‘आत येऊ का काकू?’- रुचिराने शेजारांच्या दरवाजावर टकटक करत विचारलं.
‘बोला.’- सामानाची बांधाबांध करतानाच बेमालूमपणे डोळ्यांच्या ओल्या कडा फुसत साठ्येकाकू उद्गारल्या.
‘तुम्हाला थँक्स बोलायचं होतं. तुमच्यासाठी मिठाई आणली आहे, तुमचा आशीर्वाद हवाय. आत येऊ?’- रुचिराने धीर एकवटून विचारलं.
‘मिठाई? आणि मला? आशीर्वाद? माझ्यासारख्या बाईचा? काय म्हणता तुम्हीं सोसायटीवाले मला? हा; कजाग, तर्कट, उद्धट. बरोबर न? आणि थँक्स कशाबद्दल? मी हि सोसायटी सोडून चालली म्हणून?’- काकू जमेल तसं तुटक बोलण्याचा प्रयत्न करत होत्या.
‘कारण त्यांना या फटकळपणाच्या मुखवट्यामागचा संघर्ष तुम्हीं कधी कळूच दिला नाहीत ना.’- रुचिरा पटकन बोलून गेली तसे काकूंनी तिच्याकडे चमकून पाहिलं.
‘मु.. मुखवटा? कसला मुखवटा? काय वेड लागलं का तुला? हे असलं काही बोलायचं असेल तर चालती हो इकडून.’- जमेल तितकं उसनं अवसान आणत साठ्येकाकू बोलल्या.
‘ अकाली वैधव्य आल्यावरही गर्भारपणात कुटुंबाने सोडलेली साथ, सत्तावीस वर्षाच्या स्त्रीने समाजाच्या विकृत नजरा टाळण्यासाठी काय करावं?’- रुचिरा आज निर्धाराने बोलत होती.
‘तुला.. तू? कोणी सांगितलं?’- काकूंना चांगलाच धक्का बसला होता. भरल्या कंठातून शब्दच फुटत नसल्याने बाजूच्याच सोफ्यावर त्या मटकन बसल्या.
‘माझा जेव्हा घटस्फोट झाला; मी पूर्णपणे तुटून गेले होते. सगळेच आमचं सांत्वन करत होते पण तुम्हीं एकमेव होतात की ज्यांनी मला आणि आईला एकांतात गाठून चांगलंच फैलावर घेतलं होतात. रडतच बसायचं होतं तर जीव का नाही दिलास असं थेट तुम्हीं विचारलं होत. त्यावरून आईची आणि तुमची चांगलीच जुंपली होती. तुम्हीं त्यावरही ‘स्वतःहून उभी राहत नसेल तर पोरीचा फोटो काढून ठेवा, श्राद्धाला लावायला कामाला येईल’ एवढं टोकाचं बोलून निघून गेला होतात.’- रुचिराने बोलता बोलता मान खाली घालुन आसवं गाळणाऱ्या काकूंचा हात हाती घेताच त्या अजूनच भावुक झाल्या.
‘मला तेव्हा तसं म्हणायचं नव्हतं ग.’- काकू हात जोडत म्हटल्या तसं रुचिराने त्यांना थांबवलं.
‘सणांची वर्गणी न देणाऱ्या काकू जेव्हा परक्या वॉचमनला त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी वर्षाला दहा हजरांची मदत करतात तेव्हाच मला तुम्हीं भुरळ घातलीत. मला तुमच्या कडवटपणामागचा संघर्ष कळला. त्या वॉचमनच्या पत्नीनेच तुमच्या उर्मट वागण्यामागचं कारण सांगितलं. मग मी ही माझ्या अल्पबुद्धीला जोर लावून तुमचं सारं बोलणं आठवलं आणि जोमाने उभी राहिली. नव्या भरारीसाठी. आणि मी ती घेतली बरं का काकू. जगण्याचा खरा अर्थ शिकवणाऱ्या माझ्या या गुरुसाठी मी गुरुदक्षिणाही आणलीय.’- रुचिराने दरवाज्याकडे बोट दाखवताच काकू आश्चर्यचकित होत ताडकन उभ्या राहिल्या.
‘वैभव? तू?’- लेकाकडे धावत जाणारे मन काकूंनी प्रयत्नपूर्वक रोखलं.
‘यांच्यासारखच मला तू खूप उशिरा उलगडलीस. किंबहुना यांनीच उलगडून दाखवलं. इतके दिवस इतरांचं ऐकून तुझा दुस्वास केला. तुला नावं ठेवली. तुला असं एकटं सोडून निघून गेलो. माफ कर आई.’- वैभवने काकूंचे पाय धरले.
‘ठिक आहे रे, आत्ताशी सवय झालीय एकटं पडायची. तू खुश आहेस न?’- काकू आजही दुखावलेल्या होत्याच.
‘काकू, तुम्हाला न्यायला आलाय तो. तुम्हाला आता हा मुखवटा लावायची गरज भासणार नाहीच. कारण मी तुम्हांला गुरुदक्षिणा म्हणून तुमच्या पायावर उभं राहण्याचं बळ देतेय. मी तुमच्यासारखी दुर्देवी वेळ ओढवलेल्या स्त्रीयांच्या सहाय्यासाठी ‘परकी लेक’ नावाची संस्था काढली आहे आणि तिथे तुम्हीं त्या स्रियांना हिंमत देण्याचं काम करावं अशी माझी विनंती आहे. प्लिज नाही बोलू नका. तिकडे खरंच तुमची गरज आहे.’- आता रुचिराने हात जोडले होते.
‘आवडेल ग मला. नक्कीच! बस तू बस मी चहा टाकते’- काकू आनंदात किचनकडे वळल्या.
जाताना त्यांनी झटकलेला हात पाहून नकळतपणे रुचिराला त्यांनी मुखवटा फेकल्यासारखं वाटून गेलं. कदाचित आता त्यांना तो फारसा लागणार नव्हताच.
©® मयुरेश तांबे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा