Login

"मायेच्या नात्याची ऊब" भाग - २५

Jithe Mayechi Oob Thithe Fakt Jivala Japala Jato
​मायेच्या नात्याची ऊब: भाग २५ — '
पुणेरी' मिशन ते अमेरिका!..
​परदेशी जाण्याची जय्यत तयारी झाली होती, पण खरी कसरत अजून बाकी होती.
पुण्यातल्या दोन्ही आजोबांना त्यांच्या पत्नींनी (आज्जींनी) आणि घरातल्या पणजींनी दिलेली 'सक्तीची यादी' पूर्ण केल्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. बाळ-लेणं, चांदीची वाटी-चमचा, गळ्यातील पाचवी, कमरेची साखळी आणि बाळगुटीची सहाण.बाळगुटीचं सामान, वेखंट, मुरडशेंग,वावडींग,ही खरेदी म्हणजे जणू एखादं 'राष्ट्रीय मिशन' होतं!
​ खरेदीला निघण्यापूर्वी राघव आणि शार्वीने व्हिडिओ कॉलवर दोन्ही आजोबांना गाठलं. अमेरिकेत शार्वीसोबत असलेल्या दोन्ही आज्जींनीही उत्साहात कॉल जॉईन केला होता.
​"बाबा, अहो ऐका तर खरं... कशाला एवढा खर्च करताय? अमेरिकेत सोनं फारसं वापरलं जात नाही!" राघवने समजावण्याचा प्रयत्न केला. शार्वीनेही त्याला साथ दिली.
"हो बाबा, तुमचं येणं महत्त्वाचं आहे, या वस्तू नाही. उगीच ओझं वाढवू नका, आता गाठीशी पैसे ठेवा."
​मुलांच्या या समजूतदारपणाने दोन्ही आजोबा क्षणभर भावूक झाले. राघवच्या बाबांच्या डोळ्यांत पाणी आलं. ते हळव्या स्वरात म्हणाले, "रे बाळा, हा 'खर्च' नाहीये. हे आमच्या नातवासाठी ओतलेलं आमचं प्रेम आहे."
​तेवढ्यात व्हिडिओ कॉलवर शार्वीच्या शेजारी बसलेल्या दोन्ही आज्जींनी 'आघाडी' सांभाळली. स्क्रीनवर जवळ येत त्या कडाडल्या, "ए राघव, शार्वी! जास्त शहाणपणा शिकवू नका बरं का! तुम्ही फक्त 'हो' म्हणायचं. आम्ही इथे जे ठरवलंय, तेच पुण्यातले आजोबा करणार.
जर खरेदीला नकार दिलात, तर लक्षात ठेवा—आम्ही त्यांना विमानात पाऊल सुद्धा ठेवू देणार नाही!"
​अमेरिकेतून चाललेला हा 'रिमोट कंट्रोल' पाहून आजोबांना हसू आलं आणि खरेदीचं बळही मिळालं. पणजींनीही फोनवर मायेने सांगितलं, "दागिन्यांची चकाकी कालांतराने कमी होईल रे, पण त्यामागची आमची माया नातवाच्या अंगाखांद्यावर खेळू द्या." या प्रेमळ धाकापुढे मुलं गप्प झाली.
​खरेदीला निघण्यापूर्वी राघवच्या बाबांनी 'चॅट जीपीटी'ला विचारलं, "सोनं-चांदी नेता येईल का? आणि पणजींनी दिलेलं बाळगुटीचं सामान कसं न्यायचं?" चॅट जीपीटीने मात्र नियमांवर बोट ठेवत सावध केलं— "अमेरिकन कस्टम्समध्ये बिया, मुळं आणि आयुर्वेदिक औषधी न्यायला सक्त मनाई आहे.सोन्या- -चांदीची बिलं मात्र सोबत ठेवा."
​हे वाचून राघवचे बाबा वैतागले. "बघितलं पंत? हे यंत्र काय सांगतंय? पणजींच्या मायेच्या औषधाला हे 'डेंजरस' म्हणतंय! जाऊ दे, आपण आपलं पुणेरी डोकं चालवू."
​पुण्यातली दुपार म्हणजे 'विश्रांतीचा' काळ. एक ते चार सगळी दुकानं बंद! नशिबाने रविवार पेठेतलं एक जुनं दुकान उघडं दिसलं. दोघेही आत शिरले. राघवचे बाबा मिश्किलपणे म्हणाले, "शेठ, प्रथम तुमचे आभार! तुम्ही 'एक ते चार' झोपत नाही म्हणून आज तुमची लॉटरी लागलीये बरं का!" या विनोदावर दुकानात हास्याची लकीर उमटली.
​"आमच्या नातवासाठी चांदीचे वाळे, कमरेची साखळी,कानातल्या सोन्याच्या काड्या, चांदीची चमचा वाटी आणि गळ्यात घालायची पाचवी आई सटवाईच देवीची प्रतिमा दाखवा! " बाबांनी फर्मावलं.
दुकानदाराने एक सुबक 'पाचवी' (सटवाईचं प्रतीक) समोर ठेवली. शार्वीचे बाबा ती न्याहाळत म्हणाले, "नातू अमेरिकेत जन्मला असला, तरी रक्षण करायला आपली 'पुणेरी सटवाई'च पाहिजे! देवी सात्त्विक पण करारी हवी, जेणेकरून अमेरिकेतल्या लोकांनीही ओळखावं की हा पुण्याचा नातू आहे!"
​खरेदी रंगात आली असतानाच दुकानदाराने चांदीचा एक भारी नक्षीकामाचा चमचा दाखवला. शार्वीचे बाबा उत्साहात म्हणाले, "अहो राघवचे बाबा, आमच्या नातवाच्या तोंडात आधीच 'सोन्याचा चमचा' आहे, आता हा चांदीचा भला मोठा कशाला?"
​हे ऐकताच राघवच्या बाबांनी चटकन त्यांच्या हाताला चिमटा काढला आणि डोळ्यांनी इशारा केला. हळूच कुजबुजले, "पंत, कशाला त्यांना सगळं सांगताय?
आपण अमेरिकेला चाललोय हे कळलं ना, तर हे मेकिंग चार्जेसचे भाव गगनाला भिडवतील! गप्प राहा, जरा गरिबीचा आव आणा!"
​शार्वीच्या बाबांनी लगेच विषय फिरवला, "ते जाऊ दे शेठ, ही वाटी जरा मोठी आणि जड दाखवा. उद्या नातवाला 'पुणेरी मिसळ' खायची झाली, तर यात त्याचा 'कट' मावायला नको! आणि चमचा जरा खोलगट हवा, रस्सा सांडता कामा नये!"
​दुकानदार बुचकळ्यात पडला. "काका, लहान बाळ दोन चमचे गुटी किंवा वरण-भातच खाणार ना? मिसळ कुठे भरवताय?" शेवटी वैतागून तो म्हणाला, "घ्या बाबा काय घ्यायचे ते! नातू तुमचा आहे, त्याला काय भरवायचं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे!"
​सगळ्या वस्तूंची चकाकी पाहून आजोबा तृप्त झाले. बिलं नीट जपून ठेवली. दुकानातून बाहेर पडल्यावर दोघांनीही मनसोक्त मिसळ-पाववर ताव मारला. आणि एकमेकांना 'टाटा' करून रिक्षाने घराकडे रवाना झाले.
​'चॅट जीपीटी'च्या भीतीमुळे बाळगुटीची सामान घरीच ठेवावे लागले पण पणजींना "सगळं नेलंय" असं सांगून दोघांनी बॅगेत दोन रिकामे डबे भरले होते.
आज्जींच्या सततच्या चौकशीला उत्तर देणं हे व्हिसा मिळवण्यापेक्षाही कठीण काम होतं!​निघायच्या रात्री पुन्हा एकदा बॅगेचं वजन, गोळ्या-औषधं, व्हिसा आणि पासपोर्टची तपासणी झाली. सगळं सुरक्षित असल्याची खात्री पटल्यावर दोन्ही 'विमानवेडे' आजोबा पुण्याच्या टॅक्सीत बसून मुंबई विमानतळाकडे झेपावले...एका नव्या प्रवासासाठी!
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
0

🎭 Series Post

View all