Login

मत्सर (भाग:५ अंतिम)

मत्सर करणाऱ्या रूपेशची कथा
ईरा चॅम्पियन ट्रॉफी:-२०२५

#जलद लेखन स्पर्धा

शीर्षक:- मत्सर

भाग:- ५ (अंतिम)

एके रात्री रूपेशने पाहिले की वाड्याच्या भिंतीवर विचित्र अशा लाल रंगाच्या खुणा उमटल्या आहेत. जसे की कोणीतरी आपले रक्ताने माखलेले हात त्या भिंती उमटवलेत.

एका रात्री त्याने स्वप्न पाहिले की धुराने भरलेले शेत आणि त्याच्या मधोमध महेशचे सडलेले प्रेत पडले होते. त्याचे डोळे खोबणीत बसवलेले, चेहरा गळून पडलेला आणि ओठांतून काळे किडे निघत होते.

"पुजा कधी करणार रे, रूपेश? " महेशने भेसूर घोगऱ्या आवाजात त्याला विचारले.

रूपेश घाबरून मागे सरकू लागला तेव्हा त्याच्या समोर त्याचाच चेहरा आला. त्याची त्वचा गळून पडली होती. डोळ्यांतून काळे रक्त वाहत होते. ओठ फाटलेले पण शिवून टाके घातले होते. त्याचे स्वतःचे असे भयानक रूप ज्याची त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. ते पाहून त्याची घाबरगुंडी उडाली.

ते भयानक रूप हळूहळू मंद मंद हसत म्हणाले," तुझ्या आत्म्याची वेळ झाली रे आता."

पुढच्याच क्षणी तो मोठ्याने चिरकत खाडकन डोळे उघडून झोपेतून उठून बसला. त्याचे पूर्ण शरीर घामाने डबडबले होते. हृदयाचे ठोकेही खूप वेगाने पडत होते. इतक्या वेगाने की त्यालाही ते ऐकू येत होते.

दुसऱ्या दिवशी त्याने शर्ट काढून पाहिले तर त्याच्या पाठीवर नखांनी ओरबडल्याच्या खुणा होत्या. ज्या यामिनीला दिसल्या. त्याच बरोबर त्या ठिकाणी त्याला चुनचुनही होऊन दाह होत होते.

यामिनीच्या म्हणण्यानुसार त्याने मंदिराच्या पुजाऱ्याला घरी बोलावले.

तो पुजारी म्हणाला,"रूपेशभाऊ, पौर्णिमेच्या रात्री पिंपळाच्या झाडाखाली पूजा करायली हवी. आजकाल तुमच्या घरची परिस्थिती जरा विचित्र वाटतं आहे."

त्याला नकारार्थी मान डोलावत रूपेशने ते हसून टाळत घमेंडीने म्हणाला," मीच काळी विद्या केली. ते फक्त मी करू शकतो. त्यासाठी कोणत्या पुजेची गरज नाही मला."

अवसर वाढत गेला. एका रात्री दोन वाजता त्याला अचानक जाग आली. त्याने पाहिले की टेबलावर उष्टा चहाचा कप आणि राख पडली होती.

वाड्यात चाललेल्या विचित्र घटनांमुळे सगळे नोकरचाकर घाबरून नोकरी सोडून कधीच पळून गेले होते. काळी विद्या आता जागृत झाली होती. रूपेशच्या जीवनाची ती भयानक रात्र होती. वाड्यातून जोरजोरात रडण्याचा, ओरडण्याचा आवाज येत होता.

त्यावेळी यामिनी गरोदर असल्याने हाॅस्पिटलमध्ये दाखल झाली होती.

रूपेश वाड्यात एकटाच होता. वाड्याचे दरवाजे आपोआप धाडकन बंद झाले. खिडकीतून वाड्यात हवा भरून गेली. लाईटी भडकून बंद चालू होऊ लागल्या. रूपेश जमीनीवर पडला होता. त्याचा चेहरा भीतीने पांढरफेक पडला होता. तो मोठमोठ्याने ओडरत होता,"मला माफ कर, दादा. मला माफ कर. मी चुकलो."

पण त्याच्या मदतीला कोणीच आले नाही. पूर्ण वाडा जणू अंधाराच्या वावटळात अडकले होता. हे सर्व इथेच नाही थांबले. काळ्या विद्येने वाड्याला अजगरसम गिळंकृत करायला सुरुवात केली होती.

इकडे हाॅस्पिटलमध्ये यामिनीने मुलाला जन्म दिला. परंतु बाळाच्या जन्म झाल्यावर अतिरक्त रक्त स्त्राव झाल्याने ती खूपच अशक्त झाली. तिची हालत खूप खराब झाली. तिच्या श्वासांची गती मंद होऊ लागली. डॉक्टर तपासत होते; पण त्याला खूप उशीर झाला होता. तिने अखेरचा श्वास घेत तिने जगाचा निरोप घेतला.

बाळ तर वाचलं होतं परंतु आईशिवाय तो कमकुवत आणि असहाय्य होतं. तीन दिवसांनी त्या निष्पाप जीवानेही प्राण त्यागले.

रूपेश आता पूर्णपणे तुटून गेला. वाड्याची प्रत्येक भिंत त्याला रोखून पाहत होती. वाड्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात त्याला महेशची सावली दिसू लागली.

दारू, गोंगाट आणि दिखाव्यात तो भीती दाबायचा प्रयत्न करत होता‌; परंतु त्याला ते जमतं नव्हते.

एका रात्री भींतीवर पुन्हा रक्ताने माखलेल्या लाल पंजाच्या खुणा उमटल्या आणि एक विचित्र आवाज त्याच्या कानात कुजबुजला,"दिवा कोठे आहे रे? नागबली मंत्रही तू विसरून गेलास; पण मला आठवण आहे ना, मी नाही विसरलो."

रूपेश घाबरून अंधारातून पळ काढत सिद्धबाबाकडे आला.

"बाबा ऽऽ बाबा, मला वाचवा, हो ! माझ्याकडून चूक झाली. मी सगळं काही करायला तयार आहे. पण मला यातून सोडवा." तो अगतिक होऊन बाबांच्या हातापाया पडू लागला.

बाबा डोळे मिटून ध्यानस्थ बसले होते. त्याने हळूवार डोळे उघडले आणि खड्या आवाजात म्हणाला, "मी तुला काळी विद्या देताना म्हणालो होतो की याला सांभाळणे फार कठीण आहे. याच्या सेवेत थोडी जरी चूक झाली तर ती काळी विद्या तुला सोडणार नाही. मी आता काही करू शकत नाही."

रूपेश हताश होऊन पुन्हा वाड्यात परतला. ती काळी विद्या त्याच्या डोक्यावर विराजमान होती. त्याचे शरीर कंप पावत होते. वाड्याचे दरवाजे आपोआप बंद होऊ लागले. काळ्या सावल्या त्याच्या शरीराभोवती गोल गोल नाचू लागल्या. हळूहळू त्या विद्येने त्याला इतके दुर्बळ बनवले की तो स्वतःच मुक्तीची याचना करू लागला.

मध्य रात्री वाड्यात अचानक एक जोरात आर्त किंचाळी गुंजली.

सकाळी गावातल्या लोकांनी वाड्याचे दार तोडून आत पाहिले तर सर्वांचे डोळे बाहेर यायचे बाकी राहिले होते इतके भयानक दृश्य त्यांच्या नजरेस पडले.

रूपेशचे धड खाली जमिनीवर पडले होते आणि त्याचे मुंडके वाड्याच्या छताला साडीत लटकलेले होते.

सगळ्यात भीतीदायक गोष्ट ही होती की त्याचा चेहरा सुजून निळा पडलेला होता आणि त्याचे डोळे सताड उघडे होते असं वाटत होतं की त्याला काही सांगायचे होते पण तो सांगू शकला नाही. त्याच्या तोंडातून काळी राख पडत होती. पूर्ण रूमभर सडका गंध पसरलेला होता.

ज्यावेळी रूपेशचे प्राण गेले तेव्हा जंगलात आपल्या ठिकाणावर ध्यानस्थ बसलेल्या बाबाला अस्वस्थ वाटू लागले. त्याने साधनेला सुरूवात केली. जसे त्यांनी डोळे मिटून घेतले. त्याला नजरेसमोर धगधगत्या आगीत होरपळणारा आत्मा दिसला. तो होरपळणारा आत्मा तडफडत काळ्या धुक्यात लपटलेला रूपेश होता.

तो एक दीर्घ श्वास घेत म्हणाला,"जे बीज तू रोवले होते त्याचे फळ तुला मिळाले. ज्याचा स्वाद आता तुला एकट्यालाच घ्यावा लागेल. काळी विद्या तिची वाटणी घेऊन गेली. काळी विद्या शक्ती तर देते पण त्याची किंमत आत्म्याकडून वसूल करतेच."

समाप्त -

मत्सर आणि लोभामुळे रूपेशने सीध्यासाध्या महेशचा जीव तर घेतलाच परंतु स्वतःच्या आयुष्याची स्वतःच्या हाताने राखरांगोळी करुन स्वतःचा जीवही गमावला.

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. अंधविश्वासाला प्रोत्साहन देण्याचा मुळीच हेतू नाही. केवळ मनोरंजन म्हणून वाचावे. कथेतील पात्र, स्थान व नावे काल्पनिक आहेत. त्याचा जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. असे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


0

🎭 Series Post

View all