शिर्षक - मायेची सावली
कोल्हापूरला सरदेशमुख कुटूंब राहत होते, त्यांचा खूप मोठा वाडा होता. वाड्यात संध्याकाळच्या वेळी देवाच्या गाभाऱ्यातला समईचा मंद उजेड आणि उदबत्त्यांचा सुवास संपूर्ण घरात दरवळत होता. जयश्रीबाई देवापुढे बसून मंत्र पुटपुटत होत्या, पण त्यांच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू होता.
घर मोठं होतं, भक्कम होतं, पण हल्ली त्याला शांततेची एक अनामिक हुरहुर होती. त्यांचा नवरा गेल्यानंतर सगळं तसं पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. मोठा मुलगा सुहास परदेशात गेला, मुलगी वैभवी लग्नानंतर पुण्यात स्थायिक झाली. धाकटा मुलगा शरद आणि त्याची पत्नी अनघा सोबत होते, पण तरीही… घराला आधीचं गोडवेपण नव्हते. ते कुठेतरी हरवल्यासारखं वाटत होतं.
रात्रीच्या वेळी शरद आईच्या खोलीत गेला आणि तिला आवाज दिला.
"आई, आज काल तू खूप जास्त विचार करतेय असं वाटतंय मला?" शरदने विचारलं म्हणून जयश्रीबाईंना खूप छान वाटलं पण तरीही जयश्रीबाईंनी मंद हसत त्याच्याकडे बघितले आणि बोलायला लागल्या.
"काही नाही रे, तसं काही नाहीये, असंच!" जयश्रीबाईंनी कारण नाही सांगितले पण शरदला ते समजलं होतं. तो आपल्या बायकोकडे अनघाकडे गेला आणि आपल्या आई बद्दल तिच्याशी बोलू लागला. ते दोघेही रात्री जयश्रीबाईंचाच उशिरापर्यंत विचार करत बसले.
दुसऱ्या दिवशी अनघाने वैभवीला फोन केला.
"वैभवी, आई हल्ली खूप गप्पगप्प राहतात, त्यांना खूप एकटं वाटतंय, सारखं कुठे तरी हरवल्यासारख्या वाटतात." अनघा म्हणाली तेव्हा वैभवी काही क्षण शांत होती.
"होय गं, मलाही कळतंय. बाबा गेल्यापासून ती खूप एकटी पडली आहे, त्यात आता एवढ्या मोठ्या घरात फक्त तुम्ही तीनच माणसं राहतात, तुम्हालाही तुमची कामं असतात पण तरीही तुम्हाला मिळेल तेवढा वेळ तुम्ही तिला देता. पण तरीही ती बाबांना, मला आणि दादाला मिस करत असेल गं!" वैभवी म्हणाली. अनघाने पण तिला तेच सांगितले, मग तिच्याशी बोलून झाल्यावर अनघाने सुहासलाही फोन केला.
"भावोजी, आपण आईसाठी काहीतरी करायला हवं. त्या जुन्या आठवणीत रमताय. बाबांची कमतरता भासतेय त्यांना मग आपण त्यांच्यासोबत वेळ घालवून आपण नव्या आठवणी का नाही तयार करत? आपण त्यांच्यासाठी नव्या आठवणी तयार केल्या तर त्या जुन्या आठवणीतून बाहेर पडतील." सुहासला अनघाचं बोलणं पटलं आणि त्यानेही निर्णय घेतला.
"अनघा, मी पुढच्या महिन्यात काही दिवसांसाठी भारतात येतो. आईने मला जन्म दिला आहे, वाढवलं आहे, आमच्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या आहे. आज आपण सगळे आहोत ते फक्त आई बाबांमुळेच आहोत. आज बाबा नाहीत पण आईला आपली गरज आहे तर आपण तिऐ वेळ द्यायलाच हवा." सुहासचं बोलणं ऐकून अनघा खूश झाली.
त्यानंतर आठवडाभरात वाड्यात धावपळ सुरू झाली. वैभवी पुण्यावरून आली होती, सुहास व्हिडिओ कॉलवर रोज हजर असायचा. जयश्रीबाईंना ते पाहून खूप आनंद झाला.
"वैभवी, तू अचानक कसं काय आली?" जयश्रीबाईंनी विचारलं. तेव्हा वैभवी आईच्या खांद्यावर डोकं ठेऊन म्हणाली, "आई, मला तुझी आठवण येत होती म्हणून आले." वैभवी म्हणाली.
वैभवी घरी आली त्या दिवशी घरात आनंदाची चाहूल लागली. जयश्रीबाईंनी पुन्हा जुन्या आठवणी जिवंत केल्या स्वयंपाकघरात अनघा आणि वैभवी सोबत खास पदार्थ बनवणे, अंगणात रांगोळी काढणे, आणि छान गप्पा मारत बसणे. असं त्यांचं रूटीन चालू झालं
एका संध्याकाळी सुहासने व्हिडिओ कॉल केला आणि आपल्या आईशी बोलू लागला.
"आई, मी कायमचा भारतात परत येतोय." त्याच्या बोलण्याने जयश्रीबाईंना क्षणभर शब्दच सुचले नाहीत. डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण ते आनंदाचे होते.
"म्हणजे हे घर आता पुन्हा पूर्वीसारखं हसणार आहे." त्या समाधानाने म्हणाल्या.
आणि त्या दिवसानंतर सरदेशमुख वाड्यात पुन्हा प्रेम, हसू, आणि आनंदाचे सूर उमटू लागले.
समाप्त.