मावळतीचा सूर्य..!
बालपणात आपण आपल्या आई-वडिलांवर घरातील मोठ्या माणसांवर अवलंबून असतो. आपण मोठे होतं जातो तश्या आपल्या इच्छा आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण प्रयत्न करायला लागतो. शाळा, कॉलेज, स्पर्धा परीक्षा असा हा प्रवास सुरू असतो. आपल्या सर्वांना माहीतच आहे कीं कोणतंही क्षेत्र असो, तेथे मोठ्या प्रमाणात स्पर्धा बघायला मिळते. या स्पर्धेच्या युगात जो मनापासून स्वतःला आवडणाऱ्या क्षेत्राची निवड करतो. आणि निवडलेल्या क्षेत्रात जो स्वतःला झोकून देतो. कठोर परिश्रम घेतो. मिळेल त्या ठिकाण किंवा व्यक्तीकडून ज्ञान घेत, सराव करत यश मिळवण्यासाठी सतत तत्पर असतो. तेच यशाचे हक्कदार बनतात. आपल्याला आवडणार क्षेत्र, त्यात उत्कृष्टपणे केलेलं आपलं कार्य, आपल्याला विजेता बनवतो. पण बऱ्याचदा आवडणाऱ्या क्षेत्रातही म्हणावं तसं यश मिळत नाही. केलेले परिश्रम सर्व व्यर्थ जातात. एक मात्र नेहमी लक्षात ठेवावं कीं विजेतेपद मिळवणे इतके सोपेही नाही. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करावी लागते. जे जमत नाही ते शिकावं लागते आणि जे जमते त्यात अजून उत्कृष्ट कामगिरी करावी लागते. सतत सराव, मनामध्ये अभ्यासाचं सतत चिंतनही असावं लागते. मला हे पाहिजे आणि हें मिळवण्यासाठी मी काहीही करेल अशी मनाची तयारी पाहिजे. मग कितीतरी कष्ट करून कितीतरी प्रयत्न करून कितीतरी सराव करून कितीतरी रात्रीचा दिवस करून कष्ट केले आणि त्याचे फळ मिळाले तर त्याचा आनंद खूप जास्त होतो. पण जर त्याविरुद्ध घडले तर मनात दुःखही होते. त्यातून बाहेर निघणे म्हणावं तेवढं सोपं नसते. आणि या मध्ये व्यक्ती हा निराशेच्या जवळ जातो. नको ते वाईट विचार मनात सतत येत राहतात. या विचारांना योग्य लगाम दिला तर ठीक नाहीतर मग हे विचार शेवटच्या पायरी पर्यंत पोहोचतात. जीवन उद्ध्वस्त करून देतात. नको ते नको त्या विचारांमध्ये व्यक्ती स्वतःच बरं वाईट करून घेतो. पण हा जीवनाचा शेवट नसतो. हा फक्त एक प्रसंग असतो जो आपली उणीव भरून काढण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगत असतो. अशा कठीण प्रसंगामध्ये सतत स्वतःच्या मनाला सांगत रहा. हे अपयश आहे. माझा प्रयत्नांचा शेवट नाही. सतत प्रयत्न जर करत राहिले तर कधी ना कधी तर यश मिळेलच ही भावना हा विचार सतत मनात असावा. आपल्या विचारांना योग्य दिशा द्यावी. नेहमी लक्षात ठेवायचे 'जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात' चालून पाय थकायला नको म्हणून जे डोकं चालवतात तीच खरी हुशार माणसं समजावी. आयुष्य म्हटलं तर लहान मोठी वादळे, यश, अपयश, आशा, निराशा, सुखदुःख असे सतत प्रसंग येतच राहणार. नेहमी सारखी परिस्थिती राहणार नाही. कधी सुखाचे क्षण मनसोक्त आनंद देऊन जाणार, तर कधी मनाला निराश करणारी वादळे ही नकळत येतच राहणार. आपण त्या वादळाशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बाहेर येतो, हेच महत्त्वाचे असते. माणसाला असलेल्या परिस्थितीत सुखाने जगण्याची सवय लागली की येणारे अपयश निराशा अशा नसलेल्या गोष्टीचे दुःख जाणवत नाही. आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणीमधून अपयशांमधून एकच व्यक्ती तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकते आणि ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तुम्ही स्वतः आहात. मग जग काय म्हणते, यापेक्षा मन काय सांगते, हेच महत्त्वाचं असते. मनात सतत चांगले विचार ठेवा. आयुष्याला बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवावा. स्वतःच्या जगण्यावर प्रेम करावं. मनात या त्या गोष्टीवरून होणारी विचारांची वाहतूक जरा कमी करावी. जिथे विचारांची वाहतूक कमी असेल, आयुष्याचा प्रवास तितकाच सुखद होतो. आयुष्याच्या पानावर उद्याचं सुख त्यालाच अनुभवायला मिळते जो आजच्या परिस्थितीशी संघर्ष करतो. आपल्यामध्ये असलेली उणीव सतत भरून काढण्याचा प्रयत्न करणे. हे आयुष्याचे यशाचे गमक आहे. पाहिजे ते मिळवण्यासाठी व्यक्तीने धडपडत रहाव. युक्ती कल्पनांची जोड द्यावी. कारण माणूस हा सुखाने जगतच नाही, तर तो फक्त सुखाच्या आशेवर जगतो. जीवनात जरी कितीही मोठे वादळं आले. कितीही अपयश आले. यशाची साथ कधीच सोडू नका. कारण यश हें कठीण परिश्रमा मागे लपलेले असते. आणि तसेही नोकरीं, पद, पैसा, प्रॉपर्टी यापेक्षा कितीतरी मोठी महत्त्वाची खरी श्रीमंती, खरे यश, खरे सुख म्हणजे आपल्या निरोगी शरीराचे असणे, निकोप बुद्धी आणि सक्षम मनाचे असणे होय. आयुष्य म्हटलं तर त्रास देणाऱ्या गोष्टी घडतच असतात. पण त्रास किती करून घ्यायचा हे आपल्या हातात असते. यशाचे शिखर गाठण्याआधी स्वतःच स्वतःशी लढावे लागते. जगाशी फक्त चढाओढ असते. युद्ध स्वतःशीच करावे लागते. स्वतःला समजावून सांगावे लागते, मी थांबलेला आहे, हरलेला नाही. अजूनही संघर्ष करण्यासाठी तयारच आहे जे पाहिजे ते मी मिळवणारच आहे. जसा 'मावळतीचा सूर्य घेऊन जातो निराशा आणि उगवता सूर्य सतत घेऊन येतो आशा' हाच खरा जीवन संघर्ष आहे.
©® चैताली वरघट
मूर्तिजापूर, जि अकोला
मूर्तिजापूर, जि अकोला
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा