Login

मत्सर (भाग:-१)

मत्सर करणाऱ्या रूपेशची कथा
ईरा चॅम्पियन ट्रॉफी:-२०२५

#जलद लेखन स्पर्धा

शीर्षक :- मत्सर

भाग:- १

सोनेवाडी निसर्गाच्या कुशीत वसलेलं छोटंसं गाव. त्याच गावात जुन्या पद्धतीने बांधलेला टोलेजंग, चिरेबंदी वाडा. आधी वैभवशाली असलेला वाडा आता मात्र एकदम भेसूर, भयाण दिसतं होता. इतका भयाण की दिवसाही त्या वाड्याकडे जायला लोक घाबरत असतं. लोक काय चिटपाखरूही तिथे फिरकत नसतं. त्या वाड्यातून रात्रीचे भेसूर, चित्रविचित्र, कर्णकर्कश आवाज येत असतं. त्यात प्रत्येक अमावास्या पौर्णिमा आली की हे आवाज आणखी गडद होत.

असं काय घडलं होतं त्या वाड्यात?

काही वर्षांपूर्वी -

"लय चांगले होते‌ आपले सरपंच. आता ह्यांची जागा कोण घेणार? " समोर सरपंचाचे सरणावर जळणारे पार्थिव पाहत हळहळत गावातील लोक आपापसात कुजबुजत होते.

नेहमी गजबज असलेला मोठा वाडा आज मात्र खूपच शांत वाटत होता. त्याला कारणही तसेच होते. गावाचे सर्वेसर्वा असलेले वसंतराव यांचा इहलोकी वास झाला होता. त्यामुळे वाड्याबरोबर गावातही भयाण शांतता पसरली होती. अख्ख्या गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते.

वसंतराव गावचे नामी जमिनदार व नंतर सरपंच झाले होते. गावातील लोकांना ते नेहमीच मदत करायचे. गावात त्यांना खूप मान व आदर होता. त्यांचे मवाळ बोलणे, मदतीला धावून जाणे ह्या त्यांच्या स्वभावाने त्यांचे गावकऱ्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण झाले होते. कोणतीही परिस्थिती किंवा कोणतेही संकट आले की सरपंच आपल्याला तारणार हे गावातील लोकांना माहिती होतं. वसंतराव म्हणजे एकप्रकारे गावाचे वालीच होते. आता त्या वाल्याची जागा त्यांच्या दोन्ही मुलांपैकी कोण घेणार याची उत्सुकता लोकांना लागली होती.

वसंतराव यांना दोन्ही मुले. मोठा महेश तर धाकटा रूपेश. महेश हा वसंतरावाची प्रतिकृती होता. त्याचे लग्न झाले होते. त्याला एक मुलगा व एक मुलगी. त्याची बायको राणी साधी, सरळ व खूप धार्मिक वृत्तीची होती. पुजापाठ यात ती रममाण असायची.

रूपेश अगदी महेशच्या विरूद्ध स्वभावाचा होता. त्याचंही लग्न झाले होते, त्याची बायको यामिनी धुर्त, अप्पलपोटी, शहराचं तिला प्रचंड आकर्षण होतं. लग्नाला पाच-सहा वर्षे झाले तरी त्यांना मुलंबाळं नव्हते. त्यावरून त्या दापंत्यात नेहमी खटके उडायचे.

महेश मोठा असल्याने सगळ्या गोष्टीत त्याला पहिला मान मिळायचा हीच गोष्ट त्या दोघा नवराबायकोच्या डोळ्यांत खुपत होती. त्यात कहर म्हणजे वसंतरावांच्या मृत्यूपत्रात लिहिलेल्या गोष्टीने रूपेशचा मत्सर आणखी वाढला.

दहा एकर शेत, दोन विहिरी, सोन्याचे व चांदीचे पिढीनुसार असलेले दागिने, भांडी अशी भरपूर संपत्ती आणि वाड्याची समान वाटणी केली होती आणि मोठा मुलगा म्हणून महेशची त्यांच्या मृत्यूनंतर त्याला सरपंच पद दिले गेले. हीच गोष्ट रूपेशला रूचली नाही.

शेत, संपत्ती, वाड्याचा वाटाही त्याला मंजूर नव्हते.

" कायद्याने जरी हा वाटा समान असला तरी मला हा अर्धा  वाटा मान्य नाही. ही सर्व संपत्ती, शेत आणि हा वाडा फक्त माझा आहे. सगळा गाव पायाशी असायला हवा.  मी एकटा ह्या संपत्तीचा वारस आहे. हे सर्व मी मेहनतीने नाही ताकतीने मिळवेन.  कसंही करून मी हे माझ्या नावावर करून घेणारंच. मला असे काही तरी करावे लागेल  जेणेकरून हे सगळं माझं होईल. पण काय करायचं?" वाटणीची कागदपत्रे हातात घेत एक नजर त्यावर टाकत तो मनात विचार करत होता.

पण महेश मात्र या वाटणीने शांत आणि समाधानी होता. तो कागदपत्रावर नजर टाकत मनात म्हणाला," अप्पांनी जे वाटून दिलं तेच भरपूर आहे. ही पिढीजात संपत्ती मी जपेन. पुढे अजून मी कष्टाने त्यात वाढ करेन.‌"

पण रूपेश आधीच महेशचा मत्सर करत होता. त्यात अजून भर पडली जेव्हा गावातील लोकांनी महेशला गावाचा सरपंच म्हणून निवडून दिलं. तेव्हा तो लोकांचे आभार व्यक्त करत नम्रपणे त्यांना म्हणाला," तुम्ही सर्वांनी एक मताने मला सरपंच केले त्याबद्दल तुम्हां सर्वांचे खूप आभारी आहे. अप्पांची जागा तर मी घेऊ शकत नाही, हा पण त्यांची कमी भरून काढण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करेन. आशा करतो की तुम्ही मला समजून घ्याल आणि अप्पांना जशी साथ दिलीत तशीच साथ मलाही द्यालं. कसलीही मदत लागली तर तुम्ही बिनधास्त मला सांगू शकता. "

"कर थोडे दिवस तू या पदाचा माज. नंतर तर ह्या पदावर बरोबर सगळंच काही माझं असेल." त्याचे बोलणे ऐकून रूपेश कुत्सित हसत मनात म्हणाला.

क्रमशः

काय करेल रूपेश? कशी मिळवणार तो संपत्ती? जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचा..

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. अंधविश्वासाला प्रोत्साहन देण्याचा मुळीच हेतू नाही. केवळ मनोरंजन म्हणून वाचावे. कथेतील पात्र, स्थान व नावे काल्पनिक आहेत. त्याचा जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. असे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


0

🎭 Series Post

View all