतील घटना. प्रसंग, पात्र पूर्णपणे काल्पनिक आहेत. काही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.)


मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..

भाग २२

तुळसा आपल्या साथीदारांसह सावित्रीला घेऊन नदीकाठच्या दिशेने निघाली होती. सावित्रीला जखमी रक्तबंबाळ अवस्थेत पाहून तिचा जीव पिळवटून निघत होता. लवकरात लवकर तिला नदीकाठी पोहचून सरकारांच्या हुकमानुसार तिला पुढचं पाऊल टाकायचं होतं. सावित्रीचा जीव वाचवायचा होता. तिच्यावर औषधोपचार करायचे होते. ती भराभर पाऊल उचलत होती. सावित्रीचा जीव कासावीस होत होता. वेदनेने ती कळवळत होती. थोड्याच वेळात ते सर्वजण नदीकाठी पोहचले. सर्वांची नजर त्या साथीदाराच्या पाठकुळी असलेल्या सावित्रीवर गेली. सर्वांनी तिच्याकडे धाव घेतली. सावित्रीला जखमी अवस्थेत पाहून इतका वेळ धरून ठेवलेला मार्तंडच्या अश्रुंचा बांध फुटला. तो तसाच लंगडत सावित्रीजवळ आला. त्यानं तिला कुशीत घेतलं. तिच्या पोटाला लागलं होतं. जखमेतून रक्त वाहत होतं. मार्तंड रडू लागला.

“सावे, काय गं जालं हे? किती रगात येतंय.. पर तू काळजी करू नगंस.. आपुन लवकरच नदी पार करून जाऊ आन इलाज करू.. म्या हाय ना तुजा दादा.. तुला काय बी हुनार नाय.. वाईस दम धर बाळा.. जाऊ आपुन..

असं म्हणत त्याने सावित्रीला उचलून घेतलं आणि नदीत उभी असलेल्या नावेच्या दिशेने चालू लागला. सावित्रीला कुशीत घेऊन तो नावेत बसला. त्याच्या मागोमाग तुळसा, मेहर आणि साथीदारांचा म्होरक्या सारेजण नावेत बसले. जास्त रक्तस्त्राव होऊ नये म्हणून म्होरक्याच्या साथीदाराने आपल्या शेल्याने तिचं पोट बांधलं. मार्तंडने सावित्रीचं डोकं मांडीवर घेतलं होतं आणि तिच्या डोक्यावरून, केसांवरून मायेने हात फिरवू लागला. सर्वजण नावेत बसल्याची खात्री झाल्यावर म्होरक्याने नावाड्याला नाव घेऊन जाण्याचा इशारा केला. इशारा मिळताच नावाड्याने जोरात नाव वल्हवायला सुरुवात केली.

इकडे तुळसा आणि तिच्या साथीदारांच्या तडाख्यातून वाचलेला शिपाई पडत झडत जखमी अवस्थेत फाजलखानाच्या छावणीत पोहचला. फाजलखानाला तशाच जखमी अवस्थेत कुर्नीसात करून तो बोलू लागला.

“हुजर, हम लोगोने उस काफर लडकी का पिछा किया.. जंगलसे नदीकी ओर जानेवाले रास्तेमे हमने उसे पकड भी लिया था| लेकिन कंबखत उस काफर के कुछ साथीदार वहाँ आ गये और सब मामला बिघड गया| उन लोगोने हमपर हमला किया हमारे सब साथी मारे गये| सिर्फ हम बच गये और ये खबर देनेके लिए  यहाँ तक भागते हुए चले आये हुजूर..”

आणि त्याने फाजलखानाला तिथे घडलेला संपूर्ण वृत्तांत सांगितला. फाजलखान रागाने लालबुंद झाला. बातमी घेऊन आलेल्या शिपायाचा त्याला खूपच राग येत होता. आपल्या जागेवरून चवताळून उठत त्याने शेजारी उभे असलेल्या सेवकाच्या हातातला भाला हिसकावून घेतला आणि त्या शिपायाच्या दिशेने भिरकावला. वेगाने आलेला भाला त्या शिपायाच्या छातीत आरपार गेला. क्षणार्धात तो खाली जमिनीवर कोसळला.

“मनहुस कही के.. नमकहराम.. ये मनहुस खबर सुनाने के लिए यहाँ तक दौडते आये.. क्या सोचा था? हुजूर तुम्हे इनाम देंगे?”

फाजल खूपच उद्विग्न झाला होता. सावित्री हातातून निसटली ही गोष्ट त्याला सहन होत नव्हती. पुरुषी अहंकार दुखावला गेला होता. तिथे उभा असलेल्या सेवकाकडे पाहून तो म्हणाला.

“ले जाव इसे.. हमारे नजरोसे दूर रखो इसे.., और सैनिको की दुसरी तुकडी उनके पीछे भेज दो.. पुरा जंगल, नदीके आसपासके सब गांव, हर जगह उन्हे ढुंडो.. चप्पा चप्पा छान मारो. सिपाहीयोंकी पुरी फौज इस काममे लगा दो.. किसी भी हालत मे वो काफर लडकी हमे चाहिये.. हुकूम की फौरन तामील हो..”

फाजलखान संतापाने लालबुंद झाला होता. खरंतर त्याच्या वडिलांना, अफजलखानाला काय सांगावं हाच मोठा यक्षप्रश्न त्याच्यासमोर येऊन ठाकला होता. मनात भीती दाटून आली. कारणही तसंच होतं आणि अफजलखानही होताच तसा.. कसायाच्या जातीचा.. कायम राग ओकणारा. धूर्त, कपटी, कारस्थानी.. स्वार्थाने बरबटलेला.. स्वतःच्या स्वार्थासाठी तो पोटच्या मुलालाही जीवे मारण्यासाठी मागे पुढे न पाहणारा.. फाजलखानाच्या हाताच्या मुठ्या वळत होत्या. फाजलखानाच्या हुकुमानुसार जास्तीची फौज सावित्रीच्या मागावर पाठवण्यात आली.

नदीचं पाणी कापत नाव पुढे जात होती. सावित्री वेदनेने विव्हळत होती. मार्तंड तिला धीर देत होता. तांबडं फुटायच्या आत त्यांना नदी पार करून पलीकडे जायचं होतं. लवकरात लवकर सावित्रीवर उपचार करणं गरजेचं होतं. सावित्रीकडे वेळ कमी होता. ती सारखी डोळे मिटत होती. मार्तंड तिला जागं राहायला सांगत होता. ते नदीच्या पलीकडच्या भोसे चिंचोळी या गावी पोहचले. म्होरक्याने नावाड्याच्या हातावर त्याच्या कामाचा मोबदला म्हणून कमरेत खोचलेली मोहरांची छोटी पिशवी टेकवली आणि त्याचा निरोप घेऊन ठरल्याप्रमाणे ते सर्वजण आंबामातेच्या मंदिराच्या दिशेने चालले होते. थोड्याच वेळात ते मंदिरात आले. सर्वांनी देवीला नमस्कार केला. मार्तंड तिथेच मंदिराच्या पायरीवर सावित्रीला कुशीत घेऊन बसला. त्याने सावित्रीचं डोकं मांडीवर घेतलं.

“थांब हा सावे, आपण गावात आलूय.. म्या कुठं झाडपाल्याचं औशिध घावतंय का त्ये पाहतू.. ”

असं म्हणत मार्तंडने तिचं डोकं खाली ठेवण्यासाठी तिच्या मानेखाली हात घातला. सावित्रीला धाप लागत होती. त्याला थांबवत क्षीण आवाजात सावित्री मार्तंडला म्हणाली.,


“दादया, आता माजं काय बी खरं नाय. तुज्या मांडीवरच म्या.. लई इच्छा हुती रं.. माज्या राजस्नी बघायचं हुतं. पर आता त्ये हुनार नाय.. दादया.. तू त्यास्नी भेटून सांगशील का रं? की जिजाऊची लेक, तुमची भन, सवराज्याच्या कामी आली.. काय का असंना माजा बी खारुडीचा वाटा..”


सावित्री जोरजोरात श्वास घेऊ लागली. अंतिम घटका जवळ आली होती.

“सावे, चल आपुन आपल्या घरला जाऊ.. माय बा समदी तुजी वाट बघत असत्याल. तिथं तुजा म्या स्वता इलाज करीन.. तुला काय बी होऊ देणार नाय..सावू..”

मार्तंड काकूळतीला येऊन बोलत होता. डोळ्यातून पाणी झरत होतं. रडत रडत मार्तंड बोलत होता.

“सावू, मला माफी दि गं.. म्या तुजी रक्षा नाय करू शकलो.. राखीचा मान नाय ठिवता आला.. मला येक डाव माफ कर गं.. मला सोडून जाऊ नगं.. माय बाला काय सांगू? सावू कुठाय इचारल्यावर का जवाब दिऊ.. तूच सांग.. सावू, थोडा दम धर.. आपुन जाऊ..”

मार्तंड तिला उचलून उठण्याचा प्रयत्न करत होता. बहीण भावाचं प्रेम पाहून सर्वांचं मन हेलावलं. सर्वांचे डोळे पाणावले. सावित्रीची नजर मार्तंडच्या शेजारी आसवं गाळत बसलेल्या मेहरकडे गेली. तिनं इशाऱ्यानेच मेहरबद्दल विचारलं. मार्तंड मेहरचा हात सावित्रीच्या हातात देत म्हणाला.,

“सावू, ही कावेरी हाय.. ही सुदिक आपल्या संगट घरी येनार हाय..”

सावित्रीने मेहरकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर किंचितशी आनंदाची लकेर उमटली. मार्तंड आणि मेहरचा हात एकमेकांच्या हातावर धरत सावित्री म्हणाली.,

“माज्या दादाची, माय बाची काळजी घ्ये. जप त्यास्नी..माजा दादया लई गुनाचा हाय.. त्याला कवा बी एकलं सोडू नगंस.. ”

मेहरने मान हलवून नाही म्हटलं. तिच्या डोळ्यातही आसवं उभी राहिली. सावित्रीला धाप लागू लागली. वेदनेने ती विव्हळत होती. श्वास मंदावत चालला होता. तुळसा तिच्या जवळ बसून आसवं गाळत होती. तिच्याकडे पाहत सावित्री थांबत एक एक शब्द हळूहळू उच्चारत म्हणाली,

“तुळसाक्का, मगा म्या तुज्याकडं पाहून ठरीवलं हुतं तुज्यासंग राहून माज्या राजासाठी, सवराज्यासाठी काम करीन.. पर आक्का, तुजी माजी साथ इथवरच.. माज्या भावाला संभाळ आक्का.. ”

तुळसाचा हुंदका दाटून आला. सावित्री अंतिम घटका मोजत होती. तिचे डोळे आपसूक मिटू लागले. ती मार्तंडचा हात घट्ट हातात धरून ठेवत म्हणाली.,

“दादया, मायबाची काळजी घे.. आन.. माज्या.. राजाला माजा ह्यो.. शेवटचा मुजरा सांग.. मुजरा राजं..”

इतकं म्हणून सावित्रीने मान टाकली. मार्तंडच्या कुशीत तिचा निष्प्राण देह निपचित विसावला होता.

“सावे…..”

मार्तंडने सावित्रीचं कलेवर कवटाळून घेत मोठयाने हंबरडा फोडला. साऱ्यांचं हृदय पिळवटून निघत होतं. सर्वांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. मार्तंड विलाप करत होता. थोड्या वेळाने भानावर येत म्होरक्या मार्तंडच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.,

“मार्तंड, जे झालं ते लई वंगाळ झालं. तुझं दुःख लय मोठं हाय.. कुनी वाटून नाही घेऊ शकत. पर भावा आता किती विलाप करशील..! आता सावित्रीच्या देहाला अग्नी द्यावा लागलं. तिला निरोप द्यावा लागंल. मोठ्या जड अंतःकरणाने मार्तंड तयार झाला. साथीदारांनी जवळपासची लाकडं गोळा केली. लाकडाची रास रचून सावित्रीचा मृतदेह त्यावर ठेवला आणि मार्तंडने तिच्या मृतदेहाला अग्नी दिला. अग्नीच्या बाहुपाशात तिचं कलेवर अलगद स्वाधीन होत होतं. अग्नीच्या ज्वाळा जणू आसमंताला टेकू पाहत होत्या. थोड्याच अवधीत तुळसाची मैत्रीण धाकटी बहीण झालेली सावित्री अंतिम प्रवासाला निघाली होती. मार्तंड धाय मोकलून रडत होता. मेहर त्याला सावरत होती. सर्वांनी साश्रुपूर्ण नयनांनी सावित्रीला निरोप दिला.


पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all