मायेच्या नात्याची ऊब - भाग २८
वेखंडाचा लेप आणि वावडिंगाची किमया!
सकाळचे सहा वाजले होते. अमेरिकेत बाहेर उणे तापमान होतं, पण घरात मात्र पणजी आजींच्या व्हिडिओ कॉलमुळे वातावरण चांगलंच 'चार्ज' झालं होतं.पुण्याच्या 'लाईव्ह ट्रेनिंग'चा दुसरा अंक सुरू झाला होता!
स्वयंपाकघरात अरुणा आणि विजयाची धावपळ सुरू होती. आजींनी स्क्रीनवरूनच हुकूम सोडला, "अरुणा, आधी ते वेखंडाचं कांडं काढ बघू! बाहेर बर्फ पडतोय, त्या कोवळ्या जिवाला थंडी-वारा बाधायला नको. आधी वेखंडाचा उबदार लेप कपाळावर आणि पोटावर लावायचा, मगच बाकीचं!"
विजयाने डब्यातून वेखंड काढलं. आजी स्क्रीनवर चष्म्यातून बारीक नजर ठेवून ओरडल्या, "अगं विजया, ते वेखंड कोरडं काय बघतेयस?सहाण घे आणली आहे ना जावयांनी (शार्वीचे बाबा)मग ती घे आणि त्यावर दोन थेंब कोमट पाणी टाकून नीट उगाळ.
लेप ना जास्त घट्ट हवा ना जास्त पातळ, अगदी लोण्यासारखा उतरला पाहिजे!"विजयानं बॅगेतून काढून सहाण आणली.जी राघवणं आधीच इंडियन स्टोअर मधून आणून ठेवली होती.
बिचारी विजया सहाण घेऊन खुर्चीवर स्वयंपाकाच्या ओट्यालगत बसली.
अमेरिकन गुळगुळीत ओट्यावर सहान सारखी घसरत होती.
राघव लांबून हे बघत होता, तो हसत म्हणाला, "आई, या सहाणेपेक्षा आपलं ते मिक्सर-ग्राइंडर बरं पडलं असतं ना?"
आजींनी तिथूनच दम भरला, "राघवा, गप्प बस!मिक्सरमध्ये काय वेखंडाचे गुण उतरतात व्हय? त्या सहाणेवर घासल्यावर जो मायेचा स्पर्श उतरतो ना, तो तुझ्या त्या 'गॅजेट्स'मध्ये नाही मिळणार!"
विजयाने लेप तयार केला आणि अरुणाने मुरुडशेंग व जेष्ठमधाचे डब्यातून काढले. उ तिने वावडिंगाचा दाणा हातात घेऊन उगाळायला सुरुवात केलीच होती की आजी ओरडल्या, "थांब! थांब! अगं अरुणा, अक्कल गहाण ठेवून आलीस का अमेरिकेला?"
अरुणा दचकली, "का ग आई? काय झालं?"
"अगं वेडे, वावडिंग असं उगाळायचं नसतं! ते बाजूला ठेव आधी," आजींनी डोक्याला हात लावला. "वावडिंगाचे दोन दाणे त्या दुधात टाकायचे आणि दूध चांगलं उकळायचं. म्हणजे बाळाला ते दूध बाधत नाही, उलट पचायला हलकं होतं. आणि मग बाकीची बाळगुटी मुरुडशेंग आणि जेष्ठमध उगाळून द्यायची!"
विजयाने पटकन वावडिंगाचे दाणे दुधाच्या पातेल्यात टाकले. राघवचे बाबा बाजूला उभे राहून हे सगळं डायरीत टिपत होते, जणू काही एखाद्या मोठ्या कंपनीची मिटिंग सुरू आहे! ते म्हणाले, "आई, हे वावडिंग म्हणजे दुधाचं 'शुद्धीकरण' आहे तर!"
आजी हसल्या, "हो! आता कसं बोललात जावईबापू. आता ते मुरुडशेंग दोन वेळा आणि जेष्ठमध एक वेळा उगाळा. बाळगुटी म्हणजे बाळाचं सुरक्षा कवच असतं, नीट करा!"
अरुणा आणि विजयाने अखेर आजींच्या मार्गदर्शनाखाली वेखंडाचा उबदार लेप बाळाच्या कपाळावर आणि पोटावर लावला. वावडिंग घालून उकळलेलं दूध आणि बाळगुटी तयार झाली. बाळाला जेव्हा ती पाजली, तेव्हा त्याने एक गोड जांभई दिली आणि अगदी शांतपणे झोपी गेलं.
फोन ठेवताना आजी समाधानाने म्हणाल्या, "लक्षात ठेवा, डबे पुण्याचे असले तरी त्यातली माया आणि हे शास्त्र तुमच्या हातात आहे. उद्या आपण 'बाळंतिणीचा काढा' कसा करायचा ते बघू!"
विजयाने सुटकेचा नि:श्वास सोडला आणि अरुणाला म्हणाली, "बाई ग! वेखंड उगाळताना माझेच हात भरून आलेत, पण बाळाला असं शांत झोपलेलं बघून सगळा थकवा गेला."
राघव हसत बाबांना म्हणाला, "बाबा, आता आपलं घर घर राहिलं नाहीये, 'पुणेरी निसर्गोपचार केंद्र' झालंय!"सगळेजण खळखळून हसले. बाहेरची थंडी आणि आजींची मायेची ऊब यांचा एक सुंदर मेळ त्या दिवशी अमेरिकेत बसला होता.
पुढच्या भागात:
बाळंतिणीचा काढा करताना अरुणाची काय फजिती होते?
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा