मायेची ऊब_ भाग२

कथामालिका
भाग___२

इंद्रायणीला तिचे बाबा उदास झाले की कुठे बसलेले असतात ते ठाऊक असते. ती पळतच देवळाच्या मागच्या बाजूला जाते आणि विवेक सुध्दा तिच्या मागे जातो.

तिचे बाबा एका भल्या मोठ्या विहीरीच्या काठावर पाय सोडून बसलेले असतात. विवेकला त्यांना असे बघून धक्का बसतो.

"इंद्रायणी बाबा असे कसे..!"

"अहो, त्यांना सवय आहे. उदास असले की ते येथेच येऊन बसतात."

"पण विहीरवरच का ! तेही अशा अंधारात!"

त्याला काहीच उत्तर न देता तिने सावकाशपणे पाऊल टाकले आणि तिच्या बाबांना ती घट्ट मिठी मारते.

"बाबा."

"इंद्रायणी तू .."

"बाबा आधी तुम्ही खाली उतरा." विवेक त्यांना हात धरून खाली उतरवतो.

"इंद्रायणी तू येथे का आलीस ? मी येतच होतो !"

"बाबा आज माझी पाठवणी आहे आणि तुम्ही मला सोडून इकडे का येऊन बसला?"

"अग आज मनात विचारांचे वादळ घोंघावत आहे आणि तू सोडून जाणार म्हटल्यावर मी फार अस्वस्थ झालो होतो ग."

"बाबा तुमच्या मनात काही आहे का? तसच काही असेल तर तुम्ही मला सांगू शकता."

"नाही तसं काही नाही.‌ चला आपण जाऊ या." त्यांनी डोळ्यांनी विवेकला खुणावले.

तिघेही मंडपात परत आले. उशीर झाल्याने यशवंतरावांनी सगळ्यांची माफी मागितली. त्यानंतर मात्र ताबडतोब विवेक आणि इंद्राची वरात निघाली. पण आता दोघांच्याही डोळ्यांतले पाणी आटले‌ होते. सगळ्यांनी आनंदाने एकमेकांचा निरोप घेतला. दोघांनाही पांच परतवणीला पाठवतो असे सांगून जयवंतरावांनी निरोप दिला.

दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे विधी पार पडले आणि त्यानंतर विवेकने तिला माहेरी सोडले. यशवंतरावांनी आणि त्यांच्या बहीणीने आधीच सगळी तयारी करून ठेवली होती. दोघांचेही जोरदार स्वागत केले. त्यानंतर जेवण आटोपले आणि विवेक घरी जायला निघाला.

" हे काय विवेकराव तुम्ही नाही थांबणार? "

"नाही बाबा, मी इंद्राला घ्यायला परत येणारच आहे. "

"बर ठीक आहे."

विवेक दोघांचाही निरोप घेऊन निघून गेला.

तीन चार दिवसांनी...

"अरे, विवेकराव या. तुम्ही अचानक ! आमच्या इंद्राशिवाय करमत नाही वाटत."

"नाही तसं नाही. या भागात आलो होतो. म्हटल तुम्हाला भेटून जावं."

"इंद्रायणी घरी नाही वाटत. कुठे बाहेर गेली आहे का?" विवेकची नजर त्याच्या बायकोला शोधण्यासाठी भिरभिर फिरत होती.

"नाही. ती मैत्रिणी कडे गेली आहे. माहेरी आली आहे ना. मग काय सध्या मजा करत आहे. इतक्यात ती येईलच."

" तुम्ही कसे आहात बाबा."

"मी मजेत आहे विवेकराव. पण तुम्ही मला सांभाळून घेतले. तुमच्या एका शब्दामुळे , वचनामुळे मी विश्वस्त झालो. आजपर्यंत मी ही गोष्ट तिच्या पासून लपवून ठेवली आणि तुम्ही सुद्धा ही गोष्ट इंद्रापासून कायमचीच लपवून ठेवा. तिची खरी ओळख तिला कळू नये हीच इच्छा आहे."

"बाबा, तुम्ही असे हात जोड नका. तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या. इंद्रायणीची आता माझी जबाबदारी आहे."

तेवढ्यात इंद्रायणी घरी येते आणि या दोघांमध्ये चाललेले बोलणे तिच्या कानावर पडते.

"बाबा अशी कोणती गोष्ट आहे. जी यांना माहिती आहे आणि मला नाही. बाबा मी नक्की कोण आहे?"

"म्हणजे? तुला काय म्हणायचे आहे ?"

"बाबा मी सरळ साधा एक प्रश्न विचारला आहे. की मी नक्की तुमचीच मुलगी आहे ना !"

"हा काय सरळ प्रश्न आहे?" यशवंतराव

"इंद्रायणी तू काय बोलत आहे. तुला कळतंय का?" विवेक

"बरं मग तुम्हीच सांगा. असे कोणते सत्य बाबांनी आजपर्यंत माझ्यापासून लपवून ठेवले आणि फक्त तुम्हाला सांगितले. "

तिच्या डोळ्यात चटकन पाणी आले.

"इंद्रायणी अस रडतात का वेडाबाई. असं काहीच नाही सांगितले आहे." विवेक

"बाबा, मी एवढी परकी झाले का तुम्हाला ?"

"इंद्रा... तुला कोणी काही म्हटले का?"

बाबांनी तिला जवळ घेतले आणि बापलेकीच्या नात्यांचा बांध फुटला.

"बाबा, मला खरं काय ते सांगा. मी सत्य स्वीकारायला तयार आहे."

अश्विनी मिश्रीकोटकर