Login

मायेचा घास भाग १

मायेचा घास भाग १
मायेचा घास भाग १

" वा ! काय बेत आहे आज ? मेथीची भाजी आणि गरमागरम पोळ्या ? बाहेर पाऊस पडतोय आणि घरात हा सुवास... क्या बात आहे मुक्ता ! "

संजूने डायनिंग टेबलवर बसत उत्साहात दाद दिली. मुक्ताने चेहऱ्यावरचा घाम पुसत मंद स्मित केलं. आज ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड ताण होता, पण संजूला मेथीची भाजी आवडते म्हणून तिने खास वेळ काढून, निवडून, मसाला वाटून ही भाजी केली होती. तिला वाटलं होतं, आज तरी संजू मनापासून कौतुक करेल आणि गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेलं ते तुलनेचं सत्र थांबेल.

संजूने पहिला घास घेतला. मुक्ता आशेने त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती. संजूने घास चावला, थोडा वेळ विचार केला आणि मग पाणी पिऊन म्हणाला,

" भाजी चांगली झालीये गं मुक्ता... पण..."

पणss हा शब्द मुक्ताच्या कानावर पडला आणि तिचं मन खाडकन उतरलं. तिला पुढचं वाक्य तोंडपाठ होतं.

" पण... मेथीची भाजी ना, माझी आईच एकदम भन्नाट करते ! का गं आई ? तू त्या दिवशी केली होतीस तशी चव नाही आली यामध्ये. तू लसूण फोडणीला घालतेस की वाटून टाकतेस ? " संजूने सहजपणे प्रश्न विचारला.

बाजूलाच बसलेल्या कावेरीबाईंच्या चेहऱ्यावर एक गूढ , सुप्त हासु उमटलं. त्यांनी हळूच आपल्या ताटातली भाजी बाजूला सारली आणि म्हणाल्या,

" अरे संजू, असू दे रे. मुक्ताचं अजून नवीन लग्न आहे. लग्नाला वर्ष सुद्धा पूर्ण व्हायचंय अजून. हळूहळू शिकेल ती. चव यायला हाताला सराव लागतो.
मुक्ता, भाजी वाईट नाहीये गं, पण मेथीचा तो एक विशिष्ट कडूपणा असतो ना, तो गेला नाहीये तुझ्या भाजीत. मी करताना त्यात थोडा गुळाचा खडा आणि दाण्याचं कूट अशा बेताने टाकते की भाजी कडवट लागतच नाही."

मुक्ताच्या काळजात चर्रर्र झालं. लग्नाला दहा महिने झाले होते, पण अजूनही तिला शिकेल हळू हळू हेच प्रमाणपत्र मिळत होतं. तिने निमूटपणे स्वतःच्या ताटात भाजी वाढून घेतली. तिला ती भाजी चविष्ट वाटत होती, त्यात तिचं प्रेम आणि कष्ट दोन्ही होते. पण संजूच्या आईची चव या एका वाक्याने त्या कष्टांची किंमत शून्य झाली होती.

" संजू, तुला जर आईच्याच हाताचं प्रत्येक गोष्टीत आवडतं, तर मला आधी सांगत जा. म्हणजे मी विनाकारण युट्यूबवर नवीन रेसिपी बघून किंवा स्वतःचे कष्ट घालून प्रयोग करणार नाही." मुक्ताचा आवाज यावेळी शांत पण धारदार होता.

संजूने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं.

" अगं, तू तर लगेच चिडलीस. मी कुठे वाईट म्हणालो ? मी फक्त एक फीडबॅक देत होतो. तुलना नाही करत मी, फक्त सांगतोय की आईची चव वेगळी असते. यात एवढं काय मनाला लावून घ्यायचं ? "

कावेरीबाईंनी मध्येच आपली पोळी मोडली आणि म्हणाल्या,

" राहू दे रे संजू, हल्लीच्या मुलींना जरा काही चुका सांगितल्या की त्यांना तो अपमान वाटतो. आमच्या वेळी सासूने मिठावरून जरी बोललं तरी आम्ही मान खाली घालून निमूटपणे ऐकून घ्यायचो. सुधारणा करायचो स्वतःमध्ये. आता काळ बदललाय म्हणा..."

मुक्ताला आता जेवणं अशक्य झालं होतं. हे रोजचंच झालं होतं. गेल्या सहा-सात महिन्यांपासून संजूच्या प्रत्येक वाक्याची सुरुवात आई छान करते किंवा आईच्या हाताची चव येत नाही यानेच व्हायची. कावेरीबाई सुद्धा या तुलनेचा आनंद घेत मुक्ताला सतत कमी असल्याचं जाणवून द्यायच्या.

मुक्ता उठली आणि किचनमध्ये गेली. तिला त्या घराचं किचन आता रणांगण वाटू लागलं होतं. जिथे ती रोज एक अदृश्य लढाई लढत होती. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची.

तिने स्वतःशीच विचार केला, मी नोकरी करते, घर सांभाळते, सासूबाईंच्या सवयी जपण्याचा प्रयत्न करते. पण संजूला फक्त त्याच्या आईच्या हाताची चव दिसते. आई सुगरण आहेच, पण माझी चव पूर्णपणे नाकारणं हे कितपत योग्य आहे ?

तिला आठवलं, लग्नाच्या पहिल्या दोन महिन्यात सगळं कसं छान होतं. पण जसजसा काळ गेला, तसं कावेरीबाईंना आपली सत्ता धोक्यात असल्यासारखं वाटू लागलं. मग त्यांनी संजूच्या माध्यमातून मुक्ताच्या आत्मविश्वासावर वार करायला सुरुवात केली होती. संजूला हे कळत नव्हतं की त्याच्या साध्या कमेंटमुळे मुक्ताच्या मनात सासू विषयी एक खदखद निर्माण होत आहे.

रात्री झोपताना संजूने तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला, पण मुक्ताने कूस बदलली.

" काय झालं गं ? अजून त्या भाजी वरूनच रागावली आहेस का ?" संजूने विचारलं.
मुक्ता अंधारात छताकडे बघत म्हणाली,

" संजू, चव फक्त जिभेला नसते, मनालाही असते. तुला आईच्या हाताची चव आवडते कारण त्यात तुझा लहानाचा मोठा झालेला काळ आहे. पण तू माझी चव समजून घ्यायचा प्रयत्न तरी करतोयस का ? की कायम मला एका स्पर्धेत उभं करणार आहेस ? "

संजू निरुत्तर झाला. त्याला हे सगळं विनोदी वाटत होतं, पण मुक्तासाठी हे तिच्या अस्तित्वाचं आणि आदराचं युद्ध होतं. लग्नाला वर्ष पूर्ण व्हायला अजून दोन महिने बाकी होते, पण मुक्ताच्या मनात या नात्याबद्दल प्रश्नचिन्ह उभं राहू लागलं होतं. ही अदृश्य स्पर्धा घराचा गोडवा संपवत होती.
बाहेर पावसाचा जोर वाढला होता आणि आत मुक्ताच्या मनातील वादळही शमत नव्हतं.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all