Login

मावळत्या दिनकर...भाग३(अंतिम)

मावळत्या दिनकरा
जलद लेखन
विषय - थोरलेपण
शीर्षक - मावळत्या दिनकरा...
भाग ३ ( अंतिम )


बऱ्याच जणांची मुलं परदेशात शिकायला जातात. तिथेच स्थायिक होतात. अशा वयस्कर पालकांकडे पैसा आहे, घर आहे पण हक्काचं कोणीतरी असावं, आपल्याशी बोलावं किंवा नातवंडांची तरी खेळता यावं यासाठी त्यांचा जीव अक्षरशः आसुसलेला असतो. जगभरात कुटुंबसंस्था उध्वस्त झालेली असताना आजही आपल्या देशात प्राचीन काळापासून ती मजबूत आहे. ही दिलासा देणारी बाब आहे.

हो. अगदी बरोबर.

माझीही मुलगी शिक्षणासाठी परदेशात गेली. तिकडेच तिचं लग्न झालं व तिकडेच ती स्थायिक झाली. मुक्ता म्हणाली. बोलताना तिचा स्वर कापरा झाला होता.

तुला मी सांगितलं नां की, सकारात्मक विचार ठेवायचे म्हणून. शरयू म्हणाली.

मुक्ता हे बघ, डिजिटल क्रांतीमुळे आता आपलं हे जगणं अगदी सुकर झालं आहे. मी तर अमेरिकेतल्या माझ्या लाडक्या नातीशी व्हाट्सअॅप वर बोटांनी टुकूटुकू शब्द टाईप करून चॅट करते. पण अलीकडे डोळ्यांचा त्रास वाढल्यामुळे व बोटही दुखतात त्यामुळे नातीनेच मला व्हाईस नोट पाठवायला सुचवलं आणि हे तंत्र मला तिने शिकवलं सुद्धा.

आता तर मी डिजिटल तंत्रज्ञान वापरून आर्थिक व्यवहार सुद्धा करते. शरयूने मुक्ताला समजावले.

"पण आता वय झालं. आता कशाला हे सर्व. "गीता म्हणाली

अगं गीता, "वय झालं म्हणूनचं"

शरयूच्या या कोपरखळीने सर्व जणी खो-खो हसायला लागल्या.

अगं गीता, मनुष्य आयुष्यभर विद्यार्थी असतो. आज आपण डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत. या जगात शिकण्याची इच्छा संपल्याचा अर्थ आहे, 'रस्ते बंद होणे'

साफल्याच्या रस्त्यावर पुढे जायचे असेल तर शिकण्याची इच्छा कायम ठेवावी लागेल. लँडलाईन फोन ते स्मार्टफोन, टेबलवर ठेवावा लागणारा कम्प्युटर ते लॅपटॉप, टॅब, पत्रव्यवहार ते सोशल मीडिया, पासबुक ते मोबाईल बँकिंग, गरजेच्या वस्तू मागवण्यासाठी फोन ते वेगवेगळे ॲप. अशी ही तंत्रज्ञानातील क्रांती आपण डोळ्यांनी पाहत आहोत. म्हणूनच आता आपल्यासारख्या प्रत्येकीने डिजिटल तंत्रज्ञान शिकून घेण्याची गरज आहे आणि हे शिकण्यासाठी वयाचा कोणताही अडसर नाही तर शिकण्याची तीव्र इच्छा हवी. आपण लहानपणी निबंध लिहायचो नां "रम्य ते बालपण" आता आपण म्हणूया "रम्य ते थोरलेपण" सुषमा ने सोप्या शब्दांत सर्वांना समजावून सांगितलं.

"हो खरंच." सर्वांनी एका आवाजात होकार भरला.

चला आता निघायला हवं. उद्या परत भेटूया म्हणत सर्वजणी आपापल्या घरी निघून गेल्या.

समाप्त
सौ. रेखा देशमुख
0

🎭 Series Post

View all