Login

मातृत्व (प्रारब्ध) भाग -३

बाळ जन्माला घालणं म्हणजेच मातृत्व नसतं.
मातृत्व. भाग - ३

"मी दिक्षाला काहीच बोलणार नाही, तुला गरज आहे ना मग तूच तिच्याशी बोल. पण जर तिची इच्छा नसेल तर तू तिला जबरदस्ती नाही करू शकत." सुमन.

"चालेल मी बोलतो तिच्याशी. ती कुठे आहे सांग मला!" वृषभने विचारलं तेव्हा सुमनने फक्त बाजूच्या खोलीकडे हात केला. मग वृषभ लगेच त्याच्या बाळाला घेऊन तिकडे गेला. दिक्षा तिच्या कामात मग्न होती. तो आल्याचे तिला कळलेही नाही पण बाळाच्या आवाजाने तिने मान वर करून पाहिलं तर समोर वृषभ दिसला. त्याला बघून ती लगेच उभी राहिली.

"वृषभ, तू आत्ता इथे कसं काय आलास आणि हे बाळ कोणाचं आहे?" दिक्षाने विचारलं.

"हे माझंच बाळ आहे दिक्षा, माझी बायको आता या जगात नाही, या बाळाला आईची गरज आहे. तू त्याची आई होशील का? माझ्याशी लग्न करशील का?" वृषभने डायरेक्ट तिला विचारलं. त्याच्या बोलण्याने क्षणभर ती गोंधळून गेली. पण नंतर परत त्याला उत्तर दिले.

"ज्यावेळी आपल्या घरात आपल्या लग्नाचा विषय काढला तेव्हा तू मला नाकारून निघून गेलास आणि आता तुला गरज आहे म्हणून तू माझ्याकडे आला आहे ना!" दिक्षा रागाने म्हणाली.

"माझी खरंच चुक झाली दिक्षा, मला माफ कर पण आता खरंच मला तुझी गरज आहे. प्लीज या बाळाकडे बघून तरी माझ्याशी लग्न करायला तयार हो." वृषभ.

"तुला जरी माझी गरज असली तरी आता मला तुझी गरज नाही, राहिला प्रश्न बाळाचा तर त्याला मी सांभाळेल, त्याची आई व्हायला मी तयार आहे पण तुझ्यासारख्या स्वार्थी माणसासोबत मी लग्न करणार नाही." दिक्षा.

"असं नको बोलू दिक्षा, प्लीज मला माफ कर, पण या बाळासाठी तरी लग्नाला तयार हो." वृषभ.

"नाही वृषभ, आज तुला गरज आहे म्हणून तू असं बोलतोय पण उद्या बाळ मोठं झाल्यावर तुझी गरज संपेल, मग तेव्हाही तू असाच निघून गेला तर मी काय करू?" दिक्षाच्या बोलण्यावर वृषभ गप्प झाला. त्याला दिक्षाच्या शब्दांनी हादरवून टाकलं होतं. तिच्या डोळ्यांतील आत्मविश्वास आणि शब्दांतील ठामपणा पाहून त्याला समजलं होतं मातृत्व ही केवळ अपत्य जन्माला घालण्याने मिळणारी ओळख नाही, तर ती आहे समर्पणाची, जबाबदारीची, आणि प्रेमाची.

त्याने हलकेच बाळ दिक्षाच्या हातात दिलं.
"जमलं तर खरंच मला माफ कर... आणि माझ्या बाळाला सांभाळ, धन्यवाद." एवढंच बोलून तो मागे फिरला.

दिक्षाने बाळाला कुशीत घेतलं. ते छोटंसं निरागस बाळ तिच्या हृदयाशी विसावलं आणि तिच्याकडे टकमक बघू लागलं जणू त्यांचं जन्मोजन्मीचं नातं जुळलं होतं. दाराआड उभी असलेल्या सुमनने दिक्षाला त्या बाळाला घेताना पाहिलं आणि तिचे डोळे पाणावले.

त्या दिवशीपासून दिक्षा त्या बाळाची आई झाली. ती त्याच्यासाठी जगू लागली, त्याच्या प्रत्येक हसण्यात, रडण्यात, पावलात, तिला तिचं संपूर्ण आयुष्य दिसू लागलं.

तिनं लग्न न करता स्वतःच्या पायावर उभं राहिली, त्या बाळाचं आणि आपल्या आत्मसन्मानाचं पूर्ण जतन केलं. गावातल्या सगळ्या महिलांसाठी ती प्रेरणा झाली, एकटी स्त्री असली तरी ती अपूर्ण नसते. हे तिने लोकांना दाखवून दिले.

"मातृत्व" म्हणजे केवळ बाळ जन्माला घालणं नाही, तर त्याला प्रेम, सुरक्षा आणि दिशा देणं... आणि ते दिक्षाने सुंदरपणे सिद्ध केलं.

समाप्त.....

लेखिका - रोहिणी किसन बांगर

🎭 Series Post

View all