मायेच्या नात्याची ऊब - भाग २७
सावळा गोंधळ आणि पुणेरी डबे!
पुण्यातून आलेले दोन्ही आजोबा आता अमेरिकेच्या वातावरणात 'हीटिंग'च्या उबेत नीट सेट झाले होते. पण खरा 'ड्रामा' अजून बाकी होता. तो म्हणजे... पणजी आजींचा व्हिडिओ कॉल!
पुण्याहून निघण्यापूर्वीच आजींनी (बाळाच्या पणजींनी) फर्मान सोडलं होतं, "अरुणा, जावईबापू अमेरिकेत पोहोचले की ते पुण्याचे डबे उघडून मला प्रत्यक्ष व्हिडिओ कॉलवर दाखवायचे, तरच माझं समाधान होईल. नाहीतर तुम्ही तिकडे त्या 'पॅकेट' मधल्या गोष्टी बाळाला खायला घालायच्या!"
आता अरुणा आणि विजया या दोन्ही विहिणींसमोर मोठं 'धर्मसंकट' उभं राहिलं. आजींची नजर म्हणजे जणू एअरपोर्टवरचा स्कॅनरच! दोघींचीही कसोटी लागणार होती.अरुणाने मोबाईल सोफ्यावर नीट सेट केला आणि पुण्याला व्हिडिओ कॉल लावला. पलीकडे आजी चष्मा नाकावर सरकवून, पूर्ण तयारीनिशी सज्ज होत्या. जणू काही सीबीआयची चौकशीच सुरू होणार होती!
"काय गं अरुणा, पोहोचले का ते दोन्ही 'नमुने' नीट? प्रवास सुखकर झाला ना?" आजींचा खणखणीत आवाज स्पीकरमधून पूर्ण घरात गुंजला. "सामान सगळं व्यवस्थित आणलंय ना? मी त्यांना वेळोवेळी आठवण करून देत होते.
आधी ते डबे उघडा आणि मला दाखवा!"विजयाने घाईघाईने ते पुणेरी दोन डबे एका ओळीत मांडले आणि अरुणाने कॅमेरा अगदी डब्यांच्या जवळ नेऊन 'झूम' केला.
दोन्ही आजोबा जणू काही 'पोलीस परेड'मध्ये उभे असल्यासारखे बाजूला ताठ उभे राहून बघत होते.
शार्वीचे बाबा उत्साहात मध्येच डोकं घालून म्हणाले, "आई, हे बघा! तू सांगितल्याप्रमाणे सगळं 'ए-वन' क्वालिटीचं सामान आणलंय. हे बघ वेखंड, मुरडशेंग आणि वावडिंग! आपल्या नातवाचं पोट आता कधीच दुखणार नाही."
राघवचे बाबा सुद्धा मागे राहतील तर शपथ! ते लगेच पुढे झाले, "आणि हे बघा आई, खसखस, आळीव आणि तीळ! सोबतीला सुकं खोबरं, डिंक आणि अगदी बाजरी आणि बाळंत शोपा सुद्धा आणल्या आहेत ! एकही गोष्ट विसरलो नाहीये, हवं तर चेक करा!"
आजींनी डोळे बारीक केले आणि स्क्रीनकडे निरखून पाहिलं. त्यांचा सगळ्या बोलण्यावर विश्वास बसला.
"बरं बरं... डबे तर आपलेच दिसतायत. पण गं अरुणा, आता ते सगळं तू कसं बनवणार? तुला तरी कुठे येतंय? आणि विजया, तुला तरी काही माहिती आहे का गं?"
आता खरी 'गोची' झाली! कारण इकडे अरुणा आणि विजयाने आधीच 'अमेरिकन' ब्रँड्स आणि आधुनिक वस्तूंची गुपचूप शक्कल लढवून ठेवली होती. पण हे आजींना सांगणं म्हणजे 'आ बैल मुझे मार' असंच होतं.
अरुणाने आपला घसा खाकरला आणि वेळ मारून नेण्यासाठी म्हणाली, "आई, तू काळजीच करू नकोस! आता तू तिकडून व्हिडिओ कॉलवर 'लाईव्ह' ट्रेनिंग द्यायचं आणि आम्ही दोघी इकडून तसं बनवायचं. तुम्ही फक्त ऑर्डर सोडा आम्ही इकडे 'बाळगुटीचा कारखाना'च सुरू करतो!"विजया म्हणाली.
आजी या कौतुकानं एकदम खुश झाल्या. "बरं मग ऐका, उद्या सकाळी उठल्या उठल्या आधी वेखंडाचा डबा उघडा..आणि ऐका गं पोरींनो, ते अमेरिकन 'चॅट जीपीटी' काहीही म्हणो, बाळगुटीची चव आणि मायेची ऊब त्या पुण्याच्याच डब्यातून यायला हवी!"
राघव मागे उभा राहून हसून हसून बेजार झाला होता. त्याला माहीत होतं की, आजींना वाटतंय पुण्यातून बाळगुटीचं अस्सल सामान आलंय, पण प्रत्यक्षात अरुणा आणि विजयाने त्या डब्यात 'अमेरिकन ब्रँडेड' वस्तू आणि पुण्याच्या सामानाची अशी काही 'फ्युजन भेळ' केली होती की, बाळगुटी सुद्धा गोंधळून गेली असती!
आजींनी फोन ठेवल्यावर विजयाने हळूच राघवच्या बाबांना चिमटा काढला आणि पुटपुटली, "सांगून तर टाकलं आजींना की आम्ही बनवू, पण आता या वेखंडाचं करायचं काय? आपण तर 'पॅकेट' मधलं आधुनिक लोशन आणून ठेवलंय!"
राघवच्या बाबांनी डोळा मिचकावत मिश्किलपणे म्हटलं, "विजया, यालाच तर 'सावळा गोंधळ' म्हणतात! डबा पुण्याचा, सामान अमेरिकेचं आणि पद्धत मात्र आजींची! आता बघाच, आमचा अमेरिकेत नातवासोबत कसा 'शाही दरबार' भरतो तो!"सगळेजण खळखळून हसले. त्या बाळगुटीच्या डब्यांनी अखेर सातासमुद्रापार, अमेरिकेच्या घरात पुण्याच्या मातीचा सुगंध आणि आजींची माया दोन्ही पोहोचवली होती.
पुढच्या भागात:
आजी खरोखरच व्हिडिओ कॉलवर बाळगुटी बनवायला लावणार का?
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा