Login

"मायेच्या नात्याची ऊब" भाग - ३०

Jithe Mayechi Oob Thithe Fakt Jivala Japala Jato
"मायेच्या नात्याची ऊब - ३०
​'डिजिटल' बारसं बाळाचे नामकरण!
​बाळ आता सव्वा महिन्याचं झालं होतं आणि घरात वेध लागले होते ते त्याच्या 'नामकरण सोहळ्याचे'.
अमेरिकेत बाहेर उणे तापमान आणि थंडीचा कडाका होता. बाळ अजून खूपच लहान असल्याने बाहेरील लोकांमुळे त्याला इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता होती, म्हणूनच राघवने आणि शार्वीनं ठरवले की, बारशाचा सोहळा कोणालाही न बोलावता घरच्या घरीच करुया!
​पाहुणे जरी येणार नव्हते याचा अर्थ सोहळा छोटा नव्हता!भारतातील नातेवाईकाना झुम कॉलवर आमंत्रण होते.
राघवने लॅपटॉपचा मोठा स्क्रीन टीव्हीला जोडला होता. अमेरिकेत सकाळचे नऊ वाजले होते आणि पुण्यात संध्याकाळचे साडेसात.
व्हिडिओ कॉल सुरू होताच जणू काही अख्खं 'पुणे' आणि 'भारत' अमेरिकेतल्या त्या हॉलमध्ये अवतरलं!
​स्क्रीनवर एका बाजूला शार्वीचे मामा-मामी, काका-काकू आणि आत्या बसले होते, तर दुसऱ्या बाजूला राघवचेही मामा-मामी, काका-काकू आणि आत्या पूर्ण तयारीनिशी हजर होते.मध्येच पणजी आजी चष्मा सावरत सगळ्यांवर लक्ष ठेवून होत्या.
​आजींनी पुण्यातूनच सक्त ताकीद दिली होती, "अरुणा, जरी तुम्ही अमेरिकेत असलात तरी पाच सुवासिनींच्या हाताने औक्षण झाल्याशिवाय बारसं पूर्ण होणार नाही.आम्ही इथे सगळी तयारी केली आहे!"
​शार्वी बाळाला घेऊन सोफ्यावर बसली. तिने आजींनी पाठवलेली सुंदर जरतारी कुंची बाळाला घातली होती. पुण्यात पाचही सुवासिनींनी (ज्यात दोन्ही बाजूंच्या काकू आणि मामी होत्या) हातात निरांजनाचं ताट धरलं आणि लॅपटॉपच्या स्क्रीनसमोरून शार्वी आणि बाळाला ओवाळायला सुरुवात केली.
"शार्वी, अगं मान सरळ धर आणि माझ्या 'पणतवंडाला' नीट पकड,"आजी तिथून सूचना देत होत्या. पुण्यातून सगळ्या काकू-मामींनी "औक्षणं उदंड आयुष्य लाभो" असं म्हणत निरांजनं फिरवली आणि अमेरिकेत अरुणा व विजयाने आजींच्या तालावर इथे अक्षता टाकल्या. व्हिडिओ कॉलवरून झालेल्या या 'डिजिटल' औक्षणामुळे शार्वी भारावून गेली.
​औक्षण झाल्यावर वेळ आली ती 'नामकरण' विधीची. आत्ये बहीण मृण्मयीने पुण्यातून पाळण्याचं गाणं गायला सुरुवात केली, "कुणी म्हणतं चांदोबा, कुणी म्हणतं बाळ... बाळ माझं अद्वैत कुलकर्णी घराचा वारसदार !" तिने मोठ्या उत्साहात नाव जाहीर केलं#'अद्वैत'!
​नाव ऐकताच स्क्रीनवरच्या सर्व मामा-मामी आणि काका-काकूंनी टाळ्यांचा कडकडाट केला.
"काय छान नाव आहे! अगदी साजेसं!" अशा कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला.
​आजींनी तिथूनच ओरडून सांगितलं, "शार्वी, आता बाळाच्या कानात नाव सांग आणि राघवनं आणलेल्या घुगऱ्या आणि पेढे सगळ्यांना वाटा!"
​राघवनं मोठ्या हौसेने इंडियन स्टोअरमधून आणलेल्या घुगऱ्या (उकडलेले कडधान्य) आणि पेढे सगळ्यांना दिले.
राघवचे बाबा हळूच म्हणाले, "आई, आम्ही घुगऱ्या तर खाल्ल्या, पण इकडे दुसरे पाहुणे नाहीत म्हणून आम्हीच सगळ्यांच्या वाटणीचे पेढे संपवतोय !" यावर स्क्रीनवरचे सगळे मामा-काका खळखळून हसले.
​शेवटी आजींचा स्वर थोडा हळवा झाला. त्या म्हणाल्या, "बाळ लहान आहे म्हणून घरी कार्यक्रम केलात हे अगदी योग्य केलंत. आज माझे दोन्ही जावई (दोन्ही आजोबा) मी राघवचे बाबा आणि विजया यांना माझं लेक जावईच मानते बरका! तिथे आहेत.
दोन्ही विहिणी आहेत, मग आणखी काय हवं?
माझा 'पणतू' अद्वैत म्हणजे अद्वितीय! तो जगाच्या पाठीवर कुठेही राहिला तरी त्याची मुळं आपल्या या मोठ्या कुटुंबात आणि संस्कारात घट्ट राहतील."
​राघव आणि शार्वीने लॅपटॉप समोरच वाकून संपूर्ण कुटुंबाला नमस्कार केला.
बाहेर बर्फ पडत असला तरी घरामध्ये मात्र घुगऱ्यांचा खमंग वास आणि नात्यांची उबदार माया रेंगाळत होती व्हिडीओ कॉल बंद करताना परत आज्जीनं पतवंडाच्या गालावरून हात फिरवले कडकडून बोटं मोडली. अरूणाला परत मायलेकराची दृष्ट काढायचे फर्मान सोडले.
पाहूयात पुढील भागात ​अद्वैत आता हळूहळू एका कुशीवर वळायला लागतो.त्याची प्रगती
आजोबा आज्जीची धमाल.
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
0

🎭 Series Post

View all