ईरा – चॅम्पियन्स ट्रॉफी – २०२५
(संघ – कामिनी)
लघुकथा : शीर्षक – मात्रा
“काय गं नवीना, तुझा चेहरा का इतका उतरलाय आज? तुझ्या आईची तब्येत जास्त बरी नाहीये का? तसं होतं तर आज सुट्टी का नाही टाकलीस?” सावनीने आपल्या मैत्रीणीला काळजीने विचारलं.
नवीना आणि सावनी दोघी खास मैत्रिणी. खरं तर एका मल्टी नॅशनल कंपनीत एकत्र काम करणाऱ्या सहकारीणी. गेली चार वर्षं बाजुबाजुच्या डेस्कवर काम करत असल्याने दोघींची चांगली मैत्री झालेली. एरव्ही कामाच्या वेळी उगीच चकाट्या पिटण्याचा दोघींचाही स्वभाव नाही; पण वेळप्रसंगी एकमेकीना मदत करणं, एकमेकींची सुखं-दु:खं समजून घेण्याइतकी मैत्री नक्की आहे दोघींमध्ये.
“आई ना? बरीच असेल,” नवीना दीर्घ उसासा सोडत सावनीच्या प्रश्नावर उत्तरली.
“बरीच असेल म्हणजे? काकूंना खूप ताप होता काल म्हणून अर्धा दिवस सुट्टी घेऊन गेली होतीस ना तू माहेरी?”
“हो गं, काल दुपारी घरी गेले आणि बघते तर काय? एकशे दोन ताप होता आईच्या अंगात. सकाळपासून तिने काही खाल्लंही नव्हतं. आधी तिच्या डोक्यावर पट्ट्या ठेवू कि आधी तिच्यासाठी काहीतरी खायला करू? मला काहीच सुचत नव्हतं,” नवीना सांगत होती.
“अरे बापरे, एवढ्या आजारी होत्या त्या?”
“दोन दिवसांपासूनच तिला बरं वाटत नव्हतं असं शेजारच्या मनीषाकाकू म्हणाल्या. त्यांनी आईला दोन दिवस पेज, मऊ भात असं काय काय करून दिलं. डॉक्टरना घरी बोलवलं होतं. कशानेच तिचा ताप उतरत नाही हे पाहून शेवटी काल मला फोन केला,” नवीनाला आईची कालची परिस्थिती आठवून आताही वाईट वाटत होतं.
“ओह, म्हणजे आता त्या अॅडमिट आहेत?” नवीनाने इतका वेळ थोपवून ठेवलेले अश्रू सावनीच्या प्रश्नावर बंड करून डोळ्यातून वाहू लागले. काहीतरी गंभीर प्रकरण आहे हे सावनीने ओळखलं आणि उठून नवीनाच्या जवळ आली.
“चल, आपण कॅन्टीनमधे जाऊन कॉफी घेऊ या,” नवीना नको नको म्हणत असताना सावनी तिला जबरदस्ती डेस्कवरून घेऊन गेली.
“आता सांग, नक्की काय झालंय? एनिथिंग सिरीयस?” नवीनासमोर कॉफीचा ग्लास ठेवत सावनी म्हणाली.
“व्हायरल फिवर आहे आईला, मी काल निघता निघता डॉक्टरांना भेटून आले. ते म्हणत होते आईचं स्वत:कडे दुर्लक्ष होतंय.’
“बाबा गेल्यापासून ती खाण्यापिण्याकडे नीट लक्ष देत नाहीये बहुतेक,” नवीना अपराधी सुरात बोलली.
“मग त्यांना थोडे दिवस तुझ्या घरी घेऊन ये. हवं तर तू घरून काम कर,” सावनीने सुचवलं.
“तसंच ठरवलं होतं मी. म्हणून इकडून जाताना आईच्या टेन्शनमधे असूनही मी आईंना फोन करून कल्पना दिली कि, मी हाफ डे घेऊन माझ्या आईकडे जातेय. तिला जास्तच बरं नसेल तर सरळ आपल्याघरी घेऊन येणार आहे.”
“मग?”
“मी आईकडे पोहोचले आणि त्यांचा मला उलट फोन आला. मला वाटलं त्यांनी आईची तब्येत विचारायला फोन केला असेल. तेव्हा मी नेमकी आईच्या डोक्यावर पट्ट्या ठेवत होते, म्हणून फोन स्पीकरवर टाकला. तर त्या,” आणि नवीना बोलता बोलता थांबली.
“काय म्हणाल्या त्या?” सावनीने तिच्या डोळ्यांच्या पापण्या पुन्हा ओलावलेल्या बघून काळजीने विचारलं.
“आई मला म्हणाल्या, ‘तुझ्या आईला कितीही बरं नसलं तरी इकडे आणू नकोस. काय ते औषधपाणी कर त्यांचं आणि एकटीच घरी ये. मला कोणी परकं माणूस घरी येऊन राहिलेलं आवडत नाही माहितीये तुला.’ त्यांच्या अशा बोलण्याने माझ्याच आईला कानकोंडं झालं. तिने माझ्यासोबत यायला नकार दिल.” नवीनाने आपलं मन हलकं केलं.
“अगं मग तू राहायचं होतंस तुझ्या आईकडे,” सावनी म्हणाली.
“कशी राहणार? लग्न झाल्यापासून त्यांनी एक दिवस मला माहेरी राहू दिलेलं नाही. ‘माझे गुडघे दुखतात, ओट्याजवळ उभं राहून काम झेपत नाही’ ची टिमकी येताजाता वाजवत असतात त्या. त्यात नेमका त्यांचा लेकसुद्धा इथे नाहीए. मी त्यांनाही एकट्या राहा असं नाही नं म्हणू शकत. शेवटी आईच मला म्हणाली, ‘मी माझी काळजी घेईन. तू तुझा संसार सांभाळ.’ मला खूप अपराधी वाटतंय सावनी.”
“वाटायलाच हवं. कारण तुझ्या सासू इतकीच तूसुद्धा ह्याला जबाबदार आहेस,” सावनी ठामपणे म्हणाली.
“मी?”
“लग्न झाल्या दिवसापासून बघतेय, तू तुझ्या सासूच्या प्रत्येक गोष्टीला मान तुकवतेस.”
“मग काय करू? शब्दाने शब्द वाढणार आणि उगीच वाद होणार. भरल्या घरात रोज भांडण करायला बरं वाटत नाही,” नवीना अगतिकपणे बोलली.
“तुझं पाणी त्यांनी बरोबर जोखलंय आणि म्हणून त्या स्वत:च्या तालावर तुला हवं तसं नाचवतात,” सावनीने तिला वास्तवाची कल्पना दिली.
“एरव्ही माझी त्याबद्दलही काही तक्रार नाही; पण आज आईला माझी गरज असताना मी मुलगी म्हणून कमी पडले त्याचं वाईट वाटतंय. काय करू काही समजत नाही.”
“तुला तुझा हा पडखाऊ स्वभाव बदलायला हवा नवीना. लग्न झाल्यावर मुलींची त्यांच्या आई-वडीलांप्रती असलेली जबाबदारी कमी होते, असं नाही ना?”
“हे माझ्या सासूला कोण समजावणार?”
“कोण म्हणजे? तुलाच बोलावं लागेल. तेही स्पष्ट आणि ठामपणे. तू जशी तुझ्या नवऱ्याच्या आईची सेवा करतेस, तसाच तुझ्याही आईच्या अडीअडचणीला तुलाच उभं राहावं लागेल. तेही तुझं कर्तव्य आहे.”
“मी असं काही बोलूच शकणार नाही. आणि बोलले तर त्या लगेच दुरुत्तर करते म्हणून कांगावा करतील. सुशांतचा फोन आला तर एकाचं दोन करून सांगतील आणि त्याच्या डोक्याला ताप देतील. लग्न झाल्यापासून मी त्याच्याकडे एकदाही आईंच्या वागण्याची तक्रार केलेली नाही. आणि त्यांनी माझी कम्प्लेंट केली नाही असा एक दिवस जात नाही,” नवीनाने तिची अडचण सांगितली.
“आजवर गप्प बसलीस; पण आज बोल त्याच्याशी. आणि मी सांगते तसं बोल. मग बघ तुझे किती प्रॉब्लेम्स सॉल्व होतात ते,” सावनीने नवीनाला डोळा मारला. तिने जे काही सांगितलं त्यावर नवीना फक्त डोळे विस्फारून तिच्याकडे बघत राहिली.
“मला जमेल?”
“जमवावं लागेल. तुझ्या नवऱ्याचीही परीक्षा होऊन जाऊ दे त्या निमित्ताने. बघ तरी तो त्याच्या आईला कसा हँडल करतोय ते, ” सावनीने तिला मार्ग सुचवला, तरी नवीना साशंक होती.
दिवेलागणीची वेळ उलटून गेली तरी नवीना घरी परत आली नव्हती म्हणून तिची सासू, सुशीलाबाई चांगल्याच रागावल्या होत्या. त्यांचं सारखं आत बाहेर चालू होतं.
“आज पण ही बया आईकडे गेली वाटतं, रोज रोज माहेरी काय असतं देवालाच माहीत. येऊ दे आज घरी, चांगली खरडपट्टी काढते तिची,” त्यांचा आतल्या आत संताप होत होता. इतक्यात बेल वाजली. सुशीलबाईंनी दरवाजा उघडला.
“इतका वेळ कुठे उलथ...” त्या पुढे बोलणार तोच नवीनासोबत आपल्या विहिणीला पाहून त्यांनी ओठावर आलेले शब्द कसेबसे आवरले. नवीना आईला आधार देत घरात घेऊन आली.
“ह्या कशा आल्या इथे? मी काल तुला म्हटलं होतं ना नवीना,” त्यांनी थोडा खालचा सूर लावत पण नाराजी व्यक्त होईल अशा रीतीने सुनेला जाब विचारला. एक क्षण नवीना अस्वस्थ झाली. आपल्या आईचा उतरलेला चेहरा बघितला आणि स्वत:ला सावरत किंचित हसून सासूकडे बघितलं.
“आई, मी हिला जरा आत झोपवून येते. आपल्यासाठी छान आलं घालून चहा करते. मग आपण बोलू या निवांतपणे,” म्हणत तिने आपल्या आईला आत नेलंसुद्धा. सुशीलाबाईंना हे अपेक्षितच नव्हतं. त्या आता जास्तच अस्वस्थपणे येरझाऱ्या घालू लागल्या.
“चहा घ्या,” नवीनाने त्यांच्या समोर चहाचा कप ठेवला.
“आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, तू तुझ्या आईला इकडे का आणलंस?”
“तुम्हाला इथे एकटीला ठेवून मी माहेरी कशी राहणार होते? तुमचे गुडघे दुखतायत, ओट्यापाशी उभं राहावत नाही. म्हणून म्हटलं दोन्ही पेशंटना एकदमच सांभाळेन,” नवीना अगदी नम्रपणे बोलली. त्या पुढे काही बोलणार त्याआधीच तिने हातातली डिश पुढे केली.
“आई, ही खारी घ्या ना. तुम्हाला आवडते म्हणून आमच्या नाक्यावरच्या बेकरीतली खारी म्हणून मुद्दाम घेऊन आले.”
“आई, ही खारी घ्या ना. तुम्हाला आवडते म्हणून आमच्या नाक्यावरच्या बेकरीतली खारी म्हणून मुद्दाम घेऊन आले.”
“तुझं वागणं मला अजिबात पटलेलं नाहीए. आजची रात्र राहू दे त्यांना इथे. उद्या सकाळी ऑफिसला जाता जाता त्यांना त्यांच्या घरी पोहोचतं कर,” सुशीलाबाईंनी नवीनाला स्पष्टच सांगितलं.
“मी आज खूप दमलेय. आमच्या दोघींसाठी खिचडी करतेय. तुम्हाला तीच चालेल का काही दुसरं करू?” सासूच्या प्रश्नाला बगल देत तिने आपला चहाचा रिकामा कप उचलला आणि आत निघून गेली.
“अशी काय वागतेय ही? माझ्या कुठल्याच बोलण्याला सरळ उत्तर का देत नाहीए?” त्यांना प्रश्न पडला होता.
“हे काय चाललंय तुझं नवू?” नवीना आता आईसाठी चहा-खारी घेऊन तिच्या खोलीत आली होती. तेव्हा तिच्या आईलाही हाच प्रश्न पडला होता.
“अगं, जेवण व्हायला थोडा वेळ लागेल ना, म्हणून आणलाय चहा,” तिने आईच्या हातात कप दिला.
“ते म्हणत नाहीए. मी नको नको म्हणत असताना का घेऊन आलीस मला इथे? बघितलंस ना तुझ्या सासूबाई किती नाराज झाल्या ते,” तिच्या आईच्या बोलण्यात संकोच डोकावत होता.
“आई, तू जास्त विचार करू नकोस. थोडावेळ पडतेस का? “
“नको, मला तुझ्या सासरी राहायला बरं वाटत नाही नवू. खरंच उद्या मला आपल्या घरी परत सोड.”
“तू कुठेही जाणार नाहीएस आई. माझं सुशांतशी दुपारीच बोलणं झालंय ह्याबद्दल. तुला बरं वाटल्यावर सुद्धा तू इकडेच राहणार आहेस. कायमची,” नवीनाने गौप्यस्फोट केला.
“कायमची? अजिबात नाही. मी माझ्याच घरी बरी आहे. मुलीच्या सासरी राहिले तर लोक काय म्हणतील?”
“कोणी काही म्हणत नाही आई. आपला विचार करायला लोकांकडे इतका रिकामा वेळ नसतो.”
“आणि तुझ्या सासूबाई? मी एका रात्रीसाठी आलेले त्यांना चाललं नाही.”
“त्यांना काय सांगायचं ते सुशांत बघणार आहे आई, तू त्याची काळजी करू नकोस. माझं बोलणं झालंय त्याच्याशी. त्यालाही माझा हाच निर्णय योग्य वाटतोय,” नवीना आईला शांत करायचा जो जो प्रयत्न करत होती, तिच्या आईच्या मनाची घालमेल वाढत होती.
नवीनाच्या अपेक्षेनुसार इकडे बाहेर हॉलमध्ये सुशीलाबाईंनी लेकाला फोन केला होता. “माझ्या मताला जर काही किंमत नसेल तर मी इकडे कशासाठी राहू सुशांत?” त्यांचं फोनवरचं बोलणं नवीनाला आत ऐकू जातंय ह्याची त्या व्यवस्थित काळजी घेत होत्या; पण पलीकडून लेकाने जे उत्तर दिलं ते ऐकून त्यांच्या पायाखाची जमीन सरकली.
“आई, हे घर जितकं माझं आहे तितकंच नवीनाचं पण आहे,” तो म्हणाला.
“मी कुठे नाही म्हणतेय? म्हणून तिने तिचं माहेर आणून ठेवायचं इकडे?” त्या तावातावाने बोलू लागल्या.
“आमचं लग्न झाल्यावर मी नाही का तुला तुझ्या वन बीएचके मधून इकडे घेऊन आलो. तुला आमची सोबत हवी म्हणून. मला जशी तुशी काळजी वाटते तशी तिलाही तिच्या आईची काळजी वाटणारच. स्वाभाविक आहे हे,” त्याने आईची समजूत घालायचा प्रयत्न केला.
“जनरितीला सोडून आहे हे. मुलाच्या घरात राहणं हा आईचा हक्क असतो, आणि जावयाच्या घरात राहणं लांच्छन. इतकं स्पष्ट बोलून सुद्धा लोकांना समजत कसं नाही?”
बाहेरून कानावर येणारे टोमणे ऐकून नवीना अस्वस्थ होत होती. आईच्या नजरेला नजर देण्याची तिची हिंमत होत नव्हती; पण आज ह्या गोष्टीचा कायमचा सोक्षमोक्ष लागायलाच हवा होता. तिने आणि सुशांतने स्वत:चं घर घ्यायचं ठरवलं तेव्हाच पूर्ण विचार करून तीन बेडरूमचा फ्लॅट घेतला होता. नवीनाच्या आई-वडिलांना अधून मधून लेकीच्या घरी यायला मिळेल ह्या हिशोबाने. त्यांची एकुलती एक मुलगी होती ती. म्हणूनच नवीनाने सुशांतच्या बरोबरीने कर्जाची जबाबदारी उचलायची तयारी दाखवली. पण घर घेतल्यापासून एक रात्रसुद्धा ते दोघं इकडे थांबले नव्हते. चार महिन्यांपूर्वी तिचे बाबा गेले, तेव्हापासून आई एकटीच राहात होती. तेव्हाही नवीनाला खूप वाटत होतं, आईला आठ-पंधरा दिवस आपल्या घरी आणावं; पण त्यावेळी तिच्या सासूने प्रचंड धिंगाणा घातला आणि नवीनाचा बेत हाणून पाडला होता. आता मात्र नवीनाने स्वत:ला पुन्हा पुन्हा बजावलं.
“सावनी म्हणाली तेच बरोबर आहे. मला दुबळं होऊन चालणार नाही. आईला माझी गरज आहे, मी तिला वाऱ्यावर सोडणार नाही,” तिने स्वत:ला बजावलं. आणि ठामपणे आपल्या आईला म्हणाली, “आई तू लेकीच्या सासरी नाहीयेस, लेकीच्या हक्काच्या घरात आहेस. तू आणि बाबांनी पोटाला चिमटा काढून मला एमबीए पर्यंतचं शिकवलं. त्या शिक्षणातून होणाऱ्या कमाईतून मी पण ह्या घराचे हप्ते भरतेय. ह्याची जाणीव तुझ्या जावयाला आहे हेच माझ्यासाठी खूप आहे.”
“अगं पण तुझ्या सासुबाईंच्या मनाविरुद्ध मी इकडे कशी राहू? येता जाता टोमणे मारतील त्या तुला. आणि तू ऑफिसला गेल्यावर मला त्यांच्यासोबतच राहावं लागेल ना?”
“मी आठ दिवस रजा घेतलीय तुझ्यासाठी. तोवर हा प्रश्नच नाही. आणि नंतरही तू ह्या घरात रुळेपर्यंत मी घरूनच काम करेन. तशी ऑफिसमधून परवानगी घेतलीय मी,” आईच्या प्रत्येक शंकेवर नवीनाकडे उत्तर होतं. ज्याने तिच्या आईचं मात्र काही केल्या समाधान होत नव्हतं. ती धडधडत्या मनाने बाहेरच्या बोलण्याचा कानोसा घेतेय हे नवीनाला जाणवलं.
“तुम्ही नवरा बायकोने संगनमत करून सगळं ठरवलंच आहे तर मी माझ्या जुन्या घरी परत जाते. जीव गेला तरी तुझ्या दारात पुन्हा पाय ठेवणार नाही,” सुशीलाबाईंनी शेवटचं अस्त्र काढलं.
“आम्हाला दोघांनाही तू कायम आमच्या सोबत राहयलेली हवी आहेस; पण तुला जायचंच असेल तर मी अडवणार नाही. इथून जाण्याचा निर्णय तुझा निर्णय असेल आई,” सुशांतही वैतागून बोलला. “आणि नवीनाच्या आई ह्याच घरात राहतील हा माझा निर्णय आहे.”
“शेवटी बायकोच्या आहारी गेलास तू पण. सासूसाठी आईला परकं केलंस,” सुशीलाबाईना लेक ह्या निर्णयावर येईल ह्याची अजिबात अपेक्षा नव्हती.
“तिची आई आपल्यासोबत नको असेल, तर आजपासून आम्ही दोघं सगळ्याच बाबतीत टीटीएमएम सुरु करतो,” त्याने म्हटलं.
“ते काय असतं?”
“तुझं तू माझं मी.’ म्हणजे आजपासून नवीना तिच्या आईची काळजी घेईल. अर्थात तिच्या आईच्या घरी राहून. आणि मी तुझी काळजी घेईन. नवीना तिचा पगार तिच्या आईवर खर्च करेल. तुझं दुखणं खुपणं ही माझी जबाबदारी असेल. आणि हो, ह्या घराचे जेवढे हप्ते तिने भरले आहेत, ते आपण तिला परत करायचे. कारण आता घर फक्त आपलं असणार आहे. नवीना तिच्या आईला घेऊन उद्या सकाळी तिच्या माहेरी जाईल. फक्त मी परत येईपर्यंत प्लीज तू एकटीने मॅनेज कर” एवढं बोलून त्याने फोन कट केला.
सुशांतच्या स्पष्ट बोलण्याने सुशीलाबाई चांगल्याच हादरल्या. मुलगा सतत फिरतीवर असतो. आपली सून निघून गेली तर आपल्याला एकटीला राहावं लागेल, घरातली सगळी कामं करावी लागतील. आणि मुख्य म्हणजे एवढ्या मोठ्या घराचे हप्ते एकट्याने भरताना आपल्या मुलाच्या तोंडाला फेस येईल. ह्या सगळ्याची त्यांना जाणीव झाली, तशा त्या उठल्या आणि लगबगीने नवीनाच्या खोलीत गेल्या.
“नवीना,” त्यांच्या हाकेने नवीनाच्या आईच्या मनात धस्स झालं. आता आणखी काय असे भाव होते तिच्या चेहऱ्यावर; पण नवीना मात्र शांत होती. आपली सासू काय बोलणार ह्याचा तिला साधारण अंदाज आला होता.
“मला सुद्धा खिचडीच कर. तू दिवसभराची दमलेली आहेस. वेगळं काही करू नकोस,” त्यांनी मवाळ सुरात सांगितलं.
“हो आई, तुम्ही तुमची सिरीयल बघा, तोवर होईल माझी खिचडी,” तिनेही उगीच ताणून धरलं नाही. नवीना खिचडी करायला खोलीतून बाहेर जाऊ लागली तशी त्यांनी पुन्हा हाक मारली.
“मी काय म्हणते,” त्यांच्या बोलण्यावर तिने वळून बघितलं. “सुशांत येईपर्यंत तुझ्या आईला इकडे तुझ्या खोलीत झोपू दे. रात्री काही हवं असलं तर तुझी सोबत होईल.” नवीनाची आई तोंडाचा आ वासून त्यांच्याकडे बघत होती.
“एक दोन दिवसांत आपण त्या तिसऱ्या बेडरूमची साफसफाई करून घेऊ. सुशांत आल्यावर ह्या तिकडे आरामात राहतील. काय वाटतं तुला?”
“नको, दोन दिवस राहून मी माझ्या घरी परत जाईन,” नवीनाची आई चाचरत बोलली.
“माझ्या बोलण्याने दुखावला आहात म्हणून असं म्हणताय ना? तुमच्या तब्येतीचा विचार न करता मी मगाशी नको नको ते बोलले. माफ करा मला.”
“अहो, हे काय करताय तुम्ही सुशीलाताई? माझ्या मुलीच्या सासूबाई आहात तुम्ही. माझी माफी का मागताय?”
“इतके दिवस चुकीचं वागत आले; पण आज माझे डोळे उघडलेत. संसार ह्या दोघांचा आहे, दोघं मिळून संसाराची जबाबदारी बरोबरीने उचलतायत. मग दोघांच्या आई-वडिलांना त्या संसारात सारखीच जागा असायला हवी हे पटलंय मला. खरं तर नवीनाचे बाबा असताना हे सुचलं असतं, तर त्यांनाही लेकीच्या घरी निवांत राहता आलं असतं. पण आता तुम्ही कुठेही जायचं नाही आहात एवढं नक्की,” नवीनाच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं.
बाहेर जाता जाता नवीनाच्या मनात आलं, “सावनीने सांगितलेली मात्रा बरोबर लागू पडलेली दिसतेय. तिने मला सुशांतला फोन करायला लावला म्हणून बरं झालं. त्याने आपल्या आईला कळेल अशा शब्दांत समज दिली. हेच जर मी बोलले असते तर आईंनी मनात डूख धरला असता. आणि मुख्य म्हणजे माझा नवरासुद्धा त्याच्या परीक्षेत फुल्ल मार्क्सनी पास झालाय,” ती स्वत:शीच खुदकन हसली.
आईची काळजी कायमची मिटली म्हणून खुश झालेल्या नवीनाने किचनकडे मोर्चा वळवला. तिच्या आईच्या आणि सासूच्या हसण्याचे आवाज ऐकता ऐकता खिचडी कधी रटरटायला लागली तिचं तिलाही कळलं नाही.
समाप्त
© स्मिता प्रकाशकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा