Login

मत्सर (भाग:-३)

मत्सर करणाऱ्या रूपेशची कथा
ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५

#जलद लेखन स्पर्धा

शीर्षक:- मत्सर

भाग:- ३

रूपेश त्याचा हेतू साध्य करण्यासाठी जंगलातील खूप आत मध्ये असलेल्या एका पडक्या मंदिरात आला. त्या पडक्या मंदिरात कोणत्याही प्रकारची मूर्ती नव्हती. तिथे एक मांत्रिक राहत होता. जो की काळी विद्या आणि जादू करत होता. तंत्र,विद्यांमध्ये तो खूप पारंगत होता. त्याने अनेक वर्षे साधना केली होती. ज्या खूप रहस्यमय आणि खतरनाक होत्या. त्याला अनेक सिद्धी प्राप्त होत्या म्हणून लोक त्याला सिद्ध बाबा म्हणायचे. तो काळी विद्या करायचा त्याने पाहिजे ती वस्तू भेटायची पण ती आत्म्याच्या किंमतीवर.

एके रात्री रुपेश तिथे आला. त्याच्या येण्याची चाहूल त्या सिद्ध बाबाला आधीच लागली होती.

त्याला पाहून तो डोळे मिटून मंद हसत म्हणाला," भावाची जागा घ्यायची आहे ना तुला? त्याची सर्व संपत्ती मान-सन्मान सगळं काही हवं आहे ना तुला? त्याला तुझ्या रस्त्यातून हटवायचे आहे ना? "

ते ऐकून रुपेश चाटच पडला. तो आश्चर्याने  त्यांना म्हणाला," तुम्हाला कसं माहिती ? "

"मला सगळं माहिती आहे. तुमच्या सारखी माणसं माझ्याकडे येतात, ते विनाकारण येत नाही. त्यामागे कारण असतं. तुझ्या मनात काय चालले आहे हे मला माहिती. सांग हेच आहे ना तुझ्या मनात?" बाबा हळूवार डोळे उघडून म्हणाले.

रुपेशने होकारार्थी मान डोलावली.

"ठीक आहे ; पण नीट ऐकून घे. तू जे करणार आहेस ते एवढे सोपं नाही. ह्या सिद्धीत एक शरीर, रक्त आणि वेळ देऊन प्रत्येक पौर्णिमेला तुला त्याला जागृत करावे लागेल आणि एकदा सुरू केलेले हे चक्र तुला थांबवता येणार नाही. तुला माघार घेता येणार नाही. पुन्हा एकदा विचार नीट कर, या रस्त्यावर तुला चालायचं आहे का ? अजूनही वेळ गेलेली नाही." सिद्ध बाबा त्यांच्या घोगऱ्या आवाजात म्हणाले.

"मी तयार आहे बाबा, माझ्या भावाचा काटा काढायचा आहे. त्याचं सगळं काही मला पाहिजे. काय करायचं ते सांगा मला?" रुपेश ठामपणे म्हणाला.

बाबा मान हलवत म्हणाला," ठीक आहे मी सांगतो तसे कर ; पण लक्षात ठेव ही विद्या पूर्ण झाल्यावर मी तुला एक गोष्ट सांगेन. तीच गोष्ट तुला ह्या विद्येच्या दूष्प्रवाहापासून वाचवेल. समजा ती गोष्ट तू विसरून गेलास तर तू देखील या आगीत होरपळून भस्म होशील."

"दोन दिवसानंतर पौर्णिमेची रात्र आहे. तेव्हा तू तुझ्यासोबत महेशचे काही केस, त्याचा घामाने भरलेला रुमाल आणि त्याच्या शेतातली माती घेऊन ये. या सगळ्या वस्तूनेच आपण त्याच्यावरती निशाणा साधणार आहोत. परंतु लक्षात ठेव, येथे येताना तू कोणाच्या नजरेस पडणार नाही याची काळजी घे." बाबाने त्याला सांगितले.

बाबांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी घेऊन  रूपेश पौर्णिमेच्या रात्री चुपचाप कोणाला काही न सांगता त्याने सांगितलेल्या ठिकाणी आला.

पहिल्या रात्री जंगलाच्या आत एका पिंपळाच्या झाडाखाली त्याने बकरीचे रक्त व महेशच्या शेतातील माती एकत्र करून एक त्याने चक्र आखले. त्यात महेशचा रुमाल आणि केस ठेवून त्याने मंत्र पुटपुटले.

दुसऱ्या रात्री त्याच ठिकाणी महेशचे नाव घेऊन मारण मंत्र म्हणाला. नंतर त्यावर राहिलेल्या बकरीच्या रक्ताने काळ्या गंधाने खुण केले.

तिसऱ्या रात्री पिंपळाच्या पानावर बाबाने सांगितले मंत्र लिहून ते जाळून त्याची राख केली. ती राख त्या चक्रामध्ये उडत राहिली. ह्या पूर्ण प्रक्रियेत रूपेशला मौन पाळायला सांगितले होते.

चौथ्या रात्री एका कावळ्याचा बळी देऊन त्याच्या रक्ताच्या टिळ्याने रूपेशच्या कपाळावर काल संकेत रेखले आणि त्या चक्रामध्ये जीव नियोजनची प्रक्रिया केली. ज्यामुळे कालला लक्ष्यावरती सोडलं.

पाचव्या आणि शेवटच्या रात्री मृत आत्म्यांची पूजा केली. विशेष हवन केले. ज्यात पिवळ्या मोहरी, लिंबू, हाडांचे चूर्ण आणि पिंपळाच्या झाडाची वाळलेली साल टाकण्यात आली. त्या हवनच्या धुराने आत्म्याला शक्ती दिली. ती शक्ती त्याच्या लक्ष्यामध्ये प्रवेश करते. इकडे त्या शक्तीने महेशच्या शरीरात प्रवेश केला.

रूपेशने सगळ्या विधी न घाबरता पूर्ण केल्या. विधी नंतरच्या प्रत्येक रात्री त्याचा चेहरा आणि चाल बदलत गेली. जसे की त्याच्या शरीरात एक उर्जा भरली जात होती. जेव्हा पाचव्या रात्रीची विधी संपन्न झाली तेव्हा बाबाने त्याला एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली.

क्रमशः

काय सांगितले बाबाने? रूपेश त्याचा हेतू साध्य करेल का? वाचा पुढील भागात..

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. अंधविश्वासाला प्रोत्साहन देण्याचा मुळीच हेतू नाही. केवळ मनोरंजन म्हणून वाचावे. कथेतील पात्र, स्थान व नावे काल्पनिक आहेत. त्याचा जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. असे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


0

🎭 Series Post

View all