"मायेच्या नात्याची ऊब" भाग - 6
आई-वडिलांच्या जाण्याला दोन आठवडे उलटले. घरातली शांतता आता हळूहळू 'नव्या' शांततेत रूपांतरित होऊ लागली होती. शार्वी आणि राघवने बाबांच्या 'शिस्ती'चा आणि आईच्या 'ऊबे'चा आधार घेत आपले आयुष्य पुन्हा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू केला होता.
राघवच्या कामामुळे त्याला जास्त वेळ मिळत नव्हता.
पण शार्वी मात्र स्वयंपाकघरात आणि घरात अधिक वेळ घालवून 'मायेची ऊब' जपण्याचा प्रयत्न करत होती.
आईने भरलेले डबे आता वेगाने खाली होत होते. हळूहळू पुरणपोळी, कटाची आमटी आणि लाडू संपले.
फ्रिजचा वरचा कप्पा पुन्हा रिकामा झाला.आईची 'शिदोरी' संपत चालल्याची जाणीव शार्वीच्या मनात भीती निर्माण करत होती.
एका शुक्रवारी राघवने शार्वीला ऑफिसमधून फोन केला."शार्वी, उद्या आमच्या प्रोजेक्टचा हेड त्यांच्या फॅमिलीसोबत अचानक डिनरसाठी येतोय.तो इंडियन फूडचा खूप फॅन आहे. मी त्याला 'ऑथेंटिक इंडियन डिनर'चे वचन दिले आहे." राघव उत्साहात होता.
"मी आता आईने दिलेले 'शेंगदाणा-लसूण चटणी' आणि 'आळूवडी' गरम करून ठेवतो.मेन कोर्स तू बघ."
शार्वीच्या अंगावर काटा आला.
'ऑथेंटिक इंडियन डिनर!' नुसती सॅलड किंवा स्मूदी बनवण्याची सवय असलेल्या शार्वीसाठी हे मोठे आव्हान होते.तिने धाडस केले. आईने बनवलेले पदार्थ संपले असले तरी, आईची सिस्टीम अजूनही जागेवर होती.
स्वयंपाकघरातले मसाले, कडधान्ये, तळणासाठी लागणारे सगळे साहित्य 'एका सूत्रात बांधल्यासारखे' होते. तिला आठवले.आईने कसे मसाल्याचे डबे घासून पुसून स्वच्छ केले होते आणि कोणत्या मसाल्याचे मिश्रण कशासाठी वापरायचे, हे एका छोट्या कागदावर डब्याच्या आतल्या बाजूला चिटकवून ठेवले होते.
तिने मेन कोर्ससाठी तिनं 'खमंग मसालेभात' आणि रायता बनवण्याचे ठरवले. ही डिश आईने अनेकदा बनवताना तिने पाहिली होती, पण स्वतः कधी केली नव्हती. तिने कडधान्याच्या कप्प्यातून तांदूळ काढला.मसाल्याच्या डब्यातून तमालपत्र, लवंग आणि दालचिनी आईने 'गरजेनुसार वापर' म्हणून एका छोट्या बरणीत एकत्र करून ठेवली होती. तिने सगळी तयारी केली, पण जेव्हा 'मसाल्याचे प्रमाण' टाकायची वेळ आली, तेव्हा ती थांबली. 'अर्धा चमचा हळद, पाव चमचा धनेपूड, की पाव चमचा गरम मसाला?' या साध्या प्रश्नाने तिचा आत्मविश्वास डगमगला.
तिने मसाले भातात टाकले, पण काहीतरी कमी असल्यासारखे वाटले.आईने 'पाळ्यांमध्ये' व्यवस्थित बसवलेल्या मसाल्यांकडे ती बघत राहिली. हे मसाले म्हणजे नुसती पूड नव्हती.तर आईच्या हाताची चव होती.
हताश होऊन तिने शेवटी आईला व्हिडिओ कॉल लावला.आई देवाजवळ शांतपणे नामस्मरण करत बसली होती.
"आई! मला तुझ्या हातचा मसाला भात हवाय!माझा मसालेभात बिघडतोय असे वाटते आहे. किती तिखट टाकू? आणि किती मीठ?हळद कधी टाकू? शेंगदाणे, डाळं कि मटार? इथले लोक जास्त तिखट खात नाहीत.." शार्वीने एका दमात आपली समस्या सांगितली.
आई हसली,अग थांब थांब थोडा श्वास तर घेशील.अग किती लोक आहेत ते सांग!मग मेन कोर्सचे बघू. मग सगळे प्रमाण. तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाची लकेर उमटली.
ठिक आहे फक्त दोघेच चल मग मसालेभात आणि बुंदी रायता परफेक्ट बेत.
तर मग ऐक "अगं वेडे, तिखट आणि मीठ, हे तर आपल्या अंदाजाने टाकायचे असते. मी तुला एक गोष्ट सांगते."आईने शांतपणे म्हटले.
"मसालेभातात तिखटापेक्षा प्रेमाचे प्रमाण जास्त असले पाहिजे. तू जेव्हा मसाले टाकत असतेस ना, तेव्हा मनात राघवच्या आणि आलेल्या पाहुण्यांच्या आनंदाचा विचार कर.तुझे मसाले आपोआप बरोबर पडतील."हं डाळे शेंगदाणे, कडीपत्ता आणि तिखट ऐवजी लाल मिरची वापर सगळे जिथल्या तिथे आहे फक्त नजर फिरवली सगळे एका दमात मिळेल बघ.
आईने तिला नेमके 'टेक्निक' सांगितलं.गरम मसाला शेवटी, मीठ नेहमी 'चवीनुसार टाकायचं. आईचे शांत बोलणे ऐकून शार्वीला नवी ऊर्जा मिळाली.
आईने पुढे म्हटले,"आणि हो, माझ्या 'कडधान्य फॅमिली'तल्या तांदळाच्या बरणीवर मी आतल्या बाजूला एक चिठ्ठी लावलीय बघ. त्यावर प्रत्येक पदार्थासाठी 'अंदाजित प्रमाण' लिहिले आहे. ते प्रमाण फक्त 'मार्गदर्शक' आहे. लक्षात ठेव, स्वयंपाकघराची 'शिस्त' बाहेरून नाही, तर मनातल्या 'प्रेमाच्या मायेतून' येते. तू फक्त मोकळेपणाने कर."
आईचे मार्गदर्शन आणि ती 'चिठ्ठी' वाचून शार्वीला आपले उत्तर मिळाले. त्या रात्री तिने बनवलेला मसालेभात आणि बुंदी रायता कॉम्बिनेशन पाहुण्यांना खूप आवडले.
प्रोजेक्ट हेडने शार्वीच्या हातच्या पदार्थांचे कौतुक केले.
राघवने शार्वीकडे अभिमानाने पाहिले.आज शार्वीला कळले की आईने त्या भव्य घरात नुसत्या वस्तूंना जागा केली नव्हती, तर हजारो मैलांवरूनही उपयोगी पडेल अशी 'मायेची ऊब' प्रत्येक डब्यात भरून ठेवली होती. ही शिदोरी केवळ अन्नाची नव्हती, तर 'आत्मविश्वासाची' होती.
आता पुढील भागात एक वेगळीच शिदोरी.
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा