मातृत्व. भाग - २
का नाही होणार? आज तो जे काही आहे ते तुमच्यामुळेच आहे. तुमचे त्याच्यावर खुप उपकार आहेत त्यामुळे तो लगेच लग्नाला तयार होईल, बघाच तुम्ही!" सुमन म्हणाली तसं त्या दोघांनाही खुप आनंद झाला. मग त्यांनी ही गोष्ट दिक्षाला पण सांगितली. तिलाही ते ऐकून खूप आनंद झाला आणि तिच्यात जगण्याची नवी उमेद निर्माण झाली.
थोड्या दिवसांनी वृषभ घरी आल्यावर सुमनने संधी पाहून त्याच्याशी बोलायचं ठरवलं. आणि ती त्याच्या खोलीत गेली.
"वृषभ, मला तुझ्याशी बोलायचे आहे थोडं!" सुमन म्हणाली.
"आई, कशाबद्दल बोलायचं आहे तुला?" वृषभने विचारलं.
"आता तुझं लग्नाचं वय झालं आहे तर माझी अशी इच्छा आहे की तू दिक्षा सोबत लग्न करायला हवं, म्हणजे तुझं लग्न झाल्यावर सुद्धा तुला माझी काळजी राहणार नाही. मी इथेच सदाशिव आणि मालती सोबत राहिल." सुमन म्हणाली तसं वृषभ एकदम रागाने जागेवरून उठला.
"आई, तू काय बोलतेय हे तुझं तुला तरी कळतंय का? ती दिक्षा माझ्या स्टेटसला थोडी तरी सुट होतेय का! माझं शिक्षण आणि तिच्या शिक्षणात जमीन आसमानाचा फरक आहे. कुठे ती बारावी झालेली आणि मी विदेशात नोकरी करणारा, आणि जरी लग्न केलं तरी.... वंशाला दिवा.... त्याचं काय? ती कधीचं आई होऊ शकणार नाही हे माहीत आहे ना तिला मग तरीही तू असं बोलतेय." वृषभ रागाने म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून सुमनला प्रचंड चिड आली.
"मला माहित नव्हतं वृषभ, तुझे विचार इतके खालच्या दर्जाचे असतील. दिक्षाला मुल होऊ शकत नाही म्हणून ती आई होऊ शकणार नाही हे चुकीचे आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या मामा आणि मामीने जर तुला आसरा दिला नसता तर कदाचित आज तू काहिच नसता. कुठे तरी एखाद्या छोट्याशा कंपनीत काम करत असता." सुमन रागाने बोलली. त्यानंतर त्यावरून त्या दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालं आणि वृषभ रागाने घर सोडून गेला.
वृषभ गेल्यावर सुमनने ही गोष्ट सदाशिव आणि मालतीला सांगितली. ते ऐकून त्यांना खुप दुःख झालं पण त्यांनी सुमनला अंतर दिले नाही. दिक्षानेही तिच्या लग्नाचा विषय परत कधीच कोणासमोर काढायचा नाही असे तिच्या आई बाबांना सांगितले आणि तिने कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतला. ती फक्त स्वतःच्या कामाकडे लक्ष देऊ लागली.
काही दिवसांत दिक्षाने स्वतःचं साड्यांचं दुकान पण टाकलं. आणि तिचं टेलरिंग काम पण चालू ठेवलं. एक उत्तम टेलर म्हणून तिला सगळे ओळखू लागले आणि ती प्रगतीचं एक एक पाऊल पुढे टाकत गेली.
तीन वर्षांनंतर अचानक एक दिवस वृषभ घरी आल्या, पण तो एकटा नाही आला. त्याच्यासोबत एक सहा महिन्यांचं छोटं बाळ होतं. त्याला बघून सुमनला धक्का बसला. ती अजूनही त्याच्यावर रागावली होती.
"हे घर सोडून जाताना मोठ्या तोऱ्यात गेला होता ना मग आता का आलाय इथे? तुला या घरात जागा नाही." सुमन रागाने म्हणाली.
"आई, असं नको बोलू... मला तुमची गरज आहे. हा माझा मुलगा आहे, मी इथून गेल्यानंतर काही दिवसांनी लग्न केलं आणि माझ्या मुलाला जन्म दिल्यानंतर माझी बायको हे जग सोडून गेली... मी आत्तापर्यंत याला सांभाळलं पण आता मला एकट्याला नाही जमत त्याला सांभाळयला. आई प्लीज मला माफ कर, तुला वाटतंय ना मी दिक्षा सोबत लग्न करावं मग ठिक आहे, मी करतो दिक्षा सोबत लग्न. पण मला आता खरंच तुमची सगळ्यांची गरज आहे." वृषभ म्हणाला तसं सुमन त्याच्याकडे बघत काहीतरी विचार करू लागली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा