Login

मत्सर (भाग:- ४)

मत्सर करणाऱ्या रूपेशची कथा
ईरा चॅम्पियन ट्रॉफी:-२०२५

#जलद लेखन स्पर्धा

शीर्षक:- मत्सर

भाग:-४

जेव्हा पाचव्या रात्रीची विधी पूर्ण झाली तेव्हा बाबाने त्याला एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली.

"तुझी काळी विद्या आता पूर्ण आली आहे. आता मी जे सांगतो ते कान देऊन ऐक. तुला प्रत्येक पौर्णिमेला या पिंपळाच्या झाडाखाली नागबली यंत्रासमोर दिवा लावून मंत्र म्हणावे लागेल. हे मंत्र म्हणजे तुला आणि या काळ्या विद्येला जोडणारा धागा असेल. जर तू हे विसरलास तर ही काळी विद्या तुझ्याकडून सर्व काही हिरावून घेईल. अगदी तुझा जीवही घेऊ शकते. तुझं होत्याच नव्हतं होईल. मी सांगितलेले नीट लक्षात ठेव. आता तू घरी जाऊ शकतोस. जाताना मागे अजिबात फिरून बघू नकोस." बाबांनी त्याला स्पष्ट शब्दांत सुचित केले.

त्या नंतर काही दिवसांनी महेशची तब्येत बिघडू लागली. तो झोपेतून मध्येच जागे व्हायचा. स्वतःलाच आपल्या हाताने ओरबाडून घ्यायचा, विचित्र असे काही बाही बडबड करायचा.

"माझा गळा कोणी तरी दाबतोय, माझ्या कानात कोणी तरी विचित्र आवाजात कुजबुजतोय." भयभीत होऊन तो त्याची बायको राणीला म्हणायचा.

ती त्याच्या काळजीने झुरू लागली. तिने गावातल्या वैद्य, तांत्रिक, डाॅक्टर अगदी शहरातल्या डाॅक्टरांचेही उंबरे झिजवले ; परंतु त्याच्या तब्येतीत काडीचीही सुधारणा झाली नाही.

मग तिला वाटले की त्याला कदाचित कोणाची तरी नजर लागली असेल. पण सत्य तर रूपेश शिवाय कोणालाच माहिती नव्हतं. जेव्हा कधी तो महेशला लपून अशा अवस्थेत पाहायचा तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक छद्मी हास्य पसरायचे. मनातून त्याला खूप आनंद व्हायचा. त्याला माहिती होतं हे सर्व त्याने केलेल्या काळ्या विद्येचे परिणाम आहेत. त्याला आता प्रतिक्षा होती ती महेशच्या मृत्यूची.

दिवसागणिक महेशची तब्येत खालावत होती. तो अंथरूणावर खिळून राहिला. चेहरा पूर्णपणे कोमेजून गेला. डोळे खोल खोल जाऊन खोबणीत बसवल्यासारखे दिसू लागले. शरीर कृश झाले. शेवटी शेवटी तर फक्त त्याचा हाडांचा सांगाडाच उरला. अशातच एके रात्री तो काहीही न बोलता  शेवटचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला.

त्याच्या चितेची आग थंड होत नाही तोच लगेच रूपेशने संपत्तीच्या कागदपत्रावर कामकाज सुरू केले. त्याने सगळे शेत, जमीन स्वतःच्या नावावर करून घेतले. वाडा, दागदागिने यावरही ताबा मिळवला. यासाठी त्याने कर्मचारी लोकांना भलीमोठी लाज देऊन त्यांच्या मदतीने सगळे मृत्यूपत्र बदलून टाकले.

"आता सर्व संपत्ती, हा वाडा, शेत सर्व काही फक्त माझा झाला. आता दादाच्या परिवारालाही या वाड्यात जागा नाही. उद्याचं त्यांना बाहेरचा रस्ता दाखवतो." तो त्या बदललेल्या कागदपत्रावर नजर टाकत उन्मत्त हसत स्वतःशीच म्हणाला.

दुसऱ्याच दिवशी महेशची बायको राणी आणि त्याच्या मुलांना वाड्या बाहेर काढत तो म्हणाला, "आता या वाड्याचा मालक मी आहे. तुझा नवरा मरून गेला, आता तुझे आणि तुझ्या मुलांचे काहीच काम नाही. यांना घेऊन येथून चालती हो. जा निघ इथून."

रूपेशची बायको यामिनीने त्याला विरोध केला नाही की कोणता आक्षेप घेतला नाही. कारण तीही आता स्वतःला राणी समजू लागली.

राणीने खूप गयावया केला ; पण त्या दोघा नवराबायकोला त्यांची दया आली नाही. उलट त्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांच्या तोंडासमोर वाड्याचे दरवाजे बंद केले.

आता रूपेश नव्या मर्सिडीजमध्ये फिरू लागला. गळ्यात जाडजूड सोन्याची साखळी व हातांच्या बोटांत अंगठ्या घालून शहारात मौजमस्ती करू लागला. तो गावातील लोकांना रूबाब दाखवत घमेंडीने वागू लागला. किती तरी वेळा तो ग्रामसभेच्या बैठकीत जाऊन आपली मते त्यांच्यावर लादू लागला. छोट्या शेतकऱ्यांना दमदाटी करून त्यांच्या शेतजमीनवर दबाव आणू लागला. मंदिराच्या कार्यक्रमात भरसाठ वर्गणी देऊन आपली शान गाजवत ऐटीत फिरू लागला.

"गावाचा खरा राजा मी आहे. महेशसारखा साधा सरळ माणूस फक्त दया आणि सहानुभूतीवर जगत होता. मी तर ताकदीने राज्य करेन." तो पैशांच्या जोरावर घमेंडीने हसत गावाकऱ्यांना म्हणायचा.

हळूहळू तो ऐशो आराम आणि दारूच्या धुंदीत इतका अखंड बुडला की तो विसरून गेला की तो हे उडवत असलेला वैभव कसे मिळवले होते.

पौर्णिमा दर पौर्णिमा येत गेल्या. परंतु पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे आणि नागबली मंत्र म्हणून पूजा करणे तो साफ विसरून गेला. सिद्ध बाबाने दिलेली चेतावणी त्याच्या मेंदूतून पुसून गेली होती.

काळी विद्या आपल्या प्रतिक्षेत होती - पौर्णिमेच्या पुजेच्या. परंतु रूपेशच्या जीवनात फक्त घमेंड आणि नशाच उरली होती.

क्रमशः

काय घडले पुढे? रूपेशला सिद्धबाबाची चेतावणी आठवेल का?

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. अंधविश्वासाला प्रोत्साहन देण्याचा मुळीच हेतू नाही. केवळ मनोरंजन म्हणून वाचावे. कथेतील पात्र, स्थान व नावे काल्पनिक आहेत. त्याचा जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. असे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


0

🎭 Series Post

View all