Login

मायेचं बंधन भाग १

मायेचं बंधन भाग १
" अरे वा ! मिताली , हे काय ग ! सकाळी सकाळी तू लॅपटॉपचा डबा आणि तो मोबाईल घेउन सोफ्यावर आरामात बसली आहेस. तुझी सासू तिथं किचन मध्ये काम करतीय. जरा म्हणून मान ठेवायला नको. सकाळीं घरतल्या मोठ्यांना आधी चहा नाष्टा दयायला हवा. ते राहील बाजुला. बाई साहेब बसल्या लॅपटॉप आणि मोबाईल घेऊन. सोफ्यावर बघा कसा पसारा मांडून ठेवला आहे. अजगरा सारखी पसरून का बसली आहेस ?"

शोभना काकू जरा जोरात बोलत होत्या. त्यांचा आवज जरासा मोठा होता. की किचन मध्ये काम करीत असणाऱ्या विद्याला सगळं काही ऐकु जाईल.त्यांच्या मनातली चिड त्यांनी शब्दात व्यक्त केली पण आवाज मोठा करून विद्या पर्यंत पण पोहोचवली होती.

" अहो वहिनी मिताली ऑफिसचं काम करत आहे. ते तिच्या कंपनीचे क्लाएंट दुसऱ्या देशातील आहेत. त्यामुळे वेळेचा फरक पडतो.त्यांच्या वेळेनुसार आपण ऍडजस्ट करायला हवं. ते सकाळी त्यांची मीटिंग आहे म्हणून मिताली आता कामाला बसली आहे." विद्या शोभना वहिनींना म्हणल्या.

" काम ?" शोभना बाईंच्या कपाळाला आठ्या पडल्या. जणु काही विद्याच म्हणणं त्यांना पटलं नव्हत.

" विद्या आपल्या काळात आपण पण नोकरी करून घर संसार सांभाळला. नोकरीला जाण्याआधी घरची काम सासु सासरे सगळं काही सांभाळल.आपल्याला नव्हती अशी सूट ? वर्क फ्रॉम होम म्हणे ?

कंपनीच्या कामाच्या नावाखाली घरची काम बाजुला टाकली जातात नाही तर टाळली जातात. आता हेच बघ ना ?

मिताली लॅपटॉप घेऊन बसली आहे आणि तू किचन मध्ये अजुनही खपत आहे." सोफ्यावर आरामात बसत शोभन वहिनी म्हणल्या.

" काकु फक्तं पंधरा मिनिट. ही मीटिंग संपतच आली आहे. हे काम झालं की सगळ्यांना चहा बनवते." लॅपटॉप म्युट करून मिताली म्हणाली.

" अग असू दे मिताली, तू काम कर हा ! चहा विद्या बनवते आहे ना. तु चिंता नको करू. नाष्टा तयार करायला असा कितीसा वेळ लागणार आहे !"

शोभना बाई गोड आवाजात म्हणल्या.पण त्यांच्या बोलण्या मागचा खवचटपणा मितालीला समजला होता.

" आता जमाना बदलला आहे. इतकी वर्षे सासूच्या तालावर नाचायला लागतं आता सुनेच्या तालावर ठेका धरायला हवा. सासू किचन सांभाळते. आणि सुन बाई लॅपटॉप घेऊन कंपनी मध्ये काम करतात. बदलत्या जमान्या सोबत राहायला हवं बाई ! " शोभन वहिनी म्हणल्या.

" शोभा वहिनी हा घ्या तुमच्या आवडीचा आलं घातलेला चहा. गवती चहाची पात पं घातली आहे. तुम्हाला आवडते ना ! " परिस्थिती सांभाळून घेण्यासाठी विद्या बाईंनी शोभना वहिनीच्या साठी गरमा गरम चहा आणला.

शोभना वहिनी म्हणजे विद्या बाईंच्या मोठ्या जाऊबाई. भाऊजींच घर शहराच्या दुसऱ्या टोकाला आहे. मिताली आणि अमोलच्या लग्नात त्यांना यायला जमल नव्हत. त्या त्यावेळीं आजारी पडल्या होत्या. त्यांचं नुकतच डोळ्याचं ऑपरेशन झालं होत. त्यामुळे त्यांना लग्नाला यायला जमलं नव्हत. आता तब्येत बरी झाल्यावर त्या विद्या कडे आठ दहा दिवस राहायला आल्या होत्या. तसं तर शोभना आणि विद्या या दोघी चुलत बहिणी पण होत्या. लग्ना नंतर त्या जावा जावा झाल्या.

शोभना बाईंचा मोठा परिवार होता. दोन मुलं, सूना , जावई नातवंडं सगळे होते.शोभना बाई येताना मुलं सूनांच्या बद्दलच्या तक्रारींचा पिटारा घेऊन आल्या होत्या. विद्याला किती तरी वेळा सांगून झाल्या होत्या. पण तक्रारी काही कमी झाल्या नव्हत्या.

" वहिनी असा किती बदलला आहे जमाना ते तरी सांगा ?" विद्या त्यांचा चहाचा कप घेऊन शोभना वहिनीच्या सोबत सोफ्यावर बसत म्हणल्या.

" सगळंच तर बदललं आहे ना ! आमच्या घरीही हीचं तऱ्हा आहे. या दोघी जणी स्वयंपाक करतात. मुलांना शाळेत पाठवलं की आपल्या रुम मध्ये निघून जातात. आता तर मोबाईलचा जमाना आहे.मोबाईल हातात असला की कोणाची गरज लागत नाही.

वाटलं होतं सुन आली की तिच्या हातचं जेवण जेवायला मिळेल. तिला काही नवीन शिकवता येईल. तिच्या कडून काही शिकता येईल. आयुष्याच्या संध्याकाळी लेक सूना नातवंडं यांच्यात वेळ जाईल.

इथ येऊन बघितलं तर हिचं तऱ्हा. मिताली लॅपटॉप घेऊन बसते कामाला. तू बसते किचन सांभाळत." चहाचा घोट घेत शोभना वहिनी म्हणल्या.

" अम्म. विद्या चहा छान झाला आहे हां. जरा मितालीला पण करायला शिकव." शोभना वहिनी म्हणल्या.

" शिकवीन की. वहिनी मिताली पण सगळं सांभाळते. मला आवडत घरातील काम करणं. मितालीला बाहेरची दुनिया माहिती आहे. ऑनलाइन व्यवहार वगैरे तिला समजातात. तिचं सगळं कसं सांभाळत असते.