Login

मायाजाल भाग .. १

आभासी दुनियेच्या मायाजालात गुरफटून गेलेल्या अजाण मुलीची कहाणी
मायाजाल भाग … १
जलद लेखन स्पर्धा नोव्हेंबर २०२५

स्वीट एंजल स्टार्टेड फॉलोइंग यू. आलेल्या या नोटिफिकेशनमुळे सुचिता विचारत पडली. ही स्वीट एंजल कोण? आपण हिला ओळखतो का? काही केल्या आठवेना. बरं प्रोफाईल सेटिंग प्रायव्हेट, त्यात डिपी सुद्धा मिरर सेल्फी, आरश्यासमोर काढलेला त्यामुळे नक्की कोण आहे ते पण कळेना, काहीच उलगडा होईना. सुचिता, हर्षदा, मंदार अशा साध्या सोप्या नावाने अकाउंट का ओपन करत नाहीत! कशाला हवीत रॉकस्टार, स्वीट एंजल असली नावं, समोरच्याला गोंधळवून टाकणारी सुचिताच्या मनात आले.

सुचिताच्या लेकीने नुकतेच तिला इन्स्टाग्रामवर अकाऊंट ओपन करून दिले होते. तिथे ना ती काही पोस्ट करायची ना स्टोरी ठेवायची, आपले एक असावे म्हणून ते फक्त होते. त्यातले तिला फार काही कळतही नव्हते. फोन घेऊन बसलं की तास दोन तास असेच निघून जातात, सगळी कामे रहातात मुलीची मैत्रीण किंवा मुलाच्या वर्गातली कोणीतरी असेल कशाला डोक्याला ताण द्यायचा, कळेल नंतर म्हणत सुचिताने फोन बाजूला ठेवला.

“काकू, तुम्ही मला फॉलो बँक केले नाहीत” काही दिवसांनी सुचिताला व्हाट्सअपवर मेसेज आला. नंबर अनोळखी होता पण डिपी तोच इन्स्टावाला होता. फोटो बघून ही तीच स्वीट एंजल आहे सुचिताच्या लगेचच लक्षात आलं. ही बया माझ्या का मागे लागली आहे? डोळ्यासमोर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. ती मुलांना या एंजल बद्दल विचारायचं विसरून गेली होती.

“मला म्हणजे कोणाला? मी कुठल्याच एंजलला ओळखत नाही.” सुचिताने वैतागून रिप्लाय केला.

“अहो मी गौरी, रत्नाताईची गौरी.” गौरीने तिचा फोटो पाठवला.

“अगं बाई! गौरी का? ओळखलच नाही तुला.”

“प्लीज मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक पण करा.”

“करते. जरा कामात आहे. थोड्यावेळाने करते.” स्माईली पाठवत सुचिताने संभाषण संपवलं.

रत्नाबरोबर घरी येणारी चिमुरडी गौरी चटकन सुचिताच्या डोळ्यासमोर आली. गौरी म्हणजे सुचिताकडे काम करणाऱ्या रत्नाताईंची मुलगी. सुचिता लोटस अपार्टमेंटमध्ये राहायला आली तेव्हापासून रत्नाताई तिच्याकडे कामाला होत्या. केर, लादी, भांडी, घराची साफसफाई पडेल ते काम त्या करत होत्या. बरीच वर्ष इमानेइतबारे काम करत असल्याने त्या पाठारे कुटुंबाचा एक भाग झाल्या होत्या. त्यांची हुशार, चुणचुणीत, समजूतदार लेक गौरी सुचिताला फार आवडायची.

‘छान डान्स करते आहे. मुली किती पटकन मोठ्या होतात नाही! दहावी झाल्यावर पेढे द्यायला आली होती त्यानंतर भेटच झाली नाही’ गौरीला फॉलो केल्यावर तिच्या पोस्ट लाईक करत असताना सुचिताच्या मनात आले.

रत्ना आल्याआल्या तिने गौरीचा आलेला फोन, त्याचं झालेलं बोलणं याबद्दल तिला सर्वकाही अगदी कौतुकाने सांगितले.

“या कार्टीने तुम्हाला पण फोन केला ताई. अभ्यास करायचं सोडून लाईक करा, फॉलो करा साऱ्यांना सांगत आहे. मोबाईलने वाट लावली समदी. कॉलेज दूर आहे. पोर रेल्वेने जाते, फोन असू दे जवळ म्हणून उधार उसनवार करून फोन घेऊन दिला तर तिला त्याचच येडं लागलं. सारखी फोनवर असते रीलं बनवते.” रत्ना चिडून बोलत होती.

“हल्ली सगळीच असं करतात, माझी मुलं पण रील्स बनवतात.” सुचिता गौरीची बाजू घेत म्हंटली.

“तुमची मुलं अभ्यास पण करतात. गौरी जरा बी अभ्यास करत नाही. अनिता मॅडम बोलल्या समद्या पेपरात कमी मार्क पडले. असेच राहीलं तर ती काय पास होत नाही. पास झाली नाही तर मी तिचा कलास घेणार नाही.” रत्ना अनिता टीचरकडे काम करत असल्याने आणि मुळात गौरी हुशार, अभ्यासू असल्याने त्या फी घेता तिला शिकवत होत्या. त्यांनी शिकवलं नाही तर दुसऱ्या क्लासला घालावं लागेल फी कशी परवडणार याची चिंता रत्नाला सतावत होती.

“दहावीत चांगले ऐंशी टक्के होते तिला, मग आता अचानक काय झाले? एवढी कशी बदलली ती.” रत्नाने जे सांगितले ते ऐकून सुचिता आश्चर्यचकित झाली होती.

“कॉलेजच वार लागलं, दोन दिसापूर्वी तिच्या बापाने जाम मारलं तिला तेव्हा तोंड वर करून मला शिकायचं नाही. रीलस्टार व्हायचं आहे म्हणाली” रत्ना रडकुंडीला आली होती.

रत्नाच्या बोलण्याने सुचिता सुन्न झाली होती. कौतुकाची जागा आता संतापाने घेतली होती.