Login

मौन

नणंद भावजयच्या नात्यावर ही कथा वाचूया.
सायंकाळची वेळ होती. मावळत्या सूर्याची लालसर छटा आकाशात पसरली होती.


घराच्या अंगणात मंद प्रकाशाचे बल्ब लागले होते आणि त्यांच्या उजेडाखाली चटाई अंथरलेल्या होत्या. हळूहळू शेजारी-पाजारी, नातेवाईक गोळा होत होते. कारण होते— शिवनाथजींच्या घराचा गृहप्रवेश.


अनेक वर्षांची मेहनत, संघर्ष आणि कर्ज यांनंतर त्यांनी आपलं छोटंसं पक्कं घर उभं केलं होतं. घर लहानसं होतं, पण त्या भिंतींत स्वप्नांची पायाभरणी खोलवर रुजलेली होती.


शिवनाथजी नगरपालिका सफाई कामगार होते. पगार मर्यादित, पण प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान हीच त्यांची खरी संपत्ती. पत्नी कमलाबाई घर सांभाळत— स्वभावाने कडक, बोलण्यात टोचणाऱ्या आणि समाजात आपली खोटी प्रतिष्ठा मिरवणाऱ्या.


मुलगा अमित खासगी कारखान्यात नोकरी करत होता. त्याची पत्नी रीना— शांत, सहनशील आणि गरजेपेक्षा अधिक तडजोड करणारी.


रीनाला या घरात येऊन तीन वर्षे झाली होती—
तीन वर्षे, ज्यांत तिने कमी बोलले आणि अश्रू अधिक गिळले होते. माहेरी वडिलांची आजारपणं आणि आर्थिक कमजोरी असल्यामुळे ती कधीच आपलं दुःख बोलून दाखवू शकली नाही. सासरी तिला “समजूतदार सून” म्हटलं जात होतं, पण त्या समजूतदारपणाचाच सर्वाधिक गैरफायदा घेतला जात होता.


आज गृहप्रवेश असल्यामुळे घरात चैतन्य होतं. ढोल-ताशे नव्हते, पण मोबाईल स्पीकरवर भक्तिगीते सुरू होती. पाहुणे शुभेच्छा देण्यासाठी येत होते.


रीना सकाळपासून स्वयंपाकघरात राबत होती— कधी चुलीवर, कधी पाहुण्यांसाठी पाणी नेत, कधी पूजेची ताटं सजवत. चेहऱ्यावर थकवा स्पष्ट होता, पण ओठांवर नेहमीची मुकाट शांत हसू.

तेवढ्यात शिवनाथजींच्या दोन्ही मुली— संगीता आणि नीलम— आपल्या मुलांसह आल्या.
दोघींचे नवरे रात्री येणार होते.

दोघींचे लग्नं चांगल्या घरांत झाली होती. महागडे कपडे, झगमगती दागिने आणि मोठ्या आवाजातलं बोलणं— सगळं काही सोबतच घेऊन आल्या होत्या.


बसताक्षणी संगीताने घराकडे नजर फिरवली आणि म्हणाली—
“वा भाऊ, घर छान बांधलंय.सगळं छान झालंय वाटतं !”


नीलम हसत म्हणाली—
“हो ना ताई, आता गृहप्रवेशात बहिणींसाठी काय ठेवलंय तेही बघायला हवं.”
अमित हसण्याचा प्रयत्न करत होता, पण कपाळावर चिंता स्पष्ट दिसत होती. रीनानी लांबून हे सगळं ऐकलं आणि तिचं काळीज दडपून गेलं. तिला अंदाज आला होता— हा विषय कुठे जाणार आहे.


थोड्याच वेळात संगीता थेट मुद्द्यावर आली,
“अमित, आता घर झालंय, तर बहिणींची जबाबदारीही ओळख. समाजात आमचाही मान असतो.”
नीलमनं टोमणा मारला,
“आणि वहिनीने नक्कीच आमच्यासाठी काहीतरी खास बाजूला ठेवलं असेल.”
तेवढ्यात कमलाबाई मध्येच म्हणाल्या—
“ मुलीही रक्ताचीच आहेत. ह्यांना पण काहीतरी छान द्यायलाच हवं.”
अमित आत गेला आणि आधी ठरवल्याप्रमाणे—
दोन साड्या, मुलांचे कपडे आणि थोडे पैसे घेऊन आला.


पण ते पाहून दोघींचे चेहरे उतरले.
“एवढंच?” संगीतेनं भुवया उंचावल्या,
“एवढं तर आमच्या मुलाच्या वाढदिवसाला नातेवाईक देतात.”

नीलमनं थेट आरोप केलं,
“वाटतं वहिनीने सगळं शहाणपणानं स्वतःकडेच ठेवलंय.”
रीनानं मान खाली घातली. ती काही बोलली नाही, पण तिच्या आत काहीतरी तुटून पडलं.


कमलाबाईंनी रागाने रीनाकडे पाहिलं आणि म्हणाल्या—
“सुनबाई, तुझ्याकडची सोन्याची चैन आहे ना, ती दे. बहिणींच्याही वाट्याला काहीतरी यायलाच हवं.”

रीनानं थरथरत्या आवाजात म्हटलं—
“सासूबाई, ती चैन माझ्या बाबांनी दिली होती… तीच माझी शेवटची आठवण आहे.”
कमलादेवी कठोरपणे म्हणाल्या—
“घराची इज्जत मोठी असते.चैन परत करता येईल.”
सगळ्यांच्या नजरा रीनावर खिळल्या होत्या. तिनं हळूहळू गळ्यातली चैन काढून कमलाबाईंच्या हातात ठेवली.

अमित पण घरात तमाशा नको म्हणून काहीच बोलू शकला नाही.

त्या क्षणी रीनाला असं वाटलं— तिनं केवळ दागिना नाही, तर स्वतःचा स्वाभिमानही उतरवला होता.

पूजा सुखरूप झाली.

पण कथा इथेच संपली नाही.


रात्री संगीताचा नवरा रमेश आला. त्यानं वातावरण लगेच ओळखलं. थोड्याच वेळात तो रीनाला बाजूला घेऊन म्हणाला—
“वहिनी, काय झालं? तुमचे डोळे सुजलेले का दिसतात?”
रीना गप्पच राहिली.पण परत विचारल्यावर तिने सगळं सांगितलं.


तेवढ्यात रमेशने सगळ्यांसमोर विचारलं—
“ही चैन कुणाची आहे?”
संगीतानं उत्तर दिलं,
“आईने दिली.”
रमेश कठोरपणे म्हणाला—
“खोटं बोलू नकोस. ही रीना वहिनीची आहे, आणि ती जबरदस्तीने घेतली गेली आहे.”
घरात एकदम शांतता पसरली.
हे सगळं शिवनाथजींना पण माहिती नव्हतं.

रमेश पुढे म्हणाला—
“ज्या घरात सुनेच्या मौनाला तिची कमजोरी समजलं जातं, तिथे सुख फार दिवस टिकत नाही. बहिण असणं हा हक्क आहे, पण हे असं वागणं नाही.”
त्याने चैन रीनाच्या हातात दिली.
रीनाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले—
या वेळी ते दुःखाचे नव्हते, तर संतुष्टीचे होते.
कमलाबाई आणि दोन्ही मुली गप्प राहिल्या.


शेवटी शिवनाथजी म्हणाले —
“नाती निभवायची असतील, तर समानतेने निभवा."

त्या दिवशी पहिल्यांदाच रीनाला उमगलं—
"गप्प राहणं नेहमीच संस्कार नसतं,
आणि बोलणारा प्रत्येक माणूस उद्धट नसतो."
0