मायेच्या नात्याची ऊब: भाग १९
इकडे दोन वेगवेगळ्या शिस्तींचा एक गोड समन्वय पाहायला मिळत होता.अरुणा (शार्वीची आई) आणि विजया (राघवची आई) या दोघी घरात आल्यापासून राघव आणि शार्वीच्या जीवनात एक अद्भुत बदल झाला होता.
घरात आता 'मायेच्या ऊब'चा जणू दुहेरी डोस मिळत होता. शार्वीला 'मॉर्निंग सिकनेस'चा त्रास होत असल्याने तिचे ऑफिसचे आणि घरचे सर्व नियोजन थोडे कोलमडले होते. पण दोन्ही आया आल्यामुळे राघवच्या घरच्या कामाचा ताण पूर्णपणे हलका झाला. त्यामुळे तो ऑफिसच्या कामाकडे अधिक चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकत होता.
कारण आता घरात केवळ 'व्यवस्थापन' नव्हते, तर त्यात 'ममता' आणि 'आपुलकी' मिसळली होती.
सुरुवातीला राघवला थोडी धाकधूक होती की, कमालीच्या 'शिस्तप्रिय' असलेल्या दोन्ही आयांच्या कार्यपद्धती वेगवेगळ्या असल्याने काही गोंधळ तर होणार नाही ना? पण प्रत्यक्षात मात्र वेगळेच घडले.
अरुणाची शिस्त ही प्रामुख्याने 'स्वयंपाकघर' आणि 'वर्गीकरणावर' आधारित होती. तिने शार्वीला ज्या मसाल्यांच्या वासाचा त्रास व्हायचा, ते पदार्थ शोधून वेगळ्या कप्प्यात हलवले.
शार्वीचा त्रास कमी होईपर्यंत स्वयंपाकघरात जास्त फोडणीचे किंवा उग्र वासाचे पदार्थ न बनवता, सर्वांनी मिळून हलका आहार घ्यायचा असे सर्वानुमते ठरले.
या बदलाची पूर्ण जबाबदारी अरुणाने आनंदाने स्वीकारली.
तर विजयाची शिस्त ही 'आरोग्य' आणि 'वेळेवर' आधारित होती. तिने शार्वीसाठी दिवसभरात कोणत्या वेळी कोणते पौष्टिक पेय किंवा आहार घ्यायचा, याचे एक शिस्तबद्ध 'आरोग्य वेळापत्रक' तयार केले.
शार्वीला योग्य पोषण कसे मिळेल, याकडे दोन्ही आयांचे बारीक लक्ष असे. सोबतच त्या राघवच्या आहाराचीही काळजी घेत होत्या.
कधी कधी राघव म्हणायचा, "अगं आई, जे आहे ते मी खाईन, नका काळजी करू!" पण त्याला आवडीचे पदार्थ कसे मिळतील, याकडे अरुणा स्वतः जातीने लक्ष द्यायची. शेवटी तो देखील बाबा होणार होता ना!
कधी कधी गमतीने अरुणा राघवला विचारायची,"बाळाचे बाबा, सांगा आज तुम्हाला कसले डोहळे लागले आहेत? बघूया आम्हाला ते पुरवता येतात का!"
त्यावर विजया साथ देत म्हणायची, "हो हो, नक्कीच! त्या निमित्ताने आपल्यालाही काहीतरी चमचमीत खायला मिळेल." असे म्हणत त्या दोघी हसून कामाला लागायच्या. एकूणच, ही शिस्त जाचक नसून आनंदाची कारंजी फुलवणारी होती.
एकदा रात्री शार्वीला अचानक काहीतरी आंबट खाण्याची तीव्र इच्छा झाली. रात्रीचे १२ वाजले होते. राघवची झोप उडाली. दोघी आयांना त्रास नको म्हणून त्याने चोरपावलाने किचनमध्ये जाऊन काहीतरी शोधण्याचे ठरवले.
पण तिथे गेल्यावर त्याला धक्काच बसला. विजया आणि अरुणा दोघीही तिथे आरामात गप्पा मारत बसल्या होत्या.
"आई! तुम्ही अजून झोपल्या नाही?" राघवने आश्चर्याने विचारले.विजया हसून म्हणाली, "अरे, आई किंवा आज्जी झाल्यावर रात्री जागणे ही एक 'सक्तीची शिस्त' होऊन जाते, ज्याची आम्हाला आता सवय करावी लागणार आहे ना!"
अरुणा पुढे म्हणाली,"आणि राघव, मला खात्री होती की शार्वीला या वेळेत काहीतरी नक्कीच हवं असेल. म्हणून मी थोडा उपमा आणि कैरीचे आंबटगोड लोणचे किचन प्लॅटफॉर्मवर तयार ठेवले आहे. घेऊन जा आणि दोघे मिळून खा."
हा प्रकार राघवने शार्वीला जाऊन सांगितला. तेंव्हा दोघींनाही मनोमन पटले की, त्यांचे आई-बाबा होणे हे या दोघींसाठी किती कौतुकास्पद आहे. मुलांच्या आनंदासाठी आणि 'ममतेच्या' छोट्या क्षणांसाठी त्या सदैव तत्पर होत्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी शार्वीने भारतात एकट्या असलेल्या दोन्ही बाबांना व्हिडिओ कॉल केला.
शार्वीचे बाबा (अरुणाचे पती) गमतीने विचारू लागले, "काय मग, आमची 'शिस्त' तिथे नीट काम करतेय ना?"
राघव हसून म्हणाला, "बाबा, तुमची शिस्त 'मायेच्या ऊबेत' मिसळून आता एक 'सुपर-सिस्टीम' बनली आहे! तुमच्या शिस्तीमुळे मला कामात मदत होतेय आणि आईच्या ममतेमुळे शार्वीला पूर्ण आराम मिळतोय."
राघवचे बाबा हसत म्हणाले, "आमची शिस्त काय म्हणतेय? जास्त डोस होत नाहीये ना? मला मात्र इथे सध्या बेशिस्त वागायला छान मोकळीक मिळाली आहे बरं का!" त्यांच्या या मिश्किल टिप्पणीवर सगळे खळखळून हसले.
पण हे हसणे वरवरचे होते. दोन्ही बाबांना घरात बायका नसल्यामुळे आलेला एकलेपणा जाणवत होता. त्यांना याची जाणीव झाली होती की, त्यांच्या पुरुषांच्या शिस्तीला खऱ्या अर्थाने 'ऊब' ही केवळ स्त्रियांच्या 'ममतेच्या शिस्तीतूनच' मिळते.
ही 'मायेच्या नात्याची ऊब' आता पुढच्या पिढीसाठी भक्कम आधार बनणार होती.
क्रमशः...
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा