Login

मावळत्या दिनकरा... भाग २

मावळत्या दिनकरा
जलद लेखन
विषय-थोरलेपण
शीर्षक - मावळत्या दिनकरा...
भाग २

हो गं मुक्ता. आता या उतारवयात जोडीदारापैकी कुणाला तरी एकाला आधी जावं लागणारचं. मुलगा म्हणतो तू चल माझ्याबरोबर. आता इथे एकटी राहून काय करणार? त्याच्या म्हणण्यानुसार मी त्याच्यासोबत गेले सुद्धा. पण मला तिथे अजिबात करमत नव्हते. मग सारखी सारखी आजारी पडायला लागले. शेवटी मुलगा म्हणतो, आई आता तुला जिथे राहावं वाटेल तिथे रहा. तेव्हापासून मी इथेच राहत आहे. आता इथे एवढे मोठे घर अगदी खायला उठते गं. बोलताना गौरीच्या डोळ्यात पाणी आले होते.

गौरी, प्रसिद्ध कवी भा.रा. तांबे यांची एक कविता ऐकवते मी सर्वांना. बघा. ममता म्हणाली.

ऐकव गं. सर्वांनी कान टवकारले.

मावळत्या दिनकरा
अर्ध्य तुला जोडूनि दोन्ही करा !

जो तो वंदन करी उगवत्या
जो तो पाठ फिरवि मावळत्या
रीत जगाची ही रे सवित्या
स्वार्थपरायणपरा...

उपकाराची कुणा आठवण?
' शितें तोंवरी भूते 'अशी म्हण
जगात भरलें तोंडपूजेपण
धरी पाठीवर शरा !
मावळत्या दिनकरा...

व्वा! किती सुंदर. हृदयस्पर्शी. ऐकताना डोळ्यातून पाणी आलं बघं. कांता म्हणाली.

अगदी शब्द न शब्द ऐकत राहावासा वाटतो.

अगं मयुरा, दिवसागणिक वयोवृद्ध होत जाणाऱ्या व्यक्ती आणि त्यांची काळजी घेण्याच्या ओझ्याखाली दबलेली तरुण पिढी हे आजच्या काळातील जागतिक चित्र झाल्यासारखी परिस्थिती आहे. जसजसं वय वाढत जातं तसतसं वयोमानानुसार येणारी दुखणी मागे लागतात.

मुलांना, दूर राहणाऱ्या आई-वडिलांची नीट काळजी घेता येत नाही. आई वडील मुलांच्या घरी जमवून घेऊ शकत नाही आणि मग सगळीच गडबड होऊन जाते.आज आपण सर्वजणी ज्येष्ठ आहोत. थोरल्या आहोत.

नोकरी करणं, मुलांना वाढवणं या चक्रात आयुष्यातील अनेक वर्ष संपून गेली. या टप्प्यात आपल्याला अनेकदा आर्थिक संकटांनाही तोंड द्यावे लागले. पण आता यापुढील आपले आयुष्य आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने जगायचं आहे. ममता बोलत होती.

हो ममता, अगदी खरं आहे तुझं. आजवरच्या आयुष्यात जग बदलताना पाहिलं आपण. बदलत्या जगाशी जुळवूनही घेतलं. आता राहिलेले आयुष्य आनंदात घालवायचं असेल, आनंदात जीवन जगायचं असेल तर कुटुंब, मैत्रिणींसोबत चांगले संबंध, निसर्गात राहणं, भावनिक स्थिरता, भरपूर सकारात्मकता आपल्या शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. म्हणूनच आपल्यासारखे वृद्ध लोक आजही उमेदीने जगत आहेत. आपण या जगात आहोत तोवर आनंदाने जगायचं आणि इतरांनाही आनंद द्यायचा. शरयू म्हणाली.

अगं पण शरयू ,अनेक देशात वृद्धांची स्थिती अतिशय हलाखाची आहे. ज्या वयात वृद्धांना मदतीची गरज आहे, नेमके त्याचवेळी त्यांच्याजवळ कोणी नाही. एकटेपणाचं आणि हलाखीचं जीवन त्यांना जगावं लागत आहे. अनेकांच्या मुलांनी त्यांना वाऱ्यावर सोडलं आहे किंवा वृद्धाश्रमात ठेवलं आहे.शारदा म्हणाली.
क्रमशः
सौ. रेखा देशमुख
0

🎭 Series Post

View all