Login

"मायेच्या नात्याची ऊब" भाग - 5

Jithe Mayechi Oob Thithe Fakt Jivala Japala Jato
"मायेच्या नात्याची ऊब" भाग - 5
मागच्या भागात आपण पाहिले आईबाबांचा भारतात परतीचा निरोप समारंभ खुपच हळवा होता.
पहाटेच्या अलार्म पहाटेच्या अलार्मसोबत आई-बाबांना विमानतळावर सोडून आल्यानंतरचे पहिले दोन दिवस शार्वी आणि राघवसाठी खूप जड होते. घराच्या दारातून आत पाऊल ठेवताच घरातली ती निरव शांतता त्यांना खाऊन टाकत होती. ती शांतता इतकी भेदक होती की, त्यांना एकमेकांशीही नीट बोलता येत नव्हते. एरवी घरातून 'कुठली वस्तू कुठे आहे?' यावरून होणारा गोंधळ आणि त्यावरील आई-बाबांचे प्रेमळ 'कच-कच' याला आता पूर्णविराम मिळाला होता.
पण हा विराम त्यांना आता नकोसा वाटत होता.​राघव ऑफिसमधून लवकर घरी आला होता. त्याने घरातल्या लायब्ररी रूममध्ये बाबांनी जोडून ठेवलेले एक नवीन रॅक बघितले. बाबांच्या 'कार्यक्षम वावर' याची ती शेवटची निशाणी होती. राघवने त्या रॅकवर हात फिरवला. स्क्रू आणि नट्सची जोडणी इतकी अचूक होती की, त्यात कोणतीही 'आयकिया (IKEA) निर्मित' गडबड नव्हती.
बाबांची शिस्त नुसती घरातल्या वस्तूंमध्ये नव्हती, तर ती जोडणीच्या प्रत्येक स्क्रूमध्ये उतरली होती. राघवने पटकन मोबाईल काढला आणि एका रिकाम्या रॅकचा फोटो काढून त्यावर 'बाबांची कार्यक्षमता' असे कॅप्शन टाकले, पण तो फोटो ग्रुपवर पाठवला नाही. तो नुसता फोटो बघत राहिला.
​दुसरीकडे शार्वीची अवस्था स्वयंपाकघरात दयनीय झाली होती. तीन महिन्यांत आईने इतकी परफेक्ट सिस्टीम लावली होती की, आता तिला स्वतःच्या कामात 'अव्यवस्था' जाणवत होती.
आज डिनरसाठी तिने साधाच बेत वरण-भात बनवायचे ठरवले.आईने कडधान्यांसाठी जो विशेष कप्पा तयार केला होता, त्या कप्प्याला 'कडधान्य फॅमिली' असे लेबल लावले होते. 'तूर डाळ' आणि 'हरभरा डाळ' व्यवस्थित वेगळ्या, हवाबंद बरण्यांमध्ये होत्या. पण शार्वीला 'तूर डाळ' किती घ्यायची, कशी भिजवायची याचा साधा हिशोब लागेना. तीन महिने ती फक्त 'आई, किती घेऊ?'असे विचारून मोकळी झाली होती.
आईच्या हातच्या चवीची सवय लागलेल्या राघवला आता ती चव देऊ शकणार नाही, या विचाराने ती निराश झाली.
​शेवटी तिने फ्रिज उघडला. वरच्या कप्प्यात आईने भरून ठेवलेले डबे 'आधारस्तंभांसारखे' उभे होते. तिने एका डब्यावरची तारीख पाहिली—'भोपळ्याचे घारगे, २५/११.' बाबांनी लिहिलेले अक्षर वाचून तिच्या डोळ्यात पाणी आले.
'जेव्हा ऑफिसवरून थकून याल, तेव्हा फक्त गरम करा.' आईने दिलेले हे नुसते जेवण नव्हते, तर थकलेल्या शरीराला आणि मनाला मिळालेली ती' मायेच्या नात्याची ऊब' होती.
​राघवने किचनमध्ये येऊन तिला मिठी मारली.
"हे बघ शार्वी, बाबांनी त्यांच्या निळ्या फोल्डरमध्ये मला जी चिठ्ठी दिलीय ना, त्यात त्यांनी हेच सांगितले आहे की,'जुन्या वस्तू आणि शिस्त, दोन्ही उपयोगी आहेत.' आता आपण या गोष्टींचा आधार घ्यायचा."
​शार्वी म्हणाली, "आधार घेतेय म्हणूनच आज मी भोपळ्याचे घारगे गरम करून वाढणार आहे. त्याबरोबर तिळाची चालेल ना! अग चालेल काय धावेल धावेल.
पण राघव, रोज हे डबे संपल्यावर काय?आई-बाबांनी जे काही इथे व्यवस्थित केले आहे, ते फक्त वस्तूंसाठी नाहीये, तर ते आपल्या वेळेसाठी आहे.आईंनी आपल्याला स्वयंपाकघरात वेळ वाचवून दिला, तर बाबांनी तुझ्या स्टडीरूम आणि गॅरेजमध्ये.
आता तो वाचलेला वेळ आपल्याला एकमेकांना द्यायचा आहे."
​राघवने एक दीर्घ श्वास घेतला. "तू बरोबर आहेस. आज मला एका मित्राने पार्टीला बोलावले आहे. मी आधी विचार करत होतो की नाही जायला नको, कारण उद्या कामाचा लोड आहे.
पण मला आठवले की, बाबांनी माझे सगळे इन्शुरन्स आणि रिटर्न पार्सलचे काम आधीच हातावेगळे केले आहे. त्यामुळे आज मला थोडा वेळ मिळाला आहे."​त्या रात्री दोघांनी आईने करून ठेवलेले दिलेले गरमागरम घारगे आणि त्याबरोबरच तिळाची चटणी खाल्ली. खात खातच शार्वीनं आईबाबांना व्हिडिओ कॉल लावला. प्रत्येक घासागणिक त्यांना आई-बाबांचा सहवास आठवत होता. त्यांच्या जेवणातून 'मायेची ऊब' त्यांच्या मनात उतरत होती.
परदेशातल्या या भव्य पण आता पुन्हा शांत झालेल्या घरात, ती 'शिदोरी' त्यांना जगण्याची नवी उमेद देत होती.
नक्कीच हि शिदोरी त्यांना आईबाबा पुन्हा परत येईपर्यंत पुरणार होती.
बऱ्याच गोष्टी आईबाबांनी तिन महिन्यात केल्या होत्या अगदी बोध घेण्यापत त्याचे रंजक वर्णन पुढील भागात.
क्रमशः
वाचकहो आवडती ना हि दीर्घ कथा कशी वाटते. अरे हो काही त्रुटी असल्यास सांगायला विसरू नकाआणि मुख्य म्हणजे सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही धन्यवाद
0

🎭 Series Post

View all