मातृत्वाचे दान.
भाग -तीन.
भाग -तीन.
"पण ते शक्य झाले नाही. बीपी अजूनही वाढूनच आहे आणि ब्लिडींग झाल्यामुळे बाळाचे श्वास कमी होत आहेत. म्हणून डॉक्टरांनी आता लगेच ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतलाय." तो लहान मुलासारखा रडत होता.
"तुम्ही स्वतःला सांभाळा. ठीक होईल सगळं." विभा त्याला धीर देत होती, पण आतून तीही खचली होती.
डॉक्टरांनी ऑपरेशन करून बाळाला बाहेरच्या जगात तर आणले पण त्या जीवाची वाचण्याची शाश्वती फारच कमी होती. आयसीयूतील काचेच्या पेटीत त्याला ठेवले होते. एक दिवस तिथे ठेवले आणि दुसऱ्या दिवशी त्याने जगाचा निरोप घेतला. इकडे रश्मी बाळासाठी वेडी झाली होते. हे आठ साडेआठ महिने ती त्याच्यात गुंतली होती आणि ते कारणच तिच्यापासून हिरावले होते.
******
"अभिनंदन राखी. तू नीट काळजी घेतलीस आणि आता तुझा गर्भ देखील छान आहे. आणि हे बघ, एक नव्हे बरं का दोन बाळांचे गर्भ तुझ्या उदरात वाढत आहेत. हृदयाचे ठोके सुद्धा सुरू झाले आहेत. तुला हीच काळजी सुरू ठेवायची आहे कारण वळ अजून वर सरकली नाहीये. त्यामुळे कधीही ब्लिडींग सुरू होऊ शकते. सो बी केअरफुल अँड काँग्रॅच्यूलेशन्स." राखीचे डॉक्टर तिला सोनोग्राफी मधील दोन छोटूसे बाळे दाखवत म्हणाल्या.
राखीला तर एकदम उंच उंच आकाशात उडतेय असे वाटत होते. एकतरी बाळ पदरी असावे म्हणून आसूसलेली ती देवाने तिला दोन बाळांचे वरदान दिले होते.
ती हळुवार उठून केबिनच्या बाहेर आली. सुजितला तिचे डोळे शोधत होते. केव्हा ही आनंदाची बातमी त्याला सांगते असे तिला झाले होते. तो तिला फोनवर बोलताना पाठमोरा दिसला. आनंदाचे भाव घेऊन ती त्याची वाट बघत होती.
"तुला माहितेय सुजित, डॉक्टर काय म्हणाले.." तो जवळ येऊन बसला तशी त्याच्या चेहऱ्यावर नजर वळवून ती सांगायला लागली.
"राखी, आपल्या रश्मीचे बाळ गेले गं." तिचे बोलणे पुरे होण्याआधीच सुजित तिचे हात हातात घेऊन म्हणाला. डोळ्यातील पाणी खळकन तिच्या हातावर पडले.
त्याच्या अशा बोलण्याने राखी एकदम दचकली. रश्मीला ऍडमिट केलंय एवढेच तिला ठाऊक होते. विभाने मुद्दाम इतर गोष्टी तिच्या कानावर घालायच्या नाही म्हणून सुजितला बजावले होते पण विनयचा फोन आल्यावर त्याने भावनेच्या भरात राखीला सांगून टाकले. तिच्या हृदयात एकदम धस्सच झाले. डॉक्टरांनी सांगितलेली आनंदाची बातमी ती त्याला सांगू शकली नाही.
रश्मी तिची केवळ नणंद नव्हती तर दोघी जीवभावाच्या मैत्रिणी होत्या. कॉलेजला त्या दोघी एकत्र असताना सुजितने तिला पाहिले आणि तिच्यावर त्याचा जीव जडला. रश्मीला पुढे शिकायचे होते म्हणून ती शिकत राहिली आणि सुजितला लग्नाचे वेध होते म्हणून राखीसोबत त्याने लग्न उरकून टाकले. त्या दोन मैत्रिणीचे आणखी एक नवे नाते निर्माण झाले होते.
"सुजित हे माझ्यामुळे झाले ना रे? मी प्रेगन्ट राहिले म्हणून आई इकडे थांबल्या आणि तिकडे रश्मीसोबत नको ते घडले." रात्री ती त्याच्या कुशीत डोके ठेऊन रडत होती.
"ए राखी, अगं यात तुझा काय दोष? अचानक बीपी वाढले म्हणून रश्मी खाली पडली. आई तिथे असती तरी तिला घेरी आली असतीच ना? तू स्वतःला दोष लाऊन घेऊ नकोस आणि जास्त विचार देखील करू नकोस. स्वतःकडे लक्ष दे." तिच्या केसावरून हात फिरवत तो तिला शांत करत होता.
*******
"आई, मला माझं बाळ हवंय गं. मी रिकाम्या हाताने घरी कशी जाऊ?" आठवड्याभरानंतर रश्मीला डिस्चार्ज मिळाला होता आणि ती विभाच्या मांडीवर डोके ठेवून रडत होती.
"शांत हो रश्मी. अगं देवाने एकदा हिरावले म्हणून काय झाले? तोच तुला दुसरी संधी देईल. तू शांत हो बघू." आपले डोळे पुसत विभा तिला समजावत होती.
खोलीच्या दारातून विनय हे ऐकत होता. त्याचे डोळे भरून आले. आत्ताच थोड्यावेळापूर्वी डॉक्टरने त्याला आत बोलावून जे सांगितले ते त्याच्या कानात गुंजत होते.
डॉक्टरांनी विनयला काय सांगितले असेल? रश्मीची मातृत्वाची आस होईल का पुर्ण? वाचा पुढच्या अंतिम भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा