"मायेच्या नात्याची ऊब" भाग - 2
मागच्या भागात आपण पाहिले आईची लगभग पण शेवटी रथाची दोन्हीही चाकं बरोबर चालली कि संसार कसा सुरळीत.
बाबा पण त्याच्या परीने सगळीकडे हातभार लावत होते. घरी इकडची काडी तिकडे न करणारं बाबा लेक इकडं आल्या पासून अगदी कामात मुरल्यागत मग्न असायचे.
म्हणूनच फक्त आईच नाही, तर बाबांनीही तितकाच हातभार लावला होता. शार्वीच्या नवऱ्याला (जावई राघव) यांना त्यांच्या ऑफिसच्या कामासोबतच घरात IKEA वरून सामान आणून नवनवीन वस्तू बनवण्याची आवड. बाबाही मोठ्या उत्साहाने त्यांच्यासोबत बसून छोट्या मोठ्या गोष्टींची जोडणी करण्यात, स्क्रू लावण्यात मदत करत.
राघवला त्याच्या कामातून थोडा वेळ काढून असे छंद जोपासताना बाबांची साथ मिळायची, त्यामुळे राघव देखील खूप खुश असायचा. बाबांचा एक वेगळाच कार्यक्षम वावर त्यांच्या घरात तयार झाला होता.
आई-बाबांचे भारतात जाण्याचे दिवस जसजसे जवळ येत होते, तसतसे लेकीबरोबर जावयाचे मन देखील कासावीस होत होते. या तीन महिन्यात घरात एक वेगळीच ऊब, शिस्त आणि सोबत आली होती. तीन महिन्यात घर कसं एका सूत्रात बांधल्यासारखं वाटायला लागले होते.
सगळ्या वस्तू क्षणार्धात जिथल्या तिथे मिळत होत्या. भारतातून आणलेल्या सामानाला लेबलं लागली होती. कोणत्या वस्तू आधी वापरायच्या, कोणत्या नंतर यांची नोट पण त्याच्यावर चिटकवून टाकली होती बाबांनी. प्रत्येक वस्तूला व्यवस्थित जागा करायचे काम आई करायची, तर बाबा या कप्प्यात काय ठेवले यांची नोंद आतल्या बाजूला तो पेपर चिटकवून टाकत.
अगदी तारखेपासून ते किलोपर्यंत लिहिले होते. गमतीनं आई म्हणायची, "चला आज कडधान्याची फॅमिली तयार करू, उद्या मसाल्याची।" एकाच ठिकाणी अश्या 'फॅमिली' बनवून ठेवली की मुलांना शोधायला लागणार नाही.
शार्वी,राघव ऑफिसमधून आल्यावर राघव गमतीनं विचारायचा, "पण आई, आज कोणाची फॅमिली बनवली?"
परदेशातील त्या भव्य घरात आई-बाबांनी जीव ओतला होता. कपड्याची कपाट व्यवस्थित लागली होती. शार्वी-राघवचे कडक इस्त्री केलेले कपडे बाबा हॅंगरला लटकवत होते. शोधाशोध आपोआपच कमी होत होती.
स्वयंपाकघरात आईची लगबग. मसाल्याचे डबे घासून पुसून स्वच्छ होते. सगळे मसाले व्यवस्थित आपल्या पाळ्यांमध्ये नीटनेटके बसलेले होते. गॅस, ओटा नेहमी स्वच्छ चकचकीत असायचा. डिशवॉशरमधील भांडी जागच्या जागी स्थिर स्थावर होत होती. रोजचे लागणारे पदार्थ हातासरशी मिळावेत असे एका कप्प्यात दिमाखात विसावले होते.
आपल्यासारखेच लेकीला देखील खारे दाणे आवडतात म्हणून, "कशाला बनवतात उगाच?" म्हणत असताना बाबांनी आपल्या हाताने चांगले एक किलो खारेदाणे बनवून काचेच्या बरणीत भरून समोर टेबलावर ठेवले.
जाण्याची लगबग तर होतीच त्यात लेक-जावयानं भारतात गेल्यावर प्रेमाची भेट कोणाला काय द्यायची त्या दिल्या होत्या वस्तू बॅगेत जागा करून दोघे मिळेल त्या वेळी बॅगेत भरत होते.जाण्याची लगबग, वेळेशी संधान बांधून आई-बाबांची माया कामाला लागली होती.
वर लेक-जावयाचे लटक्या रागावण्याची झालर लटकत होतीच. सूर एकच – "आई-बाबा, तुम्ही ऐकत का नाही?" पण घरात आई-बाबांच्या मायेची आणि शिस्तीची छाप स्पष्ट दिसत होती. हा तीन महिन्यांचा सहवास, स्वयंपाकघरातील खमंग वास आणि हॉलमध्ये बाबांच्या खुर्चीचा शांत आधार आता काही दिवस राहून दूर जाणार होता.
अजून बरेच काही मेतकुट दोघांचे चाललेले असायचे.
लेक जावई आॉफसला जायची हे दोघे वाटच पाहत असायचे. बघू या भावनिक मायेची ऊब आणखी काय करत होती अर्थातच पुढील भागात
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा