Login

मायाजाल भाग .. २

आभासी दुनियेच्या मायाजालात गुरफटून गेलेल्या अजाण मुलीची कहाणी
“कॉलेजच वार लागलं, दोन दिसापूर्वी तिच्या बापाने जाम मारलं तिला तेव्हा तोंड वर करून मला शिकायचं नाही. रीलस्टार व्हायचं आहे म्हणाली” रत्ना रडकुंडीला आली होती.

रत्नाच्या बोलण्याने सुचिता सुन्न झाली होती. कौतुकाची जागा आता संतापाने घेतली होती.

“एवढ्या मोठ्या मुलीवर कोणी हात उचलत का रत्नाताई? अहो, समजावून सांगायचं तिला?” मुलं जरा मनाविरुद्ध झालं की लगेचच बिथरतात त्यामुळे सुचिताला काळजी वाटत होती.

“समजावून झालं, रागावून झालं, ऐकत नाही म्हंटल्यावर थोबाड फोडाव लागलं. तिच्या बा ने शाळा पाहिली नाही, गरिबीमुळे मला मध्येच सोडावी लागली. पोराला अभ्यासात डोकं नाही त्यालाबी शाळेतून काढून गॅरेजात कामाला लावलं. ही हुशार आहे, शिकलं सवरंलं घराण्याचं नाव मोठं करलं वाटलं तर हीला अक्काबाई आठवली.” रत्ना डोक्यावर हात मारून घेत बोलत होती.

आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी रत्ना खात असलेल्या खास्ता, तिची तगमग सुचिता बऱ्याच वर्षापासून जवळून बघत असल्यामुळे तिला तिच्याबद्दल सहानभूती वाटत होती म्हणूनच तिने गौरीशी या विषयावर बोलायचे ठरवले. सुचिता गौरीशी बोलते म्हंटल्यावर रत्नाच्या जीवात जीव आला तिचा हात भराभर चालू लागला.

“मी बघितले तुझे व्हिडिओ गौरी, छान बनवले आहेस. मस्त डान्स केला आहेस.” दोन तीन दिवसांनी ठरल्याप्रमाणे गौरी सुचिताला भेटायला आल्यावर ती मोकळेपणाने बोलावी यासाठी सुचिताने तिची स्तुती केली.

“थँक्यू यू काकू.” कौतुकाने सुखावलेली गौरी हसून म्हणाली.

“कुठल्या स्पर्धेत वैगरे भाग घेतला आहेस का? कशासाठी हे व्हिडिओ बनवत आहेस?” सुचिताने विचारपूस करायला सुरुवात केली.

“भाग घेतला नाही काकू. संधी मिळाली तर घेईन.”

“म्हणजे?”

“ज्यांचे फॉलोअर्स जास्त असतात, व्हिडिओ व्हायरल होतात त्यांना रिॲलिटी शो मध्ये चान्स मिळतो. डेली सोप मध्ये सुद्धा काम मिळतं म्हणून सध्या फक्त फॉलोअर्स वाढवत आहे.” गौरी आत्मविश्वासाने बोलत होती.

“अगं पण वेळ कसा मिळतो तुला या सगळ्यासाठी. कॉलेज, अभ्यास सगळं कसं मॅनेज करतेस? या वर्षी ठीक आहे पण पुढच्या वर्षी बारावीत गेल्यावर वेळ कसा काढशील?” सुचिताने मुद्द्याला हात घातला.

“आईने कंप्लेंट केली ना माझी म्हणून तुम्ही मला बोलावून घेतलं.” स्मार्ट गौरी काय ते समजून गेली.

“तू शिकावं म्हणून आई, बाबा किती कष्ट करतात, त्याची जाण ठेव. मन लावून अभ्यास कर. हे सगळं नंतर सुट्टीत, फावल्या वेळात पण करू शकतेस. या नादात अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय हे चांगल नाही.” सुचिताने गौरीला समजावलं.

“ते नुसती ढोर‌मेहनत करतात, हाती पैसा काही येत नाही. म्हणूनच तर मला रीलस्टार व्हायचं आहे, यूट्यूब चॅनेल काढायचं आहे. झटपट पैसे कमवायचे आहेत. आई बाबांना सुखात ठेवायचं आहे.” आभासी जगाच्या, इन्स्टंट मनीच्या मायाजालात गौरी पुरती फसली होती. तिला रील, व्हिडिओ बनवून लाखो रुपये कमवायचे होते. तिला वाटत होतं एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की आपण रातोरात रीलस्टार होऊ. आपल्याला भरपूर पैसे मिळतील. रील आणि रिअल मधला फरक तिला समजत नव्हता. तिने निवडलेला मार्ग तिला एकदम सोपा वाटत होता त्यामुळेच तिचा शिक्षणाचा ओढा कमी झाला होता.

“कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बनवणार आहेस?”

“म्हणजे?” सुचिताच्या प्रश्नाने गौरी गोंधळून गेली.

“कॉमेडी, रेसिपी, ट्रॅव्हल. काहीजण फूड ब्लॉग बनवतात, काही प्रवासाचे असं काही.”

“अजून काहीच ठरवलं नाही.”

“माझी एक मैत्रीण आहे विभावरी. ती रेसिपीजचे व्हिडिओ बनवते. तुला हवं असेल तर मी तिला तुला मदत करायला सांगेन. चॅनेलबद्दल किंवा अजून काही माहिती हवी असेल तर ती सांगेल. मी बोलते तिच्याशी. आपण जाऊ तिच्याकडे.”

“हो चालेल.” सुचिताच्या बोलण्याने गौरी हुरळून गेली.

गौरीला समजावून सांगितलं तरी तिच्या डोक्यातून रील, व्हिडिओचे खूळ जात नव्हते. तिला पैशाचे वेध लागले होते. ओरडून, मारून हा प्रश्न सुटणार नाही, विरोध केला तर ती अजून आक्रमक होईल हे सुचिताच्या लक्षात आले होते त्यामुळे गौरीच्या कलाकलाने घेण्याचे ठरवत, तिला मदत करत आहे असे भासवत सुचिताने अचानक आपला पवित्रा बदलला.

क्रमशः

©® मृणाल महेश शिंपी.

काय असेल सुचिताच्या मनात…पाहूया पुढील अंतिम भागात.

0

🎭 Series Post

View all