“ही गौरी. मी बोलले होते ना तुझ्याशी. हीच ती.” विभावरीच्या घरी गेल्यावर सुचिताने गौरीशी तिची ओळख करून दिली.
“वेळेवर आला आहात, आज मी व्हिडिओ शूट करणारच आहे. गौरीला सगळी प्रोसिजर बघता येईल.”
“आज काय स्पेशल? कुठली रेसिपी बनवणार आहेस? सुचिताने उत्सुकतेने विचारले.
“मेथीचे पराठे, शेंगदाणा चटणी, मिरचीचा ठेचा.” बाजारात गेले असता हिरवीगार मेथीची भाजी दिसली आणि ही रेसिपी सुचली अशा थीमवर सुरुवात करायची आहे.” विभावरी गौरी आणि सुचिताच्या हातात चहाचे कप देत म्हंटली.
“अरे वा! मला एक दोन कामं आहेत ती करून मी गौरीला घ्यायला येते, तुमचं चालू द्या.” थोड्यावेळाने चहापाणी, जुजबी गप्पा झाल्यावर सुचिता तिकडून सटकली.
सुचिता गेल्यावर काय बोलायचं, कसं शूट करायचं याची रूपरेषा विभावरीने आखली. गौरीला घेऊन बाजारात गेली. ती मेथीची जुडी घेत आहे इथंपासून त्यांचा व्हिडिओ सुरू झाला. टेक, रीटेक करत रेसिपी पूर्ण व्हायला बराच वेळ लागला.
“अवघ्या आठ दहा मिनिटांच्या व्हिडिओसाठी किती मेहनत करावी लागते गौरी, बघितलंस ना.” कंटाळलेल्या गौरीकडे बघत सुचिता म्हणाली.
“आपण मार्केटला न जाता डायरेक्ट रेसिपी शूट केली असती तर कमी वेळ लागला असता.” विभावरी बरोबर उन्हात फिरून वितागलेली गौरी म्हणाली.
“बरोबर आहे तुझं. पण काहीतरी वेगळं, युनिक असलं की व्ह्यूवर्स ना आवडतं, त्यासाठी डोकं चालवून सतत काहीतरी नवीन शोधून काढावं लागतं.” विभावरी गौरीला बारकावे समजावून सांगत होती.
वाटीचे प्रमाण, वजनी प्रमाण, चार वाट्या साहित्यात इतके लाडू बनतात तर अर्धा किलोच्या साहित्यात एवढे. अमुक अमुक पदार्थ बनवायला, बेसन भाजायला एवढा वेळ लागला हे सगळं व्ह्यूवर्सना सांगताना आधी विभावरीला स्वतः करून बघावं लागत होत. टिपण काढून ठेवावं लागत होतं. व्हिडिओ बनवा, एडिटिंग करा यात कधी दिवस तर कधी अर्धा दिवस खर्ची होत होता. विभावरी घेत असलेली मेहनत बघून आपल्याला वाटलं होतं तितकं हे क्षेत्र सोपं नाही हे विभावरी बरोबर काम करताना गौरीच्या हळूहळू लक्षात येत होतं.
“गौरी हा सुमित. ह्याच ट्रॅव्हल विथ सुमित नावाच चॅनेल आहे.” विभावरीने तिच्या भाच्याची गौरीशी ओळख करून दिली. सुमित विभावरीच्या बॅचलर्स स्पेशल सिरीजसाठी अंडाबुर्जी, अंडा तवा मसाला या झटापट होणाऱ्या रेसिपी बनवून दाखवणार होता त्यासाठी तो विभावरीच्या घरी आला होता.
“दादा तू जॉब करतोस?” गप्पांच्या ओघात गौरीने सुमितला विचारले.
“म्हणजे काय! रील्स बनवून पोट भरत नाही. पोटापाण्यासाठी नोकरी करावीच लागते. नवनवीन ठिकाणांना भेट देऊन किती खर्च होतो? वेळ किती लागतो? तिथे काय चांगले मिळते? उत्तम हॉटेल्स कोणती? या सगळ्याचा अभ्यास करून, उन्हातान्हात फिरून प्रवास वर्णनाचे व्हिडिओ बनवताना माझा जितका वेळ, पैसा खर्च होतो त्यामानाने अगदीच नगण्य मिळतात.”
“माझं पण तेच आहे. जितका पैसा खर्च होतो त्याच्या निम्मे सुद्धा मिळत नाहीत. हळूहळू चित्र बदलेल पण सध्या तरी आम दनी अठनी खर्चा रुपया असं आहे सगळं.” विभावरीने सुमितची री ओढली.
“मी तर ऐकलं आहे, भरपूर कमवतात.” बऱ्याच दिवसापासून मनात रेंगाळणारा प्रश्न गौरीने निरागसपणे विचारला.
“तुला वाटतं तसं हे सगळं इन्स्टंट, एका दिवसात होत नाही. सबस्क्राईबर्स वाढले, नियमाप्रमाणे वॉचटाइम असेल, आपल्या व्हिडीओना जाहिराती सुरू झाल्या की इन्कम सुरू होतं पण ह्या सगळ्याला वेळ लागतो, मेहनत, कामात सातत्य ठेवावं लागतं.” सुमितने गौरीला वास्तवाची जाणीव करून दिली.
“दुरून सगळेच डोंगर साजरे वाटतात, जवळ गेल्यावरच खाचखळगे दिसतात. टक्केटोणपे कळतात. क्षेत्र कुठलही असो, कष्टाला पर्याय नाही. विनासायास काहीच मिळत नाही” विभावरी गौरीला समजावत म्हणाली.
गेले दहा बारा दिवस गौरी रोज विभावरीकडे जात होती. तिची मेहनत जवळून बघत होती. त्यामुळे सहजासहजी काहीच मिळत नाही हे गौरीला कळून चुकलं होतं. अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे लक्षात येत होतं.
“मग गौरी कधी सुरू करायचं तुझं चॅनेल” विभावरी, सुचिता आणि सुमितच्या प्लॅनिंगनुसार एक दिवस अचानक विभावरीच्या घरी पोहोचलेल्या सुचिताने गौरीची फिरकी घेत विचारले.
सुचिताला बघून गौरीला रडू कोसळलं. “नटातथा, छान दिसा, फोटो काढा, व्हिडीओ अपलोड करा आणि लगेच पैसे कमवा, इतकं सहज सोपं असतं असं मला वाटत होतं. विभाताईची मेहनत बघून, सुमित दादाशी बोलून माझ्या भ्रमाचा भोपळा फुटला. सगळा गैरसमज दूर झाला त्यामुळे सध्या नो रील, मी फक्त माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं आहे.” स्वतःला सावरत गौरी ठामपणे म्हणाली.
आपली योजना सफल झाली. गौरीचं बोलणं ऐकून सुचिता, विभावरी आणि सुमितला एकदम हायसं वाटलं. नाव, प्रसिद्धी, पैशाच्या हव्यासापायी आभासी दुनियेच्या मायाजालात गुरफटून गेलेल्या अजाण मुलीची सुटका केल्याचं समाधान त्या तिघांच्या चेहऱ्यावर विराजलं.
समाप्त.
©® मृणाल महेश शिंपी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा