Login

मावळा | लेखक : चेतन सुरेश सकपाळ

This Is The Story Of Mavala Who Fight For Swaraj
लघुकथा लेखन स्पर्धेसाठी

मावळा

"काय व, पावसाळा सरल्यावर पुन्हा लगेच मोहीम काढणार ह्याईत व्हय राजं?".
रखमा चुली समोर बसून भाकरी थापत गणाला विचारू लागली.

"व्हय ग, पलीकडे त्या खानान लय उत आणलाय म्हणे त्यामुळे मग महाराजांनी नवी मोहीम राबवली."
गणा गरम गरम भाकरीचा तुकडा गरम झुणक्या सोबत खात रखमाला पुढच्या मोहिमे बद्दल सांगू लागला.

"पण काय व? ह्या येलिस नाय गेलं तर चालतंय काय? नाय मंजी थोरल्याच लगीन घेतलंय मोरं ते उरकायला हवं."

रखमाच बोलणं ऐकून गणाचा चेहरा गंभीर झाला.

तो तिला बोलू लागला, "अगं यडी का खुळी तू? म्या काय तिथं फिरायला जातोय व्हय. नाय गेलं तर चालणार नाय म्हण. अगं रखमे थोरल्याच लगीन पुढं करू पण त्या आधी सावराज्य मोठं. ते टिकलं तर आपली लेकरं बाळ सुखी होतील न्हव?".

इतकं बोलून गणा जेवणाच्या ताटात हात धुवून बाहेर निघून गेला.

गणा देखील पावसाळा सुरू झाल्यावर इतर मावळ्यांप्रमाणे दूरची मोहीम आटपून पुन्हा आपल्या घरी आला होता. पावसाळ्याचे दिवस घरी आणि शेतात घालवून आता पुन्हा मोहिमेसाठी राजांचे बोलावणे आले होते.

शेतातली कामे करता करता कधी दिवस सारून गेले समजलंच नाही. काही दिवसांनी पावसाळा सरू लागला. गडा खाली मोहिमेची लगबग सुरू झाली. सगळी कडून मावळे गोळा व्हायला सुरुवात झाली. पावसामुळे काही महिन्यांचा आराम मिळाल्यामुळे सगळे जोशात होते त्यात  ही मोहीम राजे स्वतः जातीने पाहणार म्हणून सगळ्या फौजेत आणखीनच उत्साह होता.

गणा आणि त्याचा परिवार देखील गडाच्या जवळच्याच एका गावात राहत होता. त्याची देखील मोहिमेला जाण्याची लगबग सुरू झाली. त्याला मोहिमेवर जाण्याचा आनंद होता पण त्याच्या घरच्यांना ह्यावेळेस त्याचं घरातून जाणं आवडलं नव्हतं.

कारण त्याच्या थोरल्या मुलाचं लग्न ठरलं होत. पण ते पुढे ढकलणे देखील शक्य नव्हते. मुली कडच्यानी ४ महिन्यांनी लग्न ठरविले होते. लग्नाची तारीख देखील ठरली होती. त्यामुळे लग्न पुढे ढकलण्याचा विषयच नव्हता. लग्नाची बऱ्यापैकी तयारी उरकली होती. त्यांच्याकडे लग्न ठरल्या प्रमाणे केल्याशिवाय काही पर्याय उरला नाही.

गणा ने लग्नाची सगळी तयारी परिवारावर सोपवली आणि लग्नाच्या दिवसापर्यंत तो इथे लग्नासाठी पुन्हा हजर होईल असं त्यांना सर्वांना आश्वासन देऊन तो मोहिमेसाठी निघून गेला. सगळ्यांनी त्याला हसतच निरोप दिला. कारण तो सगळ्यात मोठ्या कामगिरी साठी निघाला होता. स्वराज्याच्या कामगिरीसाठी !

सगळी फौज गडाखाली जमा झाल्यावर ' हर हर महादेव ' ची घोषणा झाली आणि संपूर्ण फौज मोहिमे साठी निघाली. सर्वत्र जोशाचा माहोल होता. सगळ्या मावळ्यांच्या चेहऱ्यावर शत्रूंना कापून काढण्याची आतुरता स्पष्ट दिसत होती.

बघता बघता महिने सरत गेले. गणा च्या घरी लग्नाची जोरात तयारी सुरू झाली. सगळी मंडळी तयारीत व्यस्त झाली पण रखमा मात्र दिवस मोजीत गणाची वाट बघत होती. तिला त्या सगळ्या तयारीत गणाची कमी भासू लागली. पण ती ते कोणाला सांगू शकत नव्हती. आणि अशा आनंदाच्या क्षणाला उदास देखील राहू शकत नव्हती. गणा आज येईल अशी रोज ती भाबडी अशा देऊन मनाला समजावू लागली.

चार महिने कशे उलटुन गेली कोणाला कळलेच नाही. राजांची फौज देखील विजयी होऊन परत मुलुखात आली. त्यांनी पलीकडच्या खानाला चांगलीच मात दिली होती. सगळे त्यांच्या शौर्याचे गुणगान गात होते.

सारे सैनिक आपापल्या घरी परतू लागले. सगळी कडे मिळालेल्या विजयाचा जल्लोष सुरू होता. पण गणाच्या घरी सगळे त्याची वाट बघत होते.

एके संध्याकाळी गणाच्या घरचे घरात सहज बोलत बसले होते, दुसऱ्या दिवशी गणाच्या थोरल्या मुलाचे लग्न असल्यामुळे सगळे कामे करून थकले होते. तेव्हाच राजांचा एक स्वार काही तबके घेऊन गणाच्या दरवाज्यावर आला. त्याला भेटायला गणाची दोन्ही मुलं आणि रखमा धावत बाहेर आले. त्या माणसाच्या हातात एक पिशवी होती आणि त्याची मान खाली झुकलेली होती.

ते बघून गणाचा थोरला मुलगा विचारू लागतो, " काय झालं दादा? आमचं आबा कुठं हयात? समदी फौज आली पण आमचं आबा आलं नाहीत?"

तो स्वार काहीच बोलत नव्हता त्याची मान तशीच खाली झुकलेली.

गणाच्या मुलाचं बोलणं संपताच तो मान वर करून बोलू लागला, "पोरा... तुझा बा... तुझा बा...गेला रं.... शरतीन लढला शत्रू चा पार नायनाट केला पण शेवटी काळानं घाव घातला आणि गणा भाव आपल्या समद्यासणी सोडून निघून गेला."
इतकं बोलून तो घुडग्यांवर खाली बसून रडू लागला.

ते ऐकून रखमा तशीच खाली कोसळली. आजुबाजूच्या लोकांनी तिला सावरायचा प्रयत्न केला पण तिला कसलेच भान राहिले नव्हते. तिच्या सोबत सगळेच धायमोकळून रडू लागले.