Login

मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा.. भाग २७

ही कथा एका शूर वीर मावळ्याची त्याच्या अनोख्या प्रेमाची..



मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..

भाग २७

हि कथा इतिहासातील सत्य घटनांवर आधारित एक काल्पनिक प्रेमकथा आहे. या कथेत नमूद केलेली पात्र, घटना, प्रसंग काल्पनिक आहेत. केवळ वाचकांच्या मनोरंजन हेतू कथा लिहण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाच्या कोणत्याही गोष्टींशी त्यांचा काहीही संबंध नाही. कथेतील घटना. प्रसंग, पात्र पूर्णपणे काल्पनिक आहेत. काही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.)


मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..

भाग २७

कावेरी वाऱ्याच्या वेगाने पुढे जात होती. मागे खानाची माणसं तिचा पाठलाग करत होती. ती क्षणभरही कुठेही न थांबता आगेकूच करत होती. वाट फुटेल तिकडे ती तिचा घोडा दौडत होती. बरंच अंतर कापल्यानंतर ती शत्रूच्या लोकांना हुलकावणी देण्यात यशस्वी झाली आणि खानाची माणसं तिच्या नजरेआड झाली. तिनं घोड्याचा वेग मंदावला. एका झाडाखाली थांबली. इतका वेळ दाबून धरलेल्या आसवांनी पापण्याचा उंबरठा कधीच ओलांडला होता. डोळ्यातून मेघ बरसू लागले.

“हुजूर, आप हमे अकेले छोडकर चल दिये.. अब हम आपके सिवा कैसे जी पायेंगे? क्यूँ जिये? क्यूँ हमे छोडकर चले गये हुजूर?”

तिचं मन आक्रदंत होतं. ज्याच्यासाठी, ज्याच्या प्रेमासाठी ती विजापूरहुन सारं वैभव, ऐश्वर्य, धनदौलत, ऐशोराम सोडून आली होती. तोच मार्तंड आता राहिला नव्हता. मार्तंडचं शेवटचं रक्तबंबाळ रूप तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हतं. तिचा कुंकवाच्या धन्यावर त्या शिपायाने उगारलेली तळपती तलवार तिच्या डोळ्यांसमोर जात नव्हती. मार्तंड तिला कायमचं सोडून गेला होता. कावेरी ओक्शीबोक्शी रडू लागली. काय करावं तिला सुचत नव्हतं. इतक्या वर्षांनी ती दख्खनच्या भूमीत दाखल झाली होती. आपल्या घराचा किंबहुना विजापूरमध्ये असतानाही रंगमहालाचा कधीही उंबरठा न ओलांडलेली कावेरी शिवाजी महाराजांचा निरोप घेऊन दऱ्याखोऱ्या पार करत निघाली होती. इथली गावं, ठिकाणं, माणसं एकही गोष्ट तिला माहीत नव्हती किंबहुना आठवत नव्हती. तिची वाट तिलाच शोधायची होती. एका अनोळखी प्रदेशात एकट्या स्त्रीला प्रवास करायचा होता. पदोपदी शत्रूच्या सैन्याशी तिला झुंजावं लागणार होतं. कसा निभाव लागणार? ती मनातून खूप घाबरली होती. इतक्यात तिला मार्तंडचे शब्द आठवले.

“कावेरी, लाख मेलं तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजेल. आपल्या राजाचा जीव धोक्यात हाय. तुला त्यांचा जीव वाचवायचा हाय. हा सांगावा काय बी करून तुला पोहचवायचा हाय.राजाच्या जीवापरिस काय बी, कुनी बी थोर नाय. तुज्या जीवाची बी पर्वा करू नगंस. दख्खनची पोर हाईस तू आन या मार्तंडची कारभारीन. तुला ह्ये करावंच लागल.”

अंगात वीज संचारावी तशी कावेरी ताडकन उठून उभी राहिली. डोळ्यातली आसवं पुसली आणि घोड्याला टाच मारून ती पुढच्या प्रवासाला निघाली. मार्तंडचा निरोप तिला मार्तंडने सांगितलेल्या व्यक्ती पर्यंत पोहचवायचा होता. तो निरोप दिला की ती एका फार मोठ्या जबाबदारीतून मुक्त होणार होती. कावेरी वाट विचारत विचारत म्हसवड, गोंदवले, पिंगळी मार्गे ती रहिमतपुरला आली. घोड्याला चारा पाणी घालून घटकाभर थांबून ती पुन्हा पुढं मार्गस्थ झाली. तरवड लोणंद करत ती शिरवळला पोहचली. ती अतिशय दमली होती. इतक्या दिवसांच्या भुकेने ती व्याकुळ झाली होती. घोड्यावरून जात असताना समोर तिला शिरवळचा किल्ला दिसला आणि काही मावळे किल्याजवळ गस्त घालत होते. कावेरी त्यांच्याजवळ आली. शिरवळचा किल्लेदार कावंजी मल्हार याने तिला किल्याच्या द्वारापाशी रोखलं.

“कोन हाईसा आक्का तूमी? इथं काय करताय? कशापाई आलासा?”

त्याने प्रश्न केला. कावेरी खूप दमली होती. तिला धाप लागत होती. कावेरीच्या अंगात अजिबात त्राण नव्हतं. ती अस्पष्टपणे म्हणाली.,

“हमे विश्वासरावजी से मिलना है.. जरुरी काम हाय. सांगावा सांगायचा हाय..”

“काय काम हाय? आमास्नी सांगा. आमी तुमचा सांगावा त्यांच्यापातूर घिवून जातू.”

किल्लेदार म्हणाला तशी ती निर्धाराने म्हणाली

“नही, हमे उनसेही मिलना है.. ये खास बात आमी फकस्त त्यास्नीच सांगणार.”

इतक्यात तिला ग्लानी आली आणि ती खाली कोसळली. तिची ती अवस्था पाहून किल्लेदार पटकन पुढे आला. मावळ्यांनी तिला बाजूला बसवलं आणि जवळच असलेल्या डेऱ्यातलं पाणी तांब्यात घेऊन तिच्या तोंडावर शिंपडलं. ती शुद्धीवर आली. तिने पुन्हा विश्वासरावांना भेटण्याबद्दल सांगितलं. किल्लेदार विचार करू लागला.

“ह्या बाईला इस्वासरावस्नी भेटवावं का? कायतरी महत्वाचा संदेश आसल. बाय खरं बोलत आसल तर ठीक नायतर मावळे हाईतच की..”

“आक्का, आमी त्यास्नी निरोप धाडतो तोपातूर तुमी किल्ल्यात आराम करा. त्ये आल्यावर तुमची भेट घालून देतो.”

कावजी मल्हार कावेरीकडे पाहून म्हणाला.

जावा रं, ह्यास्नी आत घिवून जावा. ह्यास्नी आपल्या सरदारास्नी भेटायचं हाय. पर ध्यान ठिवून ऱ्हा.. चारी दिशांनी गनिम डाव करत फिरतुया. सावध ऱ्हा.. ”

किल्लेदारानं कावेरीकडे संशयित नजरेने पाहत मावळ्यांना हुकूम दिला. किल्लेदाराच्या आदेशाचं पालन करण्यात आलं. कावेरीला आत किल्यात प्रवेश देण्यात आला. किल्लेदारानं तिथल्या मावळ्यांना विश्वासरावांकडे जाण्याचा आदेश दिला. शिरवळच्या डोंगराळ लेण्यात विश्वासरावांचा मुक्काम होता. तातडीनं त्यांना किल्ल्यावर बोलवण्यात आलं. घटकाभरानं विश्वासराव आले तसं मावळ्यांनी कावेरीला विश्वासरावांच्या समोर आणलं. समोरच्या आसनावर एक मध्यमवयीन रुबाबदार, भेदक नजर, करारी बाणा असलेला, सावळ्या रंगाचा सरदार बसलेला होता. डोहीवर भगव्या रंगाचा फेटा, पांढऱ्या रंगाचा सदरा, कमरेला शेला गुंडाळलेला, कमरेला म्यान केलेली तलवार, गळ्यात मोत्यांच्या माळा छातीवर रेंगाळत होत्या. हातातलं चांदीचं कडं त्याच्या रुबाबात अजूनच भर घालत होतं.

“कोन हाईसा बाय?”

त्याच्या आवाजात एक विशेष दरारा होता.

“हेच विश्वासराव असतील? हुजूरने कहा था विश्वासरावजीकोही ये खबर सुनानी है.. पण पूर्णपणे खात्री न करता कसा निरोप सांगायचं?”

कावेरी विचारात पडली. तिने त्यांना आदाब केला.

“आपही विश्वासरावजी है?”

तिने त्यांना प्रश्न केला.

“व्हय, आमीच आहोत विश्वासराव.. बोला काय काम हाय?”

विश्वासराव म्हणाले.

“लेकिन हम कैसे मान ले की आपही विश्वासराव है?”

कावेरीच्या प्रश्नासरशी विश्वासराव गालातल्या गालात हसले आणि तिला विचारलं

“पर तुमी कोन हाईसा?

“हम कावेरी, मार्तंडची बीवी..”

तिच्या तोंडून मार्तंडचं नाव ऐकताच विश्वासराव चमकले. समोर उभी असलेली स्त्री नक्कीच मार्तंडचा निरोप घेऊन आली असेल याची त्यांना खात्री पटली. ते जागेवरून उठून उभे राहिले. आपले दोन्ही हात कमरेवर ठेवत तिच्याकडे तिरपा कटाक्ष टाकत आपल्या तीक्ष्ण स्वरात म्हणाले.

“लाख मेले तरी चालतील पर लाखाचा पोशिंदा जगाय पाहिजेल. सवराज्यापायी जीव गेला तरी परवा नाय. माज्या राजासाठी असलं शेकडो मार्तंड कुर्बान..”

त्यांचे शब्द ऐकून कावेरीच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. हे तर आपल्या मार्तंडचे शब्द. तिची खात्री पटली. कावेरीने मार्तंडने दिलेली निशाण्याची खुण त्यांना दाखवली आणि तिने बोलायला सुरुवात केली.

“हुजूर, हम हमारे हुजूरका, मार्तंडका संदेसा लेकर आये है|”

“क्या संदेसा है?”

त्यांनी प्रश्न केला.

“हाथी जंगलसे फलटणकी ओर निकाहके लिए निकला है| साथमें बहुत सारे जंगली जानवर बाराती बनकर बारात लेकर आ रहे है| उसमे कुछ देसी सुरमाँ भेडियांभी बाराती बने हुए है| फलटणके जंगलके शेरको भी झुंडमें जबरदस्ती शामिल करने का इरादा है| लेकिन हाथीने पुराना रास्ता छोडकर दुसरा रास्ता चुना है..जंगल का शेर खतरेमें है. आपको जल्दी निकाहमें शामिल होना है..”

कावेरीने एका दमात मार्तंडचा निरोप सांगितला. विश्वासराव विचारात पडले. मार्तंडच्या निरोपावरून विश्वासराव काय समजायचं ते समजले आणि मनातल्या मनात पुढची योजना आखू लागले.

“निरोप तर समजला. पर ही बाई का आली? मार्तंड कुठं आसंल? त्याच्या जीवाचं काई बरं वाईट तर झालं नसंल नव्हं?”

त्यांच्या मनात शंकेची पाल चूकचूकली. ते चिंतातूर झाले. मार्तंडचा निरोप घेऊन येणाऱ्या कावेरीकडं पाहुन काळजीच्या स्वरात ते म्हणाले.

“तुमी आलासा? मार्तंड कुठं हाय?”

त्यांचा प्रश्न कानावर पडताच कावेरीचे डोळे पाण्याने डबडबले. तिनं आळीपाळीनं आजूबाजूला उभे असलेल्या मावळ्यांकडं पाहिलं आणि विश्वासरावांकडं प्रश्नार्थक नजरेने कटाक्ष टाकला. तिच्या मनाची चलबिचलता विश्वासरावांनी अचूक हेरली.

“तुमी बिनघोर बोला बाई, ह्यी समंदी आपलीच मानसं हाईत. काय बी भ्यायचं कारण नाई. बोला तुमी..”

विश्वासरावांनी तिला आश्वस्त केल्यावर ती बोलू लागली.

“हुजूर, अपनी मातृभूमीकी रक्षा करते हुए शत्रूके सैनिकोके साथ लडते लडते मार्तंडने अपनी जान सवराज्यके नाम कर दी.. हमारे हुजूर इस दुनियामें नही रहे..”

असं म्हणून रडत कावेरीने घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. तिच्या तोंडून मार्तंडची बातमी ऐकून विश्वासराव हळहळले. त्यांच्याही डोळ्यांत पाणी आलं.

“अजून येक वाघ आपलं कर्तव्य पार पाडता पाडता सवराज्याच्या कामी आला. मार्तंडा, तुजं बलिदान वाया जायचं नाई. आमी याचा बदला घिटल्याबिगर ऱ्हायचो नाई..”

विश्वासराव त्वेषानं म्हणाले.

“जा बाई, दमल्या आसाल. घासभर खाऊन आराम करा. पुढं काय करायचं त्ये पाहतो आमी. जावा रं यांस्नी आरामगृहात घिवून जा..”

असं म्हणत त्यांनी मावळ्यांना कावेरीला आराम करण्यासाठी आरामकक्षेत घेऊन जायला सांगितलं. तिथं गेल्यावर कावेरीला तिथल्या बायकांनी गरम पाण्याने अंघोळ घातली. तिला दुसरं लुगडं नेसायला दिलं. पोटभर अन्न खायला दिलं. कावेरी जेवण करून आडवी झाली. मार्तंडच्या आठवणी मनात काहूर माजवत होत्या. डोळ्यातलं तळं ओसंडून वाहू लागलं.

“हुजूर, आपने हमे जो काम सौपा था उसे हमने पुरा किया| आपका संदेसा विश्वासरावजी को पहुंचा दिया| हमने हमारा फर्ज पुरी इमानदारीसे अदा किया| अब हम दख्खनची पोर, आपकी कारभारीन शोभून दिसते ना? अब तो आप खुश हो ना?”

ती स्वतःशीच बोलत होती. नंतर बऱ्याच वेळाने तिला डोळा लागला.

मार्तंडच्या सांगाव्यावर विश्वासराव विचार करू लागले. विश्वासराव.. मुळ नाव दगडोजी.. बेरड समाजाचे, तीक्ष्ण नजरेचे, सावध पावलांचे.पुरंदरच्या लढ्यातील त्यांची कामगिरी पाहून शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या गुप्तहेर खात्यात नजरबाज म्हणून नियुक्त केलं. विश्वासराव बनवलं. शिवाजी महाराज्यांच्या विश्वासाला पात्र असलेले विश्वासराव बहिर्जी नाईकांप्रमाणे गुप्तहेर खात्याचे मुख्य हुद्देकरी झाले. मार्तंडने दिलेल्या सांगाव्या नुसार विश्वासराव पुढील योजना आखू लागले.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all