मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..
भाग २९
हि कथा इतिहासातील सत्य घटनांवर आधारित एक काल्पनिक प्रेमकथा आहे. या कथेत नमूद केलेली पात्र, घटना, प्रसंग काल्पनिक आहेत. केवळ वाचकांच्या मनोरंजन हेतू कथा लिहण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाच्या कोणत्याही गोष्टींशी त्यांचा काहीही संबंध नाही. कथेतील घटना. प्रसंग, पात्र पूर्णपणे काल्पनिक आहेत. काही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.)
मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..
भाग २९
काही दिवसांनी विश्वासराव माघारी शिरवळला परतले. विश्वासरावांनी तातडीनं त्यांच्या हाताखालच्या नजरबाजांना बोलावणं धाडलं. ताबडतोब शिरवळच्या डोंगरात नेहमीच्या ठिकाणी हजर होण्याचा आदेश दिला. थोड्याच वेळात सगळे नजरबाज एकत्र जमले. विश्वासराव समोरून येताच सर्वांनी विश्वासरावांना वाकून मुजरा केला. विश्वासरावांनी बोलायला सुरुवात केली.
“गड्यानो, प्रसंग लई बाका हाय. खान नावाचं संकट सवराज्यावर चाल करून येतोय. तुमास्नी लई सावधगिरीनं पाऊल टाकायचं आहे. डोळ्यात तेल घालून पाळत ठेवायचं आहे. खानाच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठिवायचं आहे आणि प्रत्येक खबर आमच्यापातूर यायलाच पाहिजेल. जा लागा कामाला. हर हर..”
त्यापाठोपाठ सर्वांनी ‘महादेव’चा गजर केला. सर्वांनी माना डोलावल्या आणि त्यांचा निरोप घेऊन आपल्या कामाला निघून गेले.
दुसऱ्या दिवशी विश्वासराव शिरवळच्या किल्ल्यावर आले. येता येता संध्याकाळ झाली. सोनेरी सूर्यकिरणे गडावर रेंगाळत होती. हळूहळू सर्वत्र अंधार पसरू लागला. हळूहळू गडावर अंधाराचं साम्राज्य पसरू लागलं. गडावर कंदील शामदाण्या, मशाली पेटवण्यात येत होत्या. गडावर येताच प्रथम ते किल्लेदार कावजी मल्हार यांना भेटले. त्यांनी कावेरीची चौकशी केली. त्यांना तिची पुढची व्यवस्था करायची होती. कावेरी आता बऱ्यापैकी सावरली होती. मार्तंडच्या जाण्याचं दुःख डोंगराएवढं मोठं होतं तरी जगणं थांबलं नव्हतं किंबहुना तिला जगणं भाग होतं. मार्तंडसारखा शूरवीर नजरबाज गमावला याचं दुःख विश्वासरावांनाही होतं. ज्या मार्तंडने स्वराज्याच्या सेवेत आपले प्राण अर्पण केले त्याच्यासाठी निदान त्याच्या कुटुंबासाठी, त्याच्या पत्नीसाठी काहीतरी मदत करावी असं त्यांना वाटलं. विश्वासरावांनी कावेरीला बोलवून घेतलं. कावेरी सेवकांसोबत येताच विश्वासरावांनी बोलायला सुरुवात केली,
“जे जालं त्ये कूनाला बी बदलता येणार न्हाई. मार्तंडसंगट जे जालं ते लई वंगाळ जालं. आमालाबी त्याचं प्रचंड दुःख आहे पर सवराज्याच्या कामी आलेल्या, देश आन धर्मापाई प्राण हाती घेतलेल्या शूरविरांच्या जाण्याचं असं दुःख करत बस्त्यात का? तुमास्नी पुढं चालावं लागंल. डोळं पुसा आन अमास्नी सांगा कंच गाव तुमचं. आमची मानसं तुमास्नी तुमच्या घरी सोडत्याल.”
कावेरीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. विश्वासरावांनी पुन्हा विचारलं.,
“गाव कंच तुमचं?”
“राजगडच्या पायथ्याशी शिवापट्टण गांव. धनाजी बांदल हमारे पिता का नाम.”
कावेरीनं उत्तर दिलं.
“ठीक आहे. आमी तुमाला तिकडे सुखरूप पोहचवण्याची व्यवस्था करतो. काळजी नसावी.”
विश्वासरावांनी कावेरीला तिच्या घरी नेण्याची सोय केली. किल्लेदार कावजी मल्हारांनी तिच्यासाठी मेणा आणला. खणानारळानं ओटी भरून तिची घरी जाण्याची व्यवस्था केली. मावळ्यांच्या एका तुकडीसह कावेरी मेणात बसून राजगडच्या पायथ्याशी वसलेल्या तिच्या शिवापट्टण या गावी निघाली. इतक्या वर्षांनी ती तिच्या आईवडिलांना भेटणार होती. भेटीसाठी कावेरी आतुर झाली.
कित्येक वर्षे लोटली होती तरी राजगडाच्या कुशीत वसलेलं शिवापट्टण गांव तसंच छान होतं. सह्याद्रीच्या दुरवर पसरलेल्या पर्वत रांगा, हिरवीगार दुलई पांघरलेली वनराई. आकाशात आनंदाने विहारणारा पक्षांचा थवा, रानावनात चरायला जाणारी जनावरं, नदीवर धुणं धुवायला, पाण्याला जाणाऱ्या बाया, शेतावर रोजच्या कामाला निघालेले पुरुष मंडळी सगळं दृश्य ती मेण्याच्या पडद्याआडून पाहत होती. सारं काही आपल्या डोळ्यात साठवत होती. आनंदाने तिचे डोळे राहून राहून बरसत होते.
‘धनाजी बांदल’ याच्या घरासमोर मेणा येऊन थांबला. कावेरी मेण्यातून बाहेर आली. आपल्या घराच्या अंगणात तिनं पाऊल टाकलं. छोटंसं कौलारू घर, दारात तुळशी वृंदावन, अंगणात जाई, जुईची फुलझाडं, गोठ्यात बांधलेल्या गाई म्हशी. सारं काही तसंच. फारसं काही बदललं नव्हतं. कावेरीचा ऊर आनंदाने भरून आला. पडवीत एक डोक्याला कापड गुंडाळलेली, पांढऱ्या साडीतली मध्यमवयीन स्त्री तुळशीची माळ हातात घेऊन डोळे बंद करून तोंडातल्या तोंडात पुटपुटत जप करत होती. मावळे घोड्यावरून खाली उतरले. त्यांच्यातील एक मावळा पुढे आला आणि जोरात आवाज देत म्हणाला.
“धनाजी बांदल हिथंच राहत्यात नव्हं?”
त्या स्त्रीने डोळे उघडले आणि पटकन उठून माजघरात गेली. माजघरातल्या भिंतीआडूनच म्हणाली.
“व्हय जी, ह्ये धनाजी बांदलाच घर हाय.”
“त्यास्नी बोलवा जरा भाईर..”
शिपायाने त्यांना बाहेर बोलवायला सांगितलं.
“आक्का, ये आक्का भाईर कोन आलंय बघ.”
त्या स्त्रीने आवाज देताच एक वयस्कर पुरुष आणि एक मध्यमवयीन स्त्री आतल्या घरातून बाहेर आले. त्यांना समोर पाहताच कावेरीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आनंदाने ती मोठ्याने ओरडली.
“आये.. बा..”
कावेरी धावतच त्यांच्या जवळ आली. तिने तिच्या आईला घट्ट मिठी मारली. कावेरी गळ्यात पडून रडत होती. कावेरी अशी अनपेक्षितपणे गळ्यात पडल्याने तिची आईबाबा गांगरून गेले. तिच्याकडे अनोळखी नजरेने पाहत तिला दूर करत तिची आई म्हणाली,
“कोन हाईस पोरी?”
“आये.. आगं म्या कावेरी.. तुमची ल्येक..”
कावेरी वाक्यासरशी त्यांनी एकमेकांकडे आश्चर्याने चमकून पाहिलं. तिची आई डोळ्यात आलेलं पाणी पदरानं पुसत म्हणाली.
“कश्यापाई थट्टा करती बाय? आमची पोर लहान असतानाच अमास्नी सोडून गेली. त्या मुडदयांनी माज्या पोरीला ओढून नेली. ठावं नाय जिती हाय का मेली?”
आईच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. वडिलांच्या डोळ्यातही पाणी आलं होतं.
“जा पोरी, आमी तुजे माय-बाप न्हाई.”
तिच्या वडिलांनी तिला जायला सांगितलं. तशी कावेरी म्हणाली,
“नही बा..आपही मेरे माता पिता हो| यही मेरा घर है| तुमी ओळीखलं न्हाई? बा.. म्या कावेरी..”
“कश्यावरनं तू आमची कावेरी हाईस?”
तिच्या वडिलांनी प्रश्न केला. कावेरीने लहानपणी घडलेल्या सर्व लहान सहान घटना सांगितल्या. तिचं बोलणं ऐकून तिची काकू बाहेर आली. कौतुकानं तिच्याकडं पाहू लागली. ती कावेरीच आहे याची तिला खात्री पटली.
“तू.. आमची कावेरी? एवढी चिमुरडी व्हती. आता केवढी थोर झालीस गं!”
तिची काकू आश्चर्याने म्हणाली. तिच्या येण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकत होता. कावेरीने पटकन तिला वाकून नमस्कार केला. गळ्यात पडून ती रडू लागली. अजूनही तिच्या आईवडिलांना ती कावेरी आहे यावर विश्वास बसत नव्हता.
“न्हाई.. न्हाई.. ह्ये कवा बी हुनार न्हाई. कसं हुईल?”
तिच्या बाबांनी साशंक होऊन विचारलं. कावेरी गालातल्या गालात हसली. आईचा हात धरून तिला आतल्या खोलीत घेऊन गेली. तिने खांद्यावरचा पदर बाजूला केला. पाठमोरी झाली आणि पाठीवरची जन्मखूण दाखवली. तशी तिची आई आनंदून गेली. कावेरी आपलीच मुलगी आहे याची तिला खात्री पटली.
“कावेरी.. माजी पोर..”
असं म्हणत कावेरीच्या आईने आनंदाने कावेरीला पोटाशी घट्ट धरलं. आनंदाने तिचा ऊर भरून आला होता. डोळ्यातून आपोआप आनंदाश्रू बरसू लागले. धावतच बाहेर येत कावेरीची आई तिच्या वडिलांना म्हणाली.
“आवं, ही दुसरी तिसरी कुनी न्हाय, आपली कावेरीच हाय. कावेरीच्या पाठीवरची जनमखून तीच हाय.. देवाची किरपा झाली. त्यानं माज्या कावेरीला परत घरला धाडलं.”
कावेरीच्या आईने हात जोडून देवाचे आभार मानले. तिच्या वडिलांना आणि काकूलाही खूप आनंद झाला. कावेरी वडिलांच्या पाया पडली. तिच्या बाबांनी अश्रूपूर्ण डोळ्यांनी तिला आशीर्वाद दिला. तिला मायेने जवळ घेतलं आणि ते एखाद्या लहान मुलासारखं ओक्शीबोक्शी रडू लागले. समोरचं ते दृश्य पाहून कावेरीला घरी सोडवायला आलेल्या मावळ्यांनाही भरून आलं. इतक्या वर्षांनी आपल्या हरवलेल्या मुलीला अचानक असं समोर पाहून कावेरीच्या आईवडिलांना, काकूला खूप आनंद झाला होता. ती कधी परत येईल अशी साधी आशाही उरली नव्हती. ती त्यांची लेक परत आली होती. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. इतक्या वर्षापासून साठून राहिलेल्या दुःखाचा निचरा होत होता. काही क्षण कोणीच काही बोललं नाही. डोळ्यांचं बरसणं सुरू होतं. फक्त मौनातला संवाद सुरू होता.
थोड्याच वेळाने भानावर येत कावेरीचे बाबा मावळ्यांजवळ येऊन म्हणाले,
“लई उपकार झाले बघा तुमचं.. आमची पोर तुमी सुखरूप घरला आणून सोडलीत. कसं पांग फेडू..”
हात जोडून त्यांनी सर्व मावळ्यांचे आभार मानले. त्यांचे हात हातात घेऊन त्यांच्या म्होरक्याने उत्तर दिलं.
“धनाजी हात जोडू नगा.. त्ये आमचं कर्तव्यच हाय. ह्ये आपल्या शिवबा राजांचं सवराज्य हाय. हिथं आयभनी सुखरूप असायलाच पाहिजेल. आयाभनींची राखण करनं आमचा धरम हाय. त्यासाठी किती बी रगात सांडू द्या, काय बी घडू दया. आमी येणारच. चला आमचं काम झालं. आता आमास्नी निघावं लागंल.”
न्हाई जी.. इतका मोठा आनंद दिला हाय तुमी. दोन घास खाऊनच जा.. जा गं सैपाकाला लाग..”
त्याने कावेरीच्या आईकडे पाहून म्हटलं.
“व्हय जी, चल गं कावेरी..”
असं म्हणून ती कावेरीला आणि तिच्या काकूला घेऊन स्वयंपाक घरात गेली. तिघींनी छान स्वयंपाक बनवला. सर्वांना पोटभर जेवण खाऊ घातलं. जेवणं उरकल्यावर सर्व मावळे परत जाण्यासाठी निघाले. कावेरी, कावेरीच्या आईवडिलांनी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानले आणि मग मावळ्यांनी त्यांचा निरोप घेतला.
घरातल्या सर्वांची जेवणं उरकली. सर्वजण अंगणात ओसरीवर बसले होते. कितीतरी वर्षांनी कावेरी आपल्या स्वतःच्या घरात आपल्या आईच्या कुशीत निजली होती. आईच्या कुशीची उब कित्येक वर्षांनी ती अनुभवत होती. आई तिच्या मोकळ्या केसांवरून हात फिरवत होती. मायेने गोंजारत होती.
“बाळा, इतके दिस तू कुठं व्हती? काय झालं व्हतं तुज्यासंगट? आन राजाच्या मानसास्नी तू कशी काय घावली? काय झालं लेकरा? समदं सांग.”
आईने काकूळतीला येऊन विचारलं. कावेरीच्या डोळ्यात पाणी आलं. मार्तंडचा चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला. त्याचं हसणं, रुबाबदार दिसणं, तिच्यावर माया करणं सारं सारं आठवत होतं. त्याच्या आठवणींनी ती व्याकुळ झाली. रडत रडत तिने तिची सर्व कर्मकहाणी सांगून टाकली. कावेरी मोठ्याने रडू लागली. तिचा तो विलाप पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं. आई तिचं सांत्वन करत होती. गोंजारत होती. एवढ्याश्या लहान वयात कावेरीने खूप सोसलं होतं. मार्तंडच्या जाण्याने आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली होती.
दिवस सरत होते. ऋतुचक्र वेगाने फिरत होतं. खानाच्या बातम्या वडिलांकडून तिच्या कानावर पडत होत्या. अफजल खान आणि शिवरायांची भेट निश्चित झाली होती. स्वराज्यावर खूप मोठं संकट आलं होतं. कपटी खानाचा मनसुबा साऱ्यांनाच ठाऊक होता. शिवरायांचा जीव धोक्यात होता. सारी रयत चिंतीत होती.
पुढे काय होईल? पाहूया पुढच्या भागात..
क्रमशः
© निशा थोरे (अनुप्रिया
© निशा थोरे (अनुप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा