हि कथा इतिहासातील सत्य घटनांवर आधारित एक काल्पनिक प्रेमकथा आहे. या कथेत नमूद केलेली पात्र, घटना, प्रसंग काल्पनिक आहेत. केवळ वाचकांच्या मनोरंजन हेतू कथा लिहण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाच्या कोणत्याही गोष्टींशी त्यांचा काहीही संबंध नाही. कथेतील घटना. प्रसंग, पात्र पूर्णपणे काल्पनिक आहेत. काही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.)
मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..
भाग १९
खाली पडणाऱ्या मार्तंडला एकाने अलगद खांद्यावर घेतलं. ते तिथून निघणार तोच, फालजखानाच्या दोन सैनिकांनी त्यांना हटकलं.
"क्या रे? कहां ले के जा रहे हो इसे?"
"खानसाब ने इसे मारने का हुक्म दिया है|"
त्यांच्या म्होरक्याने समोर येत घोगऱ्या आवाजात उत्तर दिलं.
"कब? हमें कैसे नहीं बताया? कौन हो तुम?"
"बडे खान.."
डाव्या हातातला कंदील समोर धरत तो त्या म्होरक्याला निरखू लागला. आदिलशाही सैनिकांची टोपी. चेहऱ्याचा काळा कुळकुळीत रंग, मोठाले लालजर्द डोळे आणि मेहंदी लावून त्यावर कोरलेली दाढी. आदीलशाही सैनिकच होता तो पण त्याच्या मिशा! पल्लेदार नि पिळदार कल्ल्यांपर्यंत पोहोचलेल्या. त्याच्या पटकन लक्षात आलं. उजव्या हातातली तलवार उगारून मोठ्याने ओरडला.
"काफर....?"
पण तोपर्यंत त्याच्या पोटातून बडेखानाची तलवार आरपार झाली होती. त्याचा साथीदार सावध होईपर्यंत एकाने पाठमागून त्याचं तोंड दाबून तलवार त्याच्या गळ्यावरून कधीचीच फिरवली होती. दोघेही गतप्राण होऊन पडले. छावणीत चाललेल्या गोंधळामुळे इकडे कुणाचंच लक्ष नव्हतं.
पावसाचे मोठाले थेम्ब टपटप पडू लागले. सगळे ठरलेल्या दिशेने छावणीतून बाहेर पडले. त्यांनी फाजलखानाच्या मृत शिपायाला आडोश्याला, झाडीच्यामागे नेलं. त्याचे कपडे काढून मार्तंडच्या अंगावर आणि मार्तंडचे कपडे त्याच्या अंगावर चढवले. मार्तंड अर्धवट शुद्धीत होता. त्याच्या सोबत काय चाललंय त्याला काहीच कळत नव्हतं. कुणीतरी आपल्याला खांद्यावरून घेऊन चाललंय एवढंच मार्तंडला कळत होतं. कोणाला काही विरोध करावा इतकंही त्राण त्याच्या अंगात उरलं नव्हतं. सारं अंग जखमांनी ठणकत होतं. ती माणसं त्याला बाहेरच्या दिशेने घेऊन चालली होती.
अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसाने छावणीत सर्वांची एकच धांदल उडाली होती. पेटलेल्या मशाली, शामदाण्या विझल्या. सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलं. जनान खाण्यात एकच कल्लोळ माजला. रात्रीच्या गर्द अंधारात पावसानं चांगलाच जोर धरला होता. बाहेर धो धो पाऊस सुरू होता. अफजलखान निद्राधीन झालेला पाहून मेहर त्याच्या शामीयान्याच्या बाहेर आली. आता तिला मार्तंडला भेटण्याचे वेध लागले होते.
“यही सही वक्त है उसे यहाँसे छुडाने का?
तिच्या मनानं कौल दिला. बाहेर खानाच्या दिमतीला, संरक्षणासाठी तैनात असलेल्या सैनिकांच्या प्रमुखाला ती म्हणाली,
“हुजूर आराम फर्मा रहे है| हम अपने साथीदारोके डेरेमे जा रहे है| हुजूर का खयाल रखना| खुदाह हाफिज..”
असं म्हणून मेहर तिथून निघून गेली पण तिची पाऊलं मात्र मार्तंडला बांधून ठेवलेल्या त्या निशाण्याच्या स्तंभाच्या दिशेने वळाली. ती झपाझप पाऊल टाकत त्या दिशेने निघाली होती. पावसाने जोर धरायला सुरुवात केली. अधूनमधून वीजा चमकत होत्या. मेहर पावसानं ओलीचिंब झाली. डोक्यावरची चुनरी नीट सावरत पाऊस, वाऱ्याची पर्वा न करता ती स्तंभाच्या दिशेने चालत होती. ती स्तंभाजवळ पोहचली पण मार्तंड तिथे नव्हता. ‘अचानक मार्तंड कुठे गायब झाला?’ तिला प्रश्न पडला. तिने आजूबाजूला पाहिलं. मार्तंडला आवाज दिला पण तो कुठेच दिसत नव्हता. मेहरचा जीव घाबरून गेला. तीची नजर डेऱ्याच्या आजूबाजूला मार्तंडचा शोध घेऊ लागली. इतक्यात आकाशात वीज चमकली आणि त्या प्रकाशात तिला अस्पष्टसा मार्तंडचा चेहरा दिसला आणि समोरचं दृश्य पाहून ती हैराण झाली. कोणीतरी जखमी मार्तंडला खांद्यावर टाकून छावणीच्या बाहेर घेऊन चाललं होतं.
“रुक जाओ.. कहाँ लेकर जा रहे हो उसे? सुनो.. कौन हो आप लोग? रुको.. मार्तंड.. मार्तंड..”
तिच्या आवाजासरशी त्या शिपायांनी एकदा मागे वळून मेहरकडे पाहिलं आणि काहीही न बोलता झपाझप पाऊलं उचलत ते त्या छावणीच्या बाहेर पडले. मेहर त्यांना आवाज देत त्यांच्या मागे धावतच निघाली. गर्द झाडीचं जंगल सुरू झालं. डोक्यावर आभाळ वेड्यासारखं बरसत होतं. काळाकुट्ट अंधार. पावसाने पायाखालची पायवाट निसरडी झालेली.. तरीही मेहर त्यांच्या मागे चालत होती.
“कौन है ये लोग और वो मार्तंडको कहाँ लेकर जा रहे है? उसकी जानको खतरा तो नही? कुछ भी हो जाये हमे उसकी जान की हिफाजत करनी होगी फिर हमारी जानही न क्यूँ चली जाय| ऐ मेरे खुदाह, मेरे मार्तंड की हिफाजत करना..”
मेहर आपल्या ईश्वराला मार्तंडच्या जिवाच्या सुरक्षेसाठी मनोमन प्रार्थना करत होती. आता त्या लोकांनी अफजलखानाच्या छावणीपासून बरंच अंतर पार केलं होतं. मार्तंडला पळवून घेऊन जाणाऱ्या लोकांच्या तावडीतून त्याला वाचवण्यासाठी त्यांना गाठणं निकडीचं होतं. मेहर त्यांच्यामागे वेड्यासारखी धावत होती. त्यांचा पाठलाग करून मेहर खूप दमली. चालून चालून तिचा श्वास फुलू लागला होता. अजून पुढे चालण्याची तिच्यात शक्ती नव्हती. काय करावं तिला कळत नव्हतं. ती माणसं अगदी तिच्या नजरेच्या टप्प्यात होती. ती क्षणभर थांबली. जिवाच्या आकांताने मोठ्याने ओरडली.
“रुक जाव.. कौन हो काफर? छोड दो उसे.. मार्तंड.. हम आ गये है.. आपकी कावेरी. चिंता मत किजिये हुजूर..”
“कावेरी.. तू का आलीस इथं? जा इथंनं.. खानाची माणसं तुला जिती सोडायची नाई.. माजी काळजी करू नगंस..जा...”
मार्तंड क्षीण आवाजात पुटपुटला. त्याचं बोलणं ऐकून ते हशीम जागीच थांबले. मागून मेहर आवाज देत होती. त्यांनी मागे वळून पाहिलं. मेहर धावतच त्यांच्याजवळ आली.
“कौन हो तुम? क्यों हमारा पीछा कर रही हो?”
त्यांच्या म्होरक्यानं मेहरला चढ्या आवाजात दरडावत विचारलं.
“हम कावेरी.. आप लोग कौन है? और इन्हें कहाँ लेकर जा रहे है?”
तिच्या उत्तरासरशी तो तिच्यावर खेकसत म्हणाला.,
“मोगलाई पेहराव पेहना है और नाम कावेरी?”
तिचा मोगलाई पेहराव पाहून त्यानं तिला शंकेनं विचारलं.
“जी हाँ.. हम कावेरी.. बिजापूरके रंगमहालमें नाचकाम करनेवाली इक तवायफ. लेकिन इनके लिए सिर्फ इनकी कावेरी. बेपनाह इश्क करते है हम इनसे.. हम इन्हें आपके साथ जाने नही देंगे| छोड दो उन्हे.. हमारे प्यारके हिफाजतके लिए हम अपनी जान भी दे देंगे.. लेकिन आप हो कौन?”
मेहरने प्रश्न केला. इतक्यात मार्तंडच्या तोंडातून ‘कावेरी.. कावेरी..’ अस्पष्टसे शब्द बाहेर पडले. बेशुद्ध अवस्थेत मार्तंडला हळूहळू शुद्ध येत होती. शिपायाने त्याला खांद्यावरून खाली उतरवलं. त्याच्या खांद्याचा आधार घेत मार्तंड म्हणाला.,
“ व्हय.. ही कावेरीच हाय.. आमी वळखतो एकमेकास्नी. ”
“हुजूर..”
असं म्हणत मेहर मार्तंडला येऊन बिलगली. मार्तंडने तिला घट्ट मिठी मारली. काही क्षण ती दोघं अशीच एकमेकांच्या मिठीत होती. तो क्षण जणू जागीच थिजला होता. दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते.
तोंडावर हाताची मुठी ठेवून म्होरक्याने हळूच खोकत मार्तंडकडे पाहिलं आणि म्हणाला.,
“ पुरे आता.. निघायचं का?”
त्याच्या प्रश्नाने दोघंही भानावर येत मिठीतून बाजूला झाली. म्होरक्या पुढे बोलू लागला.
“आतापतूर खानाच्या छावनीत समद्यास्नी तू गायब झाल्याची बातमी कळली आसल आन त्याची माणसं तुला हुडकत तुज्या मागावर असत्याल. आपल्याला लागलीच निघाय पायजेल. आपल्याला बिगीनं चंद्रेभागेच्या तीरी पोहचायचं हाय. तिथं आपली माणसं आपल्यासाठी थांबल्यात. त्यास्नी लवकर भेटाय पाहिजेल. येळ दवडू नगां.. चला आता.. ”
मार्तंडला त्याचं म्हणणं पटलं आणि तो त्यांच्यासोबत निघणार इतक्यात त्याला सावित्रीची आठवण झाली.
“पर माजी भन.. माजी सावू तिथं खानाच्या छावनीत अडकली हाय.. तिची सुटका केल्याबिगर म्या कसा तुमच्यासंगट येऊ? तुमी व्हा पुढं म्या तिला घिवून येतो..”
असं म्हणत मार्तंड पुन्हा खानाच्या छावणीच्या दिशेने माघारी जाऊ लागला. इतक्यात त्यांच्यापैकी एका शिपायाने त्याचा हात पकडून त्याला थांबवत म्हणाला.,
“आरं थांब की भावा.. कुठं निगालास? आमची काही माणसं तिथं हाईत. त्ये सोडवतील तुज्या भणीला. त्ये समदी तिथल्या बंदीवान बायास्नी घेऊन नदीच्या काठी येणार हाईत. तिथं आपली त्यांची भेट हुईल. चला लवकर..”
त्या शिपायाचं बोलणं ऐकून मार्तंडला हायसं वाटलं. सावित्री सुखरूप परत येईल अशी मनात आशा उत्पन्न झाली आणि मग तो आणि मेहर अजून कोणतेही नवे प्रश्न न विचारता त्यांच्या मागोमाग चालू लागले.
इकडे फाजलखानाच्या शामियान्यात शिपायांनी सावित्रीला जबरदस्ती आणून सोडलं आणि ते बाहेर निघून गेले. फाजलखानाची वखवखलेली नजर तिच्या सर्वांगावर फिरली. लगबगीने त्याने तिच्यावर झडप घातली. सावित्रीने सावध पवित्रा घेतला आणि गरर्कन गोल फिरून फाजलखानाच्या श्रीमुखात लगावून दिली. त्याच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले. तो पुन्हा धडपडत उठला आणि तिला आपल्या मिठीत घेण्यासाठी सरसावला. इतक्यात वाऱ्याच्या जोराने अचानक मशाली, शामदाण्या विझल्याने अंधार पसरला. अंधाराचा फायदा घेत सावित्री शामियान्याच्या दाराच्या दिशेने धावली. ती पळून जाणार तेवढ्यात फाजलखानाने तिचा पदर धरला. सावित्री दोन्ही हातांनी साडीचा पदर धरून ठेवण्याचा प्रयत्न करत होती आणि दुसऱ्या बाजूला फाजलखान पदर खेचत तिच्या जवळ येऊ पाहत होता. आता तिच्या अब्रूवर घाला होणार होता. सावित्री पूर्ण ताकतीने त्याला विरोध करत होती पण शेवटी बाईमाणूसच.. तिची ताकत अपुरी पडू लागली. डोळ्यांसमोर अंधार दाटू लागला.
“आता संपलं सगळं.. हे भवानीमाते, आता तूच वाचीव गं आई..”
असं म्हणत सावित्रीने तसाच पदर हातात धरून डोळे मिटले. इतक्यात एक चमत्कार झाला. लखलखत्या तलवारीचा तिच्या पदरावर वार झाला. पदराचे दोन तुकडे झाले आणि सावित्रीचा पदर फाजलखानाच्या हातून वेगळा झाला. एक रणचंडिका शामियान्यात अवतरली होती. सावित्रीच्या हाताला धरून ती बाहेरच्या दिशेने जाऊ लागली. फाजलखान पुन्हा सावित्रीला पकडण्यासाठी चवताळून झेपावला. त्या स्त्रीने खानाच्या हाताला जोरात झटका दिला. आपल्या पूर्ण ताकतीनिशी तिने त्याला ढकलून दिलं. आधीच सरबताच्या नशेत असलेला फाजलखान खाली जमिनीवर कोसळला आणि सावित्री आणि ती स्त्री शामीयान्याच्या बाहेर पडल्या.
सावित्रीला वाचवणारी स्त्री कोण होती? पुढे सावित्रीचं काय होतं? तिची आणि मार्तंडची भेट होईल का? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)
©निशा थोरे (अनुप्रिया)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा