Login

मातृ रूपेन संस्थिता भाग ३

Stri Vishesh

शीर्षक. मातृ-रूपेण संस्थिता भाग ३

लेखिका - स्वाती बाळूरकर, सखी

रत्ना पण मनात विचार करायला लागली मध्यमवर्गीy आणि उच्च वर्गांमधली परिस्थिती वेगळी आहे पण निम्न वर्गात हे व्यसन खूप भयानक आहे.
निम्न वर्गातले हे व्यसन खूप त्रासदायक आहे त्यात बायका लेकरं भरडले जातात. ते दिसत होतं .

स्पृहा रात्रभर काळजीत असायची पण सहन करायची.
आता ती लक्ष्मीचाच विचार करत राहिली , इतके कर्ज, ई .एम. आय. भरत, वरून बाहेर आपले स्टॅंडर्ड दाखवत हसतमुखाने व्यवस्थित राहायचं.
नवऱ्याला काहीच म्हणायचं नाही, त्याला वाईट वाटेल म्हणून . . . पण तो सुधारणार तर कधी?
तो तर आपल्याला गृहीत धरत आहे.


“ येते मॅडम, पुरुष असतात ना त्यांना एकदा झटका दिल्याशिवाय अक्कल येत नसते. आपण आपले घरदार सोडून येतो त्यांचा संसार करायला, मग आता काय तोंडाने परत माहेरी परत जायचं ?सांगा ? त्यामुळेच भावाने आज हात उचलला . तो दर महिन्याला माझं तोंड बघून मदत करतच आहे . नवरा ना नोकरी करतो, ना मदत करतो ! रात्री येऊन पिऊन पडतो .जाऊ द्या मॅडम, आमचं हे रोजचंच आहे. येतो तो चार दिवसात . काही करत नाही, मरायला पण हिम्मत लागते मॅडम .”

“हे पहा लक्ष्मी ,काही असो सणावाराला असं बोलू नकोस. मुलींकडे बघ”

त्या कवळ्या पोरी पण आईचं बोलणं ऐकत होत्या त्यांना त्यातलं काय कळत होतं कोण जाणे!

कन्या पूजनाला दिलेले पैसे आता मोठी ने हळुच आईकडे देऊन टाकले.

आज रात्री आपण इतका कडक नाही तरी काहीतरी बोलावच संदीपला असे विचार स्पृहाच्या डोक्यात चालू होता.

रत्नाने संदीप ला कॉल केला.
तो आला ,ते पण स्पृहाला आश्चर्य वाटलं.

रात्रीचं जेवण झालं. आणि रत्न संदीपला खाली कॉलनीतल्या देवीच्या दर्शनाला चल म्हणाली. स्पृहा गेली नाही. इशिता गेली आत्या मामासोबत .

दर्शनाला जाताना सहज बोलता बोलता वॉचमन च खालचा झालेला किस्सा सांगत होती.

खाली कॉलनीतली देवी अतिशय सुंदर होती, बाजूला तिचे रौद्र रूप केलेले होते. काली माता!
मंत्रोच्चार चालू होता -

या देवी सर्वभूतेषु दया-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः

या देवी सर्वभूतेषु मातृ-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः

रत्ना परतताना म्हणाली, “संदिप जो रे तिला! आपली स्पृहा खूप चांगली आहे. तिला त्रास होऊ देऊ नकोस. आता मनाने थकत चालली आहे ती !”

संदीप ला एक गुप्त इशारा मिळाला .
ताईशी झालेलं बाकीचं बोलणं देखील त्याने बायकोला सांगितलं नाही पण त्याच्या वागण्या बोलण्यातला सौम्य पणा पण लपला नाही .

रात्री ते घरी परतले.

स्पृहा आश्चर्यात पडली की असं काय बोलणं झालं असेल भाव बहिणीत की आज ते इतके चांगले वागताहेत .

दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने घर कामात मदत केली आणि खूप काळजी घेतली.
स्पृहा ने उत्साहाने दसऱ्याची पूजा वगैरे केली.

दुपारी न राहून त्यांने स्पृहाला मिठी मारली आणि रडायला लागला.

“ माझ्या इतक्या प्रॉब्लेम नंतर ही तू मला सांभाळतेस
झेलतेस. माझ्यासाठी हे असं जगणं अपमानास्पद आहे पण मी ते मनावर न घेता अजूनच अभिमानात राहतो. स्पृहा तू देवीची सगळी चांगली रूप मला दाखवलीस.
तू अन्नपूर्णा होऊन, माझी माय होऊन मला खाऊ घालतेस , मी कमावून आणू की न आणो. एक वचन देतो तुझी काली माता मुद्रा किंवा रुद्र अवतार दाखवण्याआधी माझ्यात बदल होईल “

आणि खरंच दिवाळीपर्यंत संदीप धडपड करून चांगलं कंपनीत नोकरीला लागला होता.

आता तो स्पृहाची काळजी घेत होता, स्वतःचे खर्च आवरते घेत होता. व्यसनाधीनतेमध्ये त्याच्या एकदमच फरक पडला होता.

सतत मुलींची काळजी करत होता.

या दिवाळीत भाऊबिजेला तो रत्नासाठी साडी घेऊन आला. संदीप आणि इशिता नमिता वर गेले.

स्पृहा तिथेच लक्ष्मीच्या घराजवळ अडखळली, दारात सुबक रांगोळी काढलेली होती.

पाहिलं तर तो वॉचमन तिथेच होता, मुलीला कडेवर घेवून फिरत होता.

स्पृहा हळूच लक्ष्मीला म्हणाली,” अगं पण हा परत आला?”

“ आला की आठ दिवसात . जातो कुठे? आता तर आम्ही दोघांनी काम वाटून घेतली आहेत. समोर बंगल्यावर नोकरी करतोय. एकच कडकलक्ष्मी चां अवतार दाखवावा लागला पण . . भटकलेला पुरुष येतो बरोबर रस्त्यावर .” ती आनंदाने हसली. आज ती खाली अंगणात दिवे वगैरे लावत होती.
दोन मुली आनंदाने अंगणात खेळत होत्या.

बायकांनी एकदा रूप बदलले नाही तर पुरुषाला त्याची जाणीव होत नाही. त्यांना ती जाणीव करून द्यावी लागले.

स्पृहा आनंदाने एक गोड स्मित चेहऱ्यावर घेवून वर रत्ना कडे निघाली.

समाप्त.
©®स्वाती बालुरकर ,सखी.
दिनांक २०.०१.२५

अष्टपैलू कौटुंबिक जलद फेरी

(कथेचे सर्वाधिकार लेखिकेच्या अधीन आहेत या साहित्याचे कॉपी करणे किंवा परवानगीशिवाय वापर करणे हा दंडनीय अपराध आहे.)

कथे संबंधी आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवाव्या.