Login

मत्सर (भाग:-२)

मत्सर करणाऱ्या रूपेशची कथा
ईरा चॅम्पियन ट्रॉफी:-२०२५

#जलद लेखन स्पर्धा

शीर्षक:- मत्सर

भाग:- २

महेश जरी सरपंच झाला तरी शेती करायचा. तो शांत, कष्टाळू आणि प्रामाणिकपणे त्याच काम करायचा. त्याला कोणत्याही प्रकारचा गर्व नव्हता.

तर रूपेशला कष्ट करणे, शेतात राबणे बेकार आहे असे वाटायचे. पिढीजात एवढी संपत्ती असताना कशाला काम करायचे ? असे तो नेहमीच महेशला म्हणायचा. त्याला सत्तेचा, संपत्तीचा प्रचंड गर्व होता, त्यामुळे तो घमेंडने वागायचा.‌

एकदा तो आणि रूपेश रस्त्याने बोलत जात होते. तेव्हा एका माणसाला शेणाने भरलेली पाटी डोक्यावर उचलून घ्यायची होती. पण ते जड असल्याने त्याला जमत नव्हते. तेव्हा महेश त्याच्या मदतीला धावून गेला. त्याला ती पाटी उचलण्यास मदत केली. तेव्हा तो माणूस त्याचे आभार मानून निघून गेला.

महेशने मदत केलेली रूपेशला पटली नाही. तो तोंड वाकडे करत म्हणाला,"दादा, काय रे ? तू गावचा सरपंच आहेस हे विसराल वाटतं. तुझं पद बघ जरा आणि तू काय काम करतोस? रूबाब दाखवयचा सोडून शेणाची पाटी उचलायला मदत केलीस. छी! बाबा. मी तुझ्या जागी असतो ना तर असं कधीच केलं नसतं. मी सरपंच पदाचा पुरेपूर फायदा उचलला असता.‌ कष्ट केलेच नसते."

"शेणाची पाटी उचलणे म्हणजे काय वाईट काम आहे का? आपण शेतकरी आहोत हे विसरून चालणार नाही आणि सरपंच असलो म्हणून काय झालं? गावातल्या लोकांना मदत करणं माझं कर्तव्य आहे. शेणाची पाटी उचलण्यात मला तरी काही कमीपणा वाटतं नाही. आपल्या पदाचा रूबाब दाखवायला मला आवडतं नाही. मी कष्टाला मानतो." महेश शांतपणे हसत म्हणाला.

"हं " असे एवढेच रूपेश म्हणाला. त्याला महेशचे बोलणे पटले नव्हते.

काही अडचण आली की गावातील लोक मदतीसाठी महेशकडे येत होते. त्याचा सल्ला व मत विचारात घेत असतं. तो जणू वसंतरावाची सावलीच होता. त्याचा शब्द गावकऱ्यांसाठी शेवटचा शब्द व अंतिम निर्णय असायचा.

"महेश सारखा भला देवमाणूस‌ आजकाल कुठे पाहायला मिळतो. तो आहे म्हणून आपलं गाव सुखात नांदत आहे. तो नसता तर गावाचे काय झाले असते काय माहिती? " असे गावाकऱ्यांच्या तोंडून महेशची होणारी स्तुती व कौतुक ऐकून रूपेशच्या मनात महेशबद्दल आणखी मत्सर वाढायचा. त्याला मिळणारा मान, इज्जत, प्रतिष्ठेमुळे त्याचं रक्त खवळायचे.

'जेव्हा बघावं तेव्हा फक्त दादाचंच कौतुक ऐकायला मिळतं, कानांना वीट आला माझ्या त्याचे गोडवे ऐकून ऐकून. जसं काही माझं अस्तित्व आणि महत्त्वच नाही. आताच बघाच काही दिवसांनी मला तुम्ही सरपंच म्हणून निवडून देता की नाही ते आणि नाही एकेकाला गुडघे टेकवायला लावले तर रूपेश नाव नाही लावणार नाही?' तो हाताची मूठ आवळत मनात बडबडला.

हळूहळू हाच मत्सर त्याचा वेडेपणा बनला. हाच वेडेपणाने त्याच्या मनात काळ्या विद्येने जन्म घेतला.

काही दिवस निघून गेले.‌ रात्रंदिवस विचार केल्यानंतर महेशच्या वाटणीची संपत्ती कशी हडप करायची व गावात लोकही त्याला मान, इज्जत देण्यासाठी कसे मजबूर होतील. यावर मार्ग काढण्यासाठी कोणाची मदत घ्यायची याचा विचार रूपेशच्या डोक्यात पक्का झाला. त्याच्या चेहऱ्यावर एक कटू हास्य तरळून गेले.

ते अंमलात आणण्यासाठी रूपेश अशा मार्गावर चालला होता तेथून परतणे शक्य त्याला नव्हते. भविष्यात त्याचे काय परिणाम होतील याची त्याने सुतराम कल्पना केली नव्हती.

क्रमशः

आपला काळा हेतू साध्य करण्यासाठी काय करेल रूपेश? त्याच्या हेतूत तो सफल होईल का?

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. अंधविश्वासाला प्रोत्साहन देण्याचा मुळीच हेतू नाही. केवळ मनोरंजन म्हणून वाचावे. कथेतील पात्र, स्थान व नावे काल्पनिक आहेत. त्याचा जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. असे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


0

🎭 Series Post

View all