मायेच्या नात्याची ऊब: भाग २१
बाळाच्या येण्याची चाहूल लागल्यापासून घराचं वातावरणच बदलून गेलं होतं. एके दिवशी दुपारी विजया आणि अरूणा हॉलमध्ये बसले असताना शार्वीने आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवली.
शार्वी म्हणाली, "आई, मला माझं डोहाळे जेवण अगदी पारंपरिक पद्धतीने करायचं आहे. पण तुमची खूप धावपळ होईल ग. ही दगदग.मला नको वाटतंय."
हे ऐकल्यावर अरुणा आणि विजया एकमेकींकडे बघून खळाळून हसल्या.विजयाने लगेच कपाटातून एक कापडी पिशवी काढली आणि म्हणाली, "शार्वी, आम्ही भारतातून निघतानाच तयारी करून आलो होतो. हे बघ, तुझ्या ओटीचं सामान, अगदी सालंकृत आम्ही आधीच घेऊन आलोय. आमचं दोघींचं आधीच ठरलं होते. पण इथे जर डोहाळे जेवण करायला मिळालं तर करू, नाहीतर बाळंत विड्यात तरी हे तुला देऊच! बघ हा मोरपिशी गाऊन, हिरवी साडी.
पण आता तू म्हणालीस ना, मग आता हे थाटातच होणार!"
मग शार्वी आणि राघवनं या कार्यक्रमासाठी मुद्दाम त्यांचे फॉरेनर मित्रमंडळींना बोलवायचे ठरवले.येत्या शनिवार तो डोहाळजेवणाचा प्रोग्राम ठरवला.
डोहाळे जेवणाचा दिवस. उगवला संध्याकाळी कार्यक्रम असल्याने सगळ्यांनाच छान तयारीला वेळ मिळाला. शार्वीने आईनं आणलेली हिरव्या रंगाची साडी आणि आईनं खास बनवून आणलेले फुलांचे दागिने घातले होते.
संध्याकाळी शार्वीचा ओटीभरणाचा कार्यक्रम साग्रसंगीत झाला सासर माहेरची ओटी भरली. औक्षण छान फोटो सेशन.भारतात असलेले नातेवाईक पण या कार्यक्रमात व्हिडिओ कॉल व्दारे सहभागी झाले होते.शार्वीसाठी तिची आजी छान डोहाळे गीत गात होती.
राघवचे आणि शार्वीचे परदेशी मित्र-मैत्रिणींसाठी हे सगळं अगदी स्वप्नवत होतं.
जेवणाच्या पंगती बसल्या आणि खरा रंग चढला. राघवने स्वतः पुढाकार घेऊन परदेशी मित्रांना महाराष्ट्रीयन जेवण कसं जेवायचं हे शिकवायला सुरुवात केली.
"मित्रांनो, हे बघा, हा डावा हात आणि हा उजवा! केळीच्या पानावर डाव्या बाजूला चटणी-कोशिंबीर आणि उजवीकडे मुख्य जेवण. आणि ही पुरणपोळी... ती कटाच्या आमटीत बुडवून खाल्ली की जो स्वर्गसुख मिळतं ना, त्याला तोड नाही!" राघव मोठ्या उत्साहात डेमो देत होता.
मित्रही हाताने जेवण्याचा प्रयत्न करत 'सो यम्मी' म्हणत दाद देत होते.
शार्वीची मैत्रीण जेनिफर तर भारावून गेली होती. ती शार्वीला म्हणाली, "शार्वी, धिस इज सो ब्युटीफुल! तुमच्या संस्कृतीत आई होण्याचा उत्सव किती सुंदर साजरा करतात. प्रॉमिस मी, जेव्हा मी आई होईन, तेव्हा तू माझ्यासाठी हे सगळं असंच करशील! मलाही ही मायेची ऊब हवी आहे."शार्वीनं होकार दिला.
संध्याकाळी पाहुणे गेल्यावर सगळे निवांत बसले होते, तितक्यात अरुणाच्या आईचा म्हणजे शार्वीच्या 'आजींचा' भारतातून व्हिडिओ कॉल आला. आजींनी स्क्रीनवरूनच सर्वांना न्याहाळलं आणि अरुणाला प्रेमळ सुरात दरडावलं.
"अरू, अगं एवढा मोठा समारंभ झाला, पोरांची नीट दृष्ट काढ आधी! आणि यापुढे रोज मला असं सगळं दाखवत जा व्हिडिओ कॉल करून. माझ्याकडून जाताना मार सगळं तर विचारून करत होतीस, तिकडे गेल्यावर लेकीच्या कौतुकात आम्हाला विसरून गेलीस की काय?"
आजींचा हा लडिवाळ राग ऐकून सगळे हसले. तितक्यात शार्वीचे बाबा आणि राघवचे बाबा (जे आता जिवलग मित्र झाले होते) पुढे आले.
शार्वीचे बाबा आनंदाने म्हणाले, "सासूबाई, तुम्ही काळजीच करू नका. आता ही गोड बातमी नातवंड आलं की आम्हाला तुम्हाला तिकडेच न्यायचं आहे फुलं व्हायला! म्हणजे 'पंजी' (पणजी) म्हणून तुमचं स्वागत आम्ही तिथेच करू."
राघवच्या बाबांनीही हसून दुजोरा दिला, "हो आजी, तुमचा व्हिसा आणि तिकीट आम्ही आत्तापासूनच पक्कं समजतो!"
सगळ्यांच्या हसण्याने घर दुमदुमलं. पण या आनंदाच्या वातावरणातही, अरुणाची नजर खिडकीबाहेर कुठेतरी हरवली होती. आजींच्या बोलण्याने तिला तिच्या स्वतःच्या बाळंतपणाचे दिवस आठवले होते.
क्रमशः...
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा