Login

"मायेच्या नात्याची ऊब" - २४

Jithe Mayechi Oob Thithe Fakt Jivala Japala Jato
​मायेच्या नात्याची ऊब: भाग २४
​बाळाच्या जन्मानंतर राघव-शार्वीच्या घरात आनंदाचे कारंजे उडत होते, पण खऱ्या अर्थाने 'रणधुमाळी' सुरू झाली ती पुण्यात!
राघवने व्हिडीओ कॉलवर बाळाचा गोड चेहरा दाखवला आणि दोन्ही आजोबांची जणू काही परीक्षा संपली आणि शाळेला सुटी लागली, अशा उत्साहात तयारी सुरू केली.
​"मी निघतोय, जे तिकिट मिळेल ते घेऊन माझा व्हिसा तयार आहे!" शार्वीचे बाबा उत्साहात म्हणाले.
राघवचे बाबा मध्येच ओरडले, "अरे असं कसं? आपण सोबत जायचं ठरलंय ना? माझाही व्हिसा तयारच आहे म्हटलं!"
मला आधी तिकीट तर बघू दे. 'Business Class' घेऊ का म्हणजे ओझी वाहून नेता येतील. नको, नको पण 'Refundable' तिकीट हवं, शेवटी एअरलाईन्सवाल्यांचा काही भरवसा नाही आजकाल !"राघवचे बाबा म्हणाले.
​पण खरी गडबड उडाली ती आज्जीच्या (बाळाच्या पणजींच्या) एका फोन कॉलमुळे!
आज्जीने अधिकारवाणीने फर्मान सोडलं, "ऐका रे, तुम्ही तिकडे जाताय तर नुसते हात हलवत जाऊ नका. खसखस, आळीव, सुकं खोबरं आणि गावरान तीळ आणि आळीव आठवणीने घेऊन जा. शार्वीला आता या आहाराची गरज आहे. बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्म असतो! तिला ताकद नको का?"
​दोन्ही आजोबांची आता तारांबळ उडाली. चॅट जीपीटीवर सर्च सुरू झाला— "How to hide Khaskhas from US Customs?" शार्वीचे बाबा म्हणाले, "राघवच्या बाबा म्हणाले, आपण खसखस छोट्या डब्यात भरू आणि त्यावर 'पूजा साहित्य' असं लेबल लावू. कुणी विचारलं तर सांगू 'दिस इज इंडियन सुपरफूड'!"
​तितक्यात राघवनं व्हिडीओ कॉलवर एन्ट्री घेतली. तो हे सगळं ऐकत होता. तो हसत म्हणाला, "बाबा, हा तुमचा 'स्मगलिंग'चा प्लॅन आताच थांबवा! तुमचे हे विनोद आणि नाट्यमय प्रसंग आपण इथे आल्यावर नक्कीच अनुभवू!"
पण कृपया हे काहीही सोबत घेऊन येऊ नका. खसखस, खोबरं हे सगळं तिथे 'बॅन' आहे!"
​राघवचे बाबा वैतागून म्हणाले, "अरे पण आजी ऐकायला तयार नाहीये.त्यांना कसं समजावयाचं ?"
​राघव मिश्किलपणे हसत म्हणाला, "आजीला फक्त सांगा की 'सगळं घेतलंय'. तिला कशाला टेन्शन देता? आणि बाबा, एक लक्षात ठेवा, आता अमेरिका हे 'सेमी पुणे' झालंय! इथे सगळं मिळतं. शनिवार पेठेत मिळतं तसं सुकं खोबरं आणि आळीव इथे शेजारच्या स्टोअरमध्ये मिळतात. उगाच रिस्क घेऊ नका."
​राघवने पुढे जो इशारा दिला त्याने दोघांचेही चेहरे बघण्यासारखे झाले. तो म्हणाला, "दुसरी महत्त्वाची गोष्ट... आता तिकडे 'ट्रम्प काकांचे' राज्य पुन्हा आलंय! त्यांच्या मेहेरबानीने तुम्हाला प्रवास करायचा आहे.
एअरपोर्टवरच्या कडक तपासणीत तुमची 'बाळघुटी' आणि 'खसखस' सापडली ना, तर ट्रम्प काका तुम्हाला नातवाच्या भेटी आधी थेट इमिग्रेशनच्या ऑफिसमध्ये बसवतील!"
​'ट्रम्प काकां'चं नाव ऐकताच शार्वीचे बाबा सावरून बसले. "अरे बापरे! म्हणजे चॅट जीपीटी खरं सांगत होतं तर! मला वाटलं ते मुद्दाम घाबरवतायत."
​राघवच्या बाबांनी पण सुटकेचा नि:श्वास टाकला, "बरं झालं बाबा सांगितलंस! नाहीतर आम्ही बाळघुटीची पावडर करून डब्यात भरायच्या तयारीत होतो. कस्टम्सवाल्यांनी ती पांढरी पावडर बघितली असती तर आमचं 'रेड सिग्नल' च्या गेट मधून स्वागत केले असते.
​अरुणा आणि विजया मागे उभ्या राहून हे सगळं ऐकत होत्या. अरुणा म्हणाली,अहो बॅगेत काही संशयास्पद आढळले तर खडू ने फुल्या मारतात हे लक्षात असू द्या शार्वीचे बाबा! "
विजयानं पण याला 'री'ओढली."बघितलं मी पण सांगत होते ना, नका ते उद्योग करू! आता गुपचूप स्वतःला आणि जे कपडे सांगितलेत तेवढंच घेऊन या."आणि बाळाचे बाळलेणे.
​पुण्यातून दोन आजोबा, हातांत रिकाम्या बरण्या आणि मनात नातवाचं रूप घेऊन, ट्रम्प काकांच्या नियमावलीचा धाक बाळगत आता अमेरिकेच्या प्रवासाला सज्ज झाले होते. पणजींना 'सगळं घेतलंय' असं खोटं सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर जे 'गुन्हेगारी' हसू होतं, ते बघण्यासारखं होतं.
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
0

🎭 Series Post

View all