Login

मातृत्वाचे दान. भाग -चार (अंतिम )

कथा मायेच्या ममतेची.


मातृत्वाचे दान
भाग -चार (अंतिम)


"शांत हो रश्मी. अगं देवाने एकदा हिरावले म्हणून काय झाले? तोच तुला दुसरी संधी देईल. तू शांत हो बघू." आपले डोळे पुसत विभा तिला समजावत होती.

खोलीच्या दारातून विनय हे ऐकत होता. त्याचे डोळे भरून आले. आत्ताच थोड्यावेळापूर्वी डॉक्टरने त्याला आत बोलावून जे सांगितले ते त्याच्या कानात गुंजत होते.

"मिस्टर विनय, आपण या अपघातात बाळ गमावले तरी रश्मीला वाचवू शकलो. देवाचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. पण.."

"पण काय डॉक्टर?"

"पण रश्मीचे गर्भाशय खूप नाजूक झाले आहे. यापुढे दुसऱ्यांदा आई बनणे तिला झेपणार नाही. ती जर पुन्हा प्रेग्नन्ट राहिली तर बाळ आणि आई दोघेही वाचू शकणार नाही. मला काय म्हणायचे आहे ते कळतेय ना? तिला जपण्यासाठी तुम्हाला योग्य ती काळजी घ्यायची आहे. दुसरा चान्स पुन्हा नको."

डॉक्टरांनी सांगितले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. जड पावलांनी तो तिथून निघून रश्मीच्या खोलीत येत होता की विभाचे शब्द कानावर पडले आणि त्याच्या डोळ्यातील अश्रू खाली आले.

*******

"तू माझ्यापासून काहीतरी लपवतो आहेस होय ना?"
विनयच्या डोळ्यातील पाणी बघून रश्मी विचारत होती.

त्याने मानेनेच 'नाही' म्हणून नजर खाली केली.

"विनय, त्या घटनेला पाच महिने होऊन गेलेत. मी हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न करतेय. तूही कर ना." त्याचा हात हातात घेत ती म्हणाली.

"हो गं. बरं झाली का तुझी पॅकिंग? आज राखीचे डोहाळजेवण आहे ना? जायचं आहे ना आपल्याला?" तो विषय बदलवत म्हणाला.

"म्हणून तू दुःखी आहेस ना? आपल्या सातव्या महिन्याच्या वेळी किती धमाल केली होती आणि त्यानंतर पुढच्या महिन्यात तसं घडलं." तिने तिचे डोळे पुसले."बट डोन्ट वरी, आपण लवकरच नेक्स्ट चान्स घेऊया."

"नाही रश्मी यापूढे कधीच नाही." तिच्या बोलण्यावर तो घाबरून रिऍक्ट झाला.

ती गोंधळली. कितीदा विचारूनही तो काही सांगेना तेव्हा तिने त्याला शपथ घातली आणि मग डॉक्टर जे बोलले होते ते त्याने तिला सांगितले. दोघेही एकमेकांच्या कुशीत शिरून रडत होते.

थोड्यावेळाने विनयने तिला स्वतःपासून वेगळे केले.

"आवर लवकर. आपल्याला जायचे आहे ना."तो तिला समजावत होता.

"मला नाही जायचंय कुठेच. का देव इतका निष्ठुर वागला रे माझ्याशी?" ती अजुनही हुंदके देत होती.

"रश्मी, तुला शपथ आहे माझी. तू येणार नसशील तर मलाही हा कार्यक्रम नको." राखीने फोनवर शपथ घातली तेव्हा नाईलाजाने विनय आणि रश्मी माहेरी आले.

कार्यक्रम पार पडला. रश्मी तिथे नावापूरतीच होती. आता आपण कधीही आई बनणार नाही ही सल मनात घाव करत होती. एका क्षणाला सगळे असह्य झाले आणि ती तिच्या खोलीत जाऊन रडायला लागली.

"रश्मी?" राखी तिच्या पाठोपाठ आत आली.

"सॉरी वहिनी. किती प्रयत्न केला तरी तुझ्या कार्यक्रमाला गालबोट लागलेच." डोळे पुसत रश्मी म्हणाली.

"रश्मी, असे का बोलतेस तू? तुझे मन मला कळणार नाही एवढी परकी समजतेस का गं मला? तुझी वहिनी होण्याआधी तुझी बेस्ट फ्रेंड होते ना मी? हे दिवस जातील गं. मला नाही का देवाने चार वर्ष वाट पहायला लावली? तुझ्या बाबतीत सुद्धा सगळं नीट होईल." तिचा हात हातात घेऊन राखी म्हणाली.

"हे सुख माझ्या नशिबी नाहीये गं राखी." तिच्या गळ्यात पडून रश्मी स्फून्दू लागली. विनय जे बोलला ते तिने राखीला सांगितले तसे राखीच्या डोळ्यात पाणी आले.

रात्रभर राखी जागी होती. आपल्या लाडक्या मैत्रिणीची ही अवस्था तिला बघवत नव्हती. शेवटी तिने एक निर्णय घेतला तेव्हा कुठे पहाटे तिचा डोळा लागला.


"वहिनी, आम्ही निघतो आता. तू झोपली होतीस म्हणून डिस्टर्ब केले नाही." सकाळी रश्मीच्या आवाजाने राखीने डोळे उघडले.

"रश्मी, तू कुठे निघालीस? आता दोन महिने माझी डिलिव्हरी होईपर्यंत तू कुठेच जायचे नाहीस. माझ्यासोबत तूही ही प्रेग्नन्सी एंजॉय करायचीस." तिच्या हाताला पकडून राखी म्हणाली.

"तिच्या दुःखावरची खपली काढल्यासारखी काय बोलतेस राखी?" आज पहिल्यांदा विभा राखीवर रागावत होती.

"आई, अहो चुकीचे समजू नका. रश्मी इथे बैस. हे अनुभव." रश्मीचा हात पोटावर ठेवून ती म्हणाली.

"अगं, माझ्या पोटात दोन बाळं वाढत आहेत. मी तर आशाच सोडून दिली होती आणि तुझ्या डोहाळजेवणाला मी प्रेग्नन्ट असल्याचे पहिल्यांदा कळले. तुझ्या बाबतीत जो वाईट प्रसंग घडला त्या दिवशी मला ट्विन्स आहेत हे समजलं. बघ ना देवाच्या मनात हेच असावं. त्याला आपल्या मैत्रीची परीक्षा बघायची असावी म्हणून त्याने हे घडवून आणले. मला तर एकच बाळ पुरेसे होते पण त्याने दोन देऊ केलेय. पण त्याने प्रत्येक वेळी संकेत दिले की त्यातील एकच बाळं माझे आहे." बोलता बोलता ती थांबली. सर्वजण
तिच्याकडेच पाहत होते.

"आणि दुसरे बाळ तुझे आहे रश्मी. जे देवाने माझ्या उदरात केवळ वाढण्यासाठी पाठवलेय." डोळ्यात पाणी आणून ती म्हणाली.

सगळे तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते. रश्मी तिला मिठी मारून रडायला लागली.

******

दोन महिने कसे उलटून गेले कळलेच नाही. पाळण्यात दोन चिमणी बाळं भुकेने रडत होती. राखीने दोघांनाही छातीशी लावले. पोट भरल्याची जाणीव होताच तिने पहिल्या बाळाला रश्मीच्या हातात दिले.

त्या कोवळ्या स्पर्शाने रश्मीचा ऊर भरून आला. तिच्या पदरात आज मातृत्वाचे दान पडले होते.

***समाप्त ***
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

🎭 Series Post

View all